बिहार निवडणुकीतील उपमुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स कायम

भाजपने उपमुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही.

bihar election 2020

बिहार निवडणुकीनंतर एनडीएचे नेते म्हणून रविवारी नितीश कुमार यांनी राज्यपाल फागू चौहान यांच्यासमोर सत्तास्थापनेचा दावा सादर केला. नितीश कुमार यांनी १२६ आमदारांच्या समर्थनाचे पत्र राज्यपालांकडे दिले. नितीश कुमार हे जरी मुख्यमंत्री होणार असले तरी बिहारचे उपमुख्यमंत्री कोण हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. भाजपने उपमुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही.

राज्यपालांच्या भेटीनंतर नितीश कुमार यांनी मीडियाला सांगितले की, भाजपच्या एखाद्या नेत्याने यावेळी मुख्यमंत्री व्हावे, अशी माझी इच्छा होती परंतु, लोकांनी मलाच मुख्यमंत्री होण्यासाठी आग्रह केला. म्हणून आपण खुर्ची स्वीकारल्याचे नितीशकुमार यांनी म्हटले आहे.

‘एनडीएच्या बैठकीत नेता म्हणून माझी निवड करण्यात आली. त्यानंतर आम्ही राज्यपालांसमोर सत्तास्थापनेचा दावा केलाय. उद्या सायंकाळी ४.०० वाजता शपथविधी सोहळा पार पडणार आहे’ अशी माहिती नितीश यांनी दिली. राज्यात पर्यवेक्षक म्हणून आलेल्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना बिहार उपमुख्यमंत्री पदाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावेळी, ’योग्य वेळ आल्यानंतर सगळ्यांना माहीत होईलच. उपमुख्यमंत्री आम्ही सगळे मिळून निश्चित करू. सगळी माहिती थोड्याच वेळात समोर येईल’ असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं. बिहारचे याअगोदरचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी, प्रेमकुमार, कामेश्वर चौपाल हे तिघांत उपमुख्यमंत्री पदाची रस्सीखेच सुरू आहे.