पूरसंकटात महाराष्ट्राला केंद्रातून दिलासा; मुख्यमंत्र्यांशी संवाद साधल्यावर मोदींचे मराठीत ट्वीट

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशातील आणखी काही राज्यांमध्ये अवकाळी पावसामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील या राज्यांवर लक्ष ठेवून आहेत. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा मधील पूरस्थितीचा आढाव घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही फोनवरून संवाद साधला. त्यानंतर त्यांनी मराठीतून ट्विट करत सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले.

काय म्हणाले पंतप्रधान 

महाराष्ट्रात झालेली अतिवृष्टी आणि पूरस्थितीबाबत मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो. आपत्तीग्रस्त बंधू-भगिनींबरोबर माझ्या सहवेदना आहेत. बचाव आणि मदतकार्यामध्ये केंद्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल असे आश्वासन मी पुन्हा एकदा दिले.

परतीच्या पावसाने तडाखा दिल्याने महाराष्ट्रात गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. या मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे पुणे विभागातील पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आतापर्यंत २९ जणांचा मृत्यू झाला आहे तर ८ जण बेपत्ता आहेत. या भागात घरांचीही मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून हातातोंडाशी आलेली पिकेही जमीनदोस्त झाली आहेत. अनेक संसार उघड्यावर पडले आहेत. शेतकरी हवालदील झाला आहे. या पार्श्वभूमीवर ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आजच केली आहे. दुसरीकडे राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महाराष्ट्रावर कोसळलेलं पूरसंकट पाहता केंद्राने भरीव मदत करावी, अशी मागणी केली आहे.

हेही वाचा –

थांबा होsss! महिलांच्या लोकल प्रवासाचं अजून ठरलं नाही!