जिओने फेसबुकच्या सहकार्याने सुरू केली ‘डिजीटल उडान’ मोहिम

यामध्ये जिओ फोनचे फीचर्स, विविध अॅप्सचा वापर कसा करावा याबाबत टिप्स दिल्या जाणार

Mumbai

रिलायन्स जिओने बुधवारी देशात पहिल्यांदा इंटरनेट वापरकर्त्यांसाठी एक डिजिटल साक्षरता मोहिमेची घोषणा केली आहे. देशातील इंटरनेट साक्षरतेला गती देण्यासाठी रिलायंस जिओने ‘डिजीटल उडान’ही मोहिम फेसबुकच्या सहकार्याने सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत प्रत्येक शनिवारी सुरक्षित इंटरनेट वापराचे प्रशिक्षण जिओ युजर्सना दिले जाणार आहे.

या मोहिमे संदर्भातील माहिती बुधवारी कंपनीकडून देण्यात आली असून, यामध्ये जिओ फोनचे फीचर्स, विविध अॅप्सचा वापर कसा करावा याबाबत टिप्स दिल्या जाणार आहेत.

जिओच्या या मोहिमेअंतर्गत युजर्सना ऑडिओ आणि व्हिडिओ माध्यमातून १० भाषांमध्ये प्रशिक्षण दिले जाणार असून यासाठी जिओने फेसबुकसोबत भागीदारी केली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये ही मोहिम देशातील १३ राज्यांमध्ये २०० ठिकाणी सुरू करण्यात येईल. त्यानंतर येणाऱ्या काही महिन्यात ७००० ठिकाणी ही मोहिम सुरू होईल. यात इंटरनेट साक्षरतेला अतिशय मनोरंजनात्मक पध्दतीत सादर करण्यात येणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.

भारतीय ग्राहकांना डिजिटल लाइफचा उत्तम अनुभव मिळावा यासाठी जिओ नेहमीच प्रयत्नशील आहे. १००% डिजिटल साक्षरतेसाठी देशातील प्रत्येक शहरात आणि गावात ही मोहिम घेऊन जाण्याचा संकल्प करण्यात आला आहे, अशी माहिती रिलायंस जिओचे संचालक आकाश अंबानी यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here