घरमुंबईउद्धव ठाकरे २४ तारखेला अयोध्येला जाणार नाहीत!

उद्धव ठाकरे २४ तारखेला अयोध्येला जाणार नाहीत!

Subscribe

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचा पूर्वघोषित अयोध्या दौरा रद्द केला आहे.

येत्या २४ नोव्हेंबरला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, आता उद्धव ठाकरेंनी आपाला नियोजित अयोध्या दौरा रद्द केल्याचं स्पष्ट झालं आहे. राज्यात निर्माण झालेला सत्तास्थापनेचा पेच वाढल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी अयोध्या दौरा रद्द केल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, अयोध्येमधील वादग्रस्त जमिनीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं ९ नोव्हेंबर रोजी ऐतिहासिक निकाल दिला. त्यावेळी ‘येत्या २४ नोव्हेंबर रोजी सर्व काही नियोजन व्यवस्थित झाल्यास मी स्वत: अयोध्येला जाईन’, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. मात्र, आता हा दौरा रद्द करण्यात आला आहे.

सत्तापेच न सुटल्यामुळेच दौरा रद्द?

गेल्या वर्षी २४ नोव्हेंबर रोजीच उद्धव ठाकरेंनी अयोध्या येथे जाऊन पूजा केली होती. तसेच, राम मंदिर उभारणीसंदर्भात आग्रही मागणी देखील केली होती. याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा २४ नोव्हेंबरलाच अयोध्या दौरा करण्याचा मानस उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवला होता. मात्र, अयोध्या येथील परिस्थिती संवेदनशील असल्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षांना अयोध्येतील वादग्रस्त परिसरात येण्यापासून पोलिसांनी मज्जाव केला आहे. त्यासोबतच राज्यात देखील निकाल लागून महिना होत आला तरी देखील सत्तास्थापनेचा पेच सुटण्याचं नाव घेत नाहीये. त्यामुळेच उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा तूर्तास रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘…तर शिवसेनेला गंभीर परिणाम भोगावे लागतील’, भाजप मंत्र्याचा गंभीर इशारा!

असा आहे अयोध्या निकाल!

९ नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने अयोध्या येथील बाबरी मशिदीसंदर्भात महत्त्वपूर्ण असा ऐतिहासिक निकाल दिला होता. माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील ५ न्यायाधिशांच्या घटनापीठाने अयोध्येतील वादग्रस्त जमिनीवर रामलल्ला अर्थात प्रभू राम यांचा दावा मान्य केला. त्यामुळे या ठिकाणी मंदिर उभारणीकरता येत्या ३ ते ४ महिन्यांमध्ये स्वतंत्र ट्रस्टची स्थापना करण्याचे आदेश घटनापीठाने सरकारला दिले. तसेच, या प्रकरणातील मुस्लीम पक्षकारांना अयोध्येमध्येच दुसऱ्या मोक्याच्या ठिकाणी मशीद उभारणीसाठी ५ एकर जागा देण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिले. त्याशिवाय सुन्नी वक्फ बोर्डाचा जमिनीवरील ताबा न्यायालयाने अमान्य केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -