जामीन मिळाला त्यांनी आनंद घ्या!

तुरुंगात टाकायला आणीबाणी नाही

Mumbai
Swearing in ceremony of NDA government
पंतप्रधान नरेंद्र मोदींची काँग्रेसवर टीका

उठसूठ कोणालाही तुरुंगात टाकायला ही काही आणीबाणी नाही. त्यामुळे ज्यांना जामिन मिळाला आहे त्यांनी आनंद घ्यावा, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभारप्रदर्शन करताना काँग्रेसला लगावला.

सोमवारी काँग्रेसचे खासदार अधीर रंजन यांनी मोदी आणि भाजप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी भ्रष्टाचारी असल्याचे आरोप करत दोनवेळा सत्तेवर आले आहे. जर ते चोर असतील तर संसदेत कसे बसलेत, त्यांना तुरुंगात का टाकत नाही, असा सवाल मोदींना केला होता. त्यावर मोदींनी मंगळवारी काँग्रेसवर जोरदार टीका केली.

आम्हाला अशासाठी दोषी धरले जात आहे की काही लोकांना आम्ही तुरुंगात टाकले नाही. ही काही आणीबाणी नाही की सरकार कोणालाही तुरुंगात डांबेल. ही लोकशाही आहे आणि न्यायव्यवस्था त्याचा निर्णय घेईल. आम्ही कायद्याला त्याचे काम करायला देतो. जर कोणाला जामिन मिळाला असेल त्याने आनंद घ्यावा. आम्ही बदला घेण्यावर विश्वास ठेवत नाही पण भ्रष्टाचाराच्या विरोधात लढाई जरूर सुरू ठेवणार. आम्हाला देशाने एवढे दिले आहे की चुकीच्या रस्त्यावर जाण्याची गरज नाही, असे मोदी म्हणाले.

संसदेत सांगितले गेले की, माझी उंची कोणी मोजू शकत नाही. पण आम्ही अशी चूक कधीच करणार नाही. मी कोणाची रेषा छोटी करण्यावर विश्वास ठेवत नाही, तर आपली रेषा मोठी करण्यावर जीवन खर्ची घालतो. तुमची उंची तुम्हालाच लखलाभ. तुम्ही एवढ्या उंचीवर गेलात की पायाखालची जमीन दिसणे बंद झाले आहे. तुमची उंची आणखी वाढल्यास मला आनंदच होईल. आमचे स्वप्न उंच होण्याचे नसून मुळांशी जोडण्याचे आहे. या स्पर्धेत उलट आमच्या शुभेच्छाच आहेत, अशी टीका मोदी यांनी केली.

भ्रष्टाचारविरोधी लढा सुरूच रहाणार
२०१४ मध्ये मागील सरकारपासून मुक्तता मिळवण्यासाठी आम्हाला जनतेने निवडून दिले, पण यावेळी आमची पाच वर्षांतली कामे पाहून आम्हाला मागील वेळेपेक्षाही अधिक बहुमताने निवडून दिले. भ्रष्टाचारविरोधातला आमचा लढा सुरूच राहणार असे आश्वासन मोदी यांनी यावेळी दिले.

डाग मिटणारा नाही….
25 जूनच्या रात्री देशाचा आत्मा चिरडला होता. यामुळे लोकांना या दिवशी काय असते याची माहिती आहे. भारतातील लोकशाही ही काही संविधानाच्या पानांतून तयार झाली नाही, तर ती कित्येक वर्षांपासून चालत आलेली आहे. प्रसारमाध्यमांना दाबण्यात आले. महापुरुषांना तुरुंगात डांबण्यात आले. देशालाच तुरुंग बनविण्यात आले होते. न्यायव्यवस्थेचा अपमान कसा करावा याचे जिवंत उदाहरण होते. हा डाग कधीच मिटणारा नाही, असे मोदी यांनी ठामपणे सांगितले.

हिना गावित, डॉ. अमोल कोल्हेंचे कौतुक
पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातील खासदार हिना गावित आणि डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या भाषणाचा त्यांच्या नावासह कौतुक केले. हिना गावित यांनी आदिवासी संदर्भात मांडलेले मुद्दे आणि खासदार सारंगी यांचे भाषण ऐकल्यानंतर आता मी काय बोलू, असा प्रश्न मला पडला आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here