पंतप्रधान मोदींमुळे देशात पहिल्यांदा मंदी; राहुल गांधींचा घणाघात

काँग्रेसचे माजी अध्यत्र खासदार राहुल गांधी यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले आहे. भारत पहिल्यांदाच आर्थिक मंदीत प्रवेश करत आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी जीडीपीच्या आकड्यांचा संदर्भ देताना पंतप्रधान मोदी यांनी देशाची शक्ती कमकुवत केली आहे, असा घणाघात केला आहे.

राहुल गांधी यांनी गुरुवारी एक ट्विट करत मोदींवर हल्ला चढवला आहे. “इतिहासात प्रथमच भारत मंदीच्या सापळ्यात अडकला आहे. मोदींच्या कृतीमुळे भारताची शक्ती दुर्बल झाली आहे.” रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या हवाल्यानुसार राहुल यांनी आपल्या ट्विटबरोबर एक बातमीही शेअर केली आहे की, २०२०-२१ या वित्तीय वर्षात पहिल्या सहामाहीच्या शेवटी भारत कदाचित इतिहासात पहिल्यांदाच मंदीच्या विळख्यात सापडणार आहे. भारतीय रिझर्व बँकेच्या अनुमानानुसार, वित्तीय वर्ष २०२०-२१ च्या दुसऱ्या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर) आर्थिक विकास दर नकारात्मक राहिलेला आहे. जीडीपी दर दुसऱ्या तिमाहीत -८.६ टक्के इतका घसरला आहे.

राहुल गांधी हे सातत्याने नोटाबंदी, लॉकडाऊन आणि सरकारच्या इतर आर्थिक निर्णयांवर सातत्याने बोलत आहेत. ८ नोव्हेंबरला नोटबंदीला ४ वर्ष पूर्ण झाली आहेत. राहुल गांधींनी मोदींच्या या निर्णयाचा चांगलाच समाचार घेतला. मोदी सरकारचा हा निर्णय गरीबांवर प्रहार करणारा आणि भांडवलदारांना फायदा देणारा असल्याचे म्हटले होते. लॉकडाउनचा निर्णय देखील योग्य वेळी घेतला गेलेला नाही. या कारणामुळे मोठ्या प्रमाणात मजुरांनी स्थलांतर केले. याबरोबरच अर्थव्यवस्थेला जबर मार बसल्याचे त्यांनी म्हटलेले आहे.