Pfizer कंपनीचा दावा; ९० टक्क्यांहून अधिक प्रभावी Corona लस

प्रातिनिधीक फोटो

देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव अद्याप सुरू असून कोरोनावरील लस कधी येणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. दरम्यान कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाट येणार अशी देखील चर्चा सुरु आहे. अशा परिस्थितीत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. अमेरिकेतील फायझर या औषध कंपनीने दावा केला आहे की, कोरोनावरील लस ९० टक्के प्रभावी असून फायझर आणि जर्मन बायोटेक्नॉलॉजी फर्म BioTech यांनी विकसित केलेली कोरोना व्हायरस लस ९० टक्क्यांहून अधिक प्रभावी आहे.

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत पराभूत झालेले डोनाल्ड ट्रम्प यांनी लवकर कोरोना लस येणार असल्याचे ट्वीट केले आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, लवकरच कोरोनावरील लस येणार असून लस ९० टक्के प्रभावी आहे आणि ही आनंदाची बातमी आहे.

वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगभरात आतापर्यंत ५ कोटी ७ लाख लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर आतापर्यंत ३ कोटी ५७ लाख रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुळे जगभरात १२ लाख ६१ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. जगभरात कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता १ कोटी ३६ लाखांवर पोहोचली आहे.

कोविड १९ वर लक्ष ठेवून असणाऱ्या अमेरिकन युनिव्हर्सिटी ‘जॉन हॉपकिन्स’ च्या म्हणण्यानुसार, रविवारी जगातील कोरोना व्हायरसच्या रुग्णांचे प्रमाण वाढून ५.२ कोटींच्या पार गेले आहेत. जगभरात कोरोना व्हायरसमुळे १२ लाखांहून अधिक लोक मरण पावले आहेत. ‘जॉन हॉपकिन्स’ विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत कोरोना व्हायरसचे सर्वाधिक ९८ लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत २ लाख ३७ हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे.