घरमुंबईठाणे जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न गेल्या 5 वर्षांत मार्गी लावू शकलो याचे समाधान

ठाणे जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न गेल्या 5 वर्षांत मार्गी लावू शकलो याचे समाधान

Subscribe

ठाणे जिल्ह्याशी संबंधित रखडलेले अनेक महत्त्वाचे प्रकल्प गेल्या पाच वर्षांत पालकमंत्री या नात्याने मार्गी लावू शकलो, याचे समाधान आहे. क्लस्टर, मेट्रो, सॅटिस यांसारख्या प्रकल्पांमुळे येत्या काळात ठाण्याचा चेहरामोहरा बदलेल, असा विश्वास ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि कोपरी-पांचपाखाडी मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

निवडणूक प्रचाराचा समारोप करताना पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ठाणे जिल्ह्यासोबतच नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे क्षमता विस्तार, वाशी येथे खाडीवरील तिसरा पूल अशा राज्यात मार्गी लावलेल्या प्रकल्पांचीही माहिती त्यांनी दिली.

- Advertisement -

ठाणे शहराला आजवर सातत्याने डावलले गेले होते. विकासाचा हा अनुशेष गेल्या पाच वर्षांत भरून काढायचा प्रयत्न केला. क्लस्टर, मेट्रो प्रकल्प, शहरांतर्गत मेट्रो, कोपरी पूल रुंदीकरण, पूर्वेला सॅटिस, ठाणे-मुलुंड दरम्यान नवे रेल्वे स्थानक असे कित्येक प्रकल्प गेल्या पाच वर्षांत मार्गी लागले. रस्त्यावरील वाहतूक कमी करण्यासाठी मेट्रो आणि जलवाहतूक प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. शहरांतर्गत मेट्रो प्रकल्प ठाणे महापालिकेच्या माध्यमातून राबवणार आहोत, राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. घोडबंदरवरील वाहतूककोंडी फोडण्यासाठी साकेत-गायमुख कोस्टल रोड होणार आहे, अशी माहिती शिंदे यांनी दिली.

क्लस्टर प्रकल्प हा केवळ जुन्या इमारती पाडून नव्या इमारती बांधण्यापुरताच मर्यादित नसून शहराचा नव्याने, सुनियोजित पद्धतीने विकास करण्याची सुवर्णसंधी आहे, असेही ते म्हणाले.

- Advertisement -

ठाणे जिल्ह्यासाठी स्वतंत्र धरण प्रकल्पालाही गेल्या 5 वर्षांत चालना दिली. काळू धरणाचे काम अनियमिततेमुळे बंद पडले होते. त्यासमोरील अडचणी सोडवल्या. त्यामुळे शहरासह जिल्ह्याला स्वतंत्र धरण मिळणार, असेही शिंदे यांनी सांगितले.जिल्ह्यातील 18च्या 18 आणि पालघर जिल्ह्यातील सर्व 6 जागा महायुती जिंकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघात काम कोण करते आणि नुसतेच बोर्ड लावून श्रेय कोण घेते, हे लोकांना माहिती आहे. त्यामुळे लोकांना तिथे आता बदल हवा आहे. विकासाच्या बाबतीत आम्ही कधीही दुजाभाव केला नाही. महापालिकेच्या माध्यमातून कळवा-मुंब्रा-कौसा भागात अनेक कामे केली. क्लस्टर देखील मंजूर झाले आहे, असेही ते म्हणाले. याप्रसंगी कळवा-मुंब्रा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार दीपाली भोसले सय्यद, सभागृह नेते नरेश म्हस्के, स्थायी समिती सभापती राम रेपाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -