घरदेश-विदेशनागरिकत्व दुरुस्ती कायदा विरोधात दिल्लीतही हिंसक आंदोलन

नागरिकत्व दुरुस्ती कायदा विरोधात दिल्लीतही हिंसक आंदोलन

Subscribe

नागरिकत्व दुरुस्ती कायदा लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यानंतर ईशान्य भारतात या कायद्याविरोधात आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचे रुपांतर आता हिंसाचारात झाले असून आंदोलकांनी जाळपोळ करायला सुरुवात केली आहे. गेल्या आठवड्यापासून ईशान्य भारतातील आसाम, मिझोराम, त्रिपुरा, सिक्कीमसह सात राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सरकारी मालमत्तेचे नुकसान आंदोलकांकडून केले जात आहे. सरकारी बस सर्रासपणे जाळल्या जात आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात पेटलेली ही आग आता दिल्लीतही पोहोचली आहे. रविवारी दुपारी काही आंदोलक विद्यार्थ्यांनी रास्ता रोको करत तीन बस पेटवून दिल्या.

काय आहे प्रकरण?

गेल्या तीन दिवसांपासून जामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे दिल्लीत आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला आज हिंसक वळण लागले. आंदोलक विद्यार्थ्यांनी तीन बस आणि काही दुचारी पेटवून दिल्या. या घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. सध्या परिसरातील परिस्थिती नियंत्रणात आली असल्याची माहिती समोर येत आहे. जामिया मिलिया इस्लामिया हे केंद्रीय विद्यापीठे आहेत.

- Advertisement -

जामिया हा परिसर दक्षिण दिल्लीत येतो. या परिसरात आता पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या परिसरात आपचे नेते अमानतुल्ला खान यांनी देखील रविवारी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात निदर्शने केली. त्यामुळे त्यांनी विद्यार्थ्यांना भडकवण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. यावर अमानतुल्ला यांनी आपण शांततेत आंदोलन केले असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर हिंसाचाराशी आपला काहीच संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, ही हिंसा विद्यार्थ्यांनी केली की काही समाजकंटकांनी केली याबाबत अजून स्पष्टता झालेली नाही.

घटनेचे पडसाद

याप्रकरणानंतर जामिया परिसरातील पाच मेट्रो स्टेशन बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. दक्षिण दिल्लीतील हा परिसर प्रचंड गर्दीचा परिसर आहे. त्यामुळे या हिंसाचाराचा फटका तेथील नागरिकांना देखील बसत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -