Bihar Election: तेजस्वी यादव जिंकले तर बनणार सर्वात तरुण मुख्यमंत्री

देशातील कोणत्याही राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनणार?

bihar election 2020 results if tejasvi yadav wins then he will be the youngest cm of any state

बिहार निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. अनेक एक्झिट पोलमध्ये महागठबंधनचे सरकार येणार असल्याचे दिसून आले आहे. एक्झिट पोलनुसार निकाल आले तर राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव भारतातील सर्वात तरुण मुख्यमंत्री बनतील. शिवाय, अजून तीन रेकॉर्ड तेजस्वी यादव आपल्या नावावर करु शकतात.

बिहारमध्ये जर तेजस्वी यादव यांची सत्ता आली तर तेजस्वी यादव बिहार आणि देशातील सर्वात तरुण मुख्यमंत्री बनतील. शिवाय, बिहारमध्ये एकाच परिवारातील तीसरे मुख्यमंत्री बनतील. तसेच आई-वडील यांच्यानंतर मुलगा म्हणून तेजस्वी मुख्यमंत्री बनणारे पहिले ठरतील.

तेजस्वी यादव यांचा जन्म ९ नोव्हेंबर १९८९ रोजी झाला असून गेल्या ९ नोव्हेंबरला ३१ वा वाढदिवस साजरा केला. आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर एम. ओ. एच. फारुक हे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले होते. फारुक हे १९६७ मध्ये २९ वर्षाचे असताना पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री बनले होते. परंतु पुदुच्चेरी हे केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री बनले होते. त्यामुळे तेजस्वी यादव ३१ व्या वर्षी मुख्यमंत्री बनले तर कोणत्याही राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनण्याचा रेकॉर्ड करु शकतात.

तेजस्वी यादव की नितीश कुमार? कोण किती जागांवर आघाडीवर?

मतमोजणीच्या काही फेऱ्या पार पडल्यानंतर निवडणूक आयोगाच्या माहिती प्रमाणे २४३ जागांपैकी १६१ जागांचे कल हाती येताना दिसत आहेत. यात एनडीए ८१ जागांवर आघाडीवर आहे. यात भाजप ४२, जदयू ३४, विकसनशील इन्सान पार्टी ५ जागांवर आघाडीवर आहे. दुसरीकडे महाआघाडी ७५ जागांवर आघाडीवर आहे. यात राजदने ५१ जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस १३ आणि डावे ११ जागांवर आघाडीवर आहेत. बसपा एका जागेवर आघाडीवर आहे. लोजपा दोन, एमआयएमआयएम आणि अपक्ष प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर आहे.