माजी निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांचं निधन

देशातील निवडणूक प्रणालीचा चेहरामोहरा बदलणारे माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांचं काल रात्री ह्रदयविकाराच्या झटक्याने चेन्नईत निधन झालं. ते ८५ वर्षाचे होते.

Chennai
-t-n-seshan
भारताचे माजी निवडणूक आयुक्त टी.एन.शेषन

देशातील निवडणूक प्रणालीचा चेहरामोहरा बदलणारे माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांचं काल रात्री ह्रदयविकाराच्या झटक्याने चेन्नईत निधन झालं. ते ८५ वर्षाचे होते. राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. टी. एन. शेषन यांच्या निधनाने खूप दुःख झाल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरुन व्यक्त केली आहे. त्यांच्या निधनाने प्रामाणिक आणि कर्तव्य दक्ष प्रशासक गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.

भारतीय निवडणूक प्रक्रिया पारदर्शक केली

भारतीय निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणत निवडणूक प्रक्रिया बदलण्याचं श्रेय टी. एन. शेषन यांना दिलं जातं. तीन-चार टप्प्यात मतदान घेणे, मतदारांसाठी ओळखपत्र तयार करणे आदी महत्त्वपूर्ण कल्पनासुद्धा त्यांनीच मांडल्या. तसेच अंमलातसुद्धा आणल्या. १९९०-१९९६ या काळात त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कारभार सांभाळला होता. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना १९९६ मध्ये रेमन मॅगसेस पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं होतं. १९९७ मध्ये त्यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढली होती. पण माजी राष्ट्रपती के. आर. नारायणन यांनी त्यांचा पराभव केला होता.

स्मृतिभ्रंशाचा त्रास, काही काळ वृद्धाश्रमात

टी.एन. शेषन यांना स्मृतिभ्रंशाचा त्रास होता. त्यामुळे त्यांच्या घरच्यांनी त्यांना घरापासून ५० किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या वृद्धाश्रमात ठेवले आहे. तीन वर्ष वृद्धाश्रमात घालविल्यानंतर ते घरी आले. मात्र घरात करमत नसल्याने ते संपूर्ण दिवस वृद्धाश्रमातच घालवत. गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या शेषन यांनी राहत्या घरी अंतिम श्वास घेतला.