घरगणपती उत्सव बातम्याGanesh Chaturthi 2018: शान मुंबईची...

Ganesh Chaturthi 2018: शान मुंबईची…

Subscribe

अवघ्या काही दिवसांवर येऊन ठपलेल्या लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात मंडपात बाप्पा विराजमान होऊ लागला असून आता सर्वांचे लक्ष मुंबईतील प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळावर लागून राहिले आहे. असंख्य गणेशभक्तांचे श्रध्दास्थान असणार्‍या लालबागाच्या राजा गणेशोत्सव मंडळाप्रमाणे मुंबईतील अनेक गणेशोत्सव मंडळांचे देखावे आणि गणेशमुर्तीं सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. अशा या मुंबईतील शान असलेल्या गणेशोत्सव मंडळात यंदा कोणत्या नवीन गोष्टी पहायला मिळणार आहे, याबाबत घेतलेला हा आढावा...

मुंबईतील प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळं

काळाचौकीचा महागणपती

काळाचौकी येथील काळाचौकीचा महागणपती अशी ख्याती असलेलं मंडळ म्हणजेच काळाचौकी सार्वजनिक उत्सव मंडळ, यंदाच्या वर्षी लहान मुलांसाठी छोटा भीमची ढोलकपूर नगरी साकारणार असणार आहे. यंदाचे हे मंडळाचे ६३ वे वर्ष आहे. हा देखावा कलादिग्दर्शक अभिषेक शेलार या तरुणाच्या संकल्पनेतून साकार होणार आहे. छोटा भीम सोबत छुटकी, कालिया, गोलू भोलूसुद्धा असणार आहेत.

- Advertisement -

मुंबईचा राजा

आपली मुंबई उंच गणेश मूर्तींसाठी आणि सजावटीसाठी ओळखली जाते. मात्र ही ओळख निर्माण करण्यासाठी मोलाचा वाटा आहे तो म्हणजे मुंबईच्या राजाचा म्हणजेच लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेशगल्ली या मंडळांचा. मनमोहक देखाव्यांसाठी गणेश गल्लीचा गणपती ओळखला जातो. दरवर्षी हे मंडळ गणेश भक्तांसाठी नवनवे देखावे साकारते. देशातील विविध तीर्थक्षेत्रांचे दर्शन या मंडळाकडून घडवण्यात येते. यंदाही ग्वाल्हेरच्या सूर्यमंदिरात गणेश गल्लीचा गणपती विराजमान होणार आहे. सुंदर अशा नयनरम्य देखाव्यात या राजाचे रुप भक्तांना पाहायला मिळणार आहे.

लालबागचा राजा

मुंबईसह देशविदेशातील गणेश भक्तांचे श्रद्धास्थान असणारा लालबागचा राजा तब्बल ३० वर्षांनंतर या वर्षी प्रभावळीना विराजमान होणार आहे. महत्वाची बाब म्हणजे यंदा पर्यावरण स्नेही अशी लालबागच्या राजाची सजावट असणार आहे. या सोबत ऑगमेंटेड रिऍलिटी या तंत्रज्ञानाचा वापर करून यंदा धबधबे, मोर, वाघ अशा वन परिसराचा देखावा पाहायला मिळणार आहे.

- Advertisement -

चिंचपोकळीचा चिंतामणी

गिरणगावातील शतक महोत्सवाच्या उंबरठ्यावर असलेल्या चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ म्हणजेच ’चिंचपोकळी चा चिंतामणी’ या नावाने प्रसिद्ध असणार्‍या उत्सव मंडळाची स्थापना १९२० साली लोकमान्य टिळकांचा आदर्श ठेवून करण्यात आली. त्यावेळी सोन्याचा धूर ओतणार्‍या गिरणगावातील गिरणी कामगार श्री. दत्ताराम पुजारे, श्री. बसनाक मास्तर यांच्या सारख्या कामगारांनी लोकमान्य टिळकांचा आदर्श ठेवून त्यांच्या प्रेरणेने चिंचपोकळी च्या चिंतामणी ची स्थापना केली. गणेशोत्सवाच्या काळात जमणार्‍या लोकवर्गणीतील ४० टक्के निधी हा गणेशोत्सवासह, नवरात्रोत्सव आणि शिवजयंती यांसारख्या उत्सवावर खर्च होतो तर उर्वरित ६० टक्के निधी समाजकार्यासाठी वापरला जातो. गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजसेवेचा पायंडा याच मंडळाने पाडला. पुढे तो अनेक मंडळांनी स्वीकारला. चिंचपोकळी च्या चिंतामणी ला २०११ मध्ये ’मुंबईचा राजा’ या किताबाने गौरविण्यात आले. या वर्षी मंडळ तंजावर मधील बृहदेश्वर मंदिराचा देखावा सादर करणार आहे. बृहदेश्वर मंदिर म्हणजे दक्षिण भारतातील सर्वात मोठ्या मंदिरापैकी एक आहे आणि संपूर्ण द्रविड वास्तुकलाचे एक आदर्श उदाहरण आहे. चिंतामणी ची सुबक मूर्ती रेश्मा विजय खातूू या साकारणार असून श्री. अमन विधातेे यांंच्या कला दिग्दर्शनातून बृहदेश्वर मंदिराचा देखावा सादर होणार आहे. दरवर्षी चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ महाराष्ट्रातील एका खेडेगावात आरोग्य शिबिरासह मोफत औषध वाटपाचे काम आणि आदिवासी पाड्यामधे जाऊन जीवनावश्यक वस्तूंचे वाटप तेथील कुटुंबियांना करीत असते.

गिरगावचा राजा

मुंबईत गेले ९१ वर्ष शाडूमातीच्या मूर्ती ची परंपरा जोपासणारा पर्यावरणाचा राजा अशी ख्याती असलेला गिरगावचा राजाचे हे मंडळ आहे. पाटकर परिवाराच्या चौथी पिढीचे मूर्तीकार राजन पाटकर यंदा राजाची मूर्ती साकारणार आहेत. खड्डे मुक्त मंडप उभारणारे मंडळ, संपूर्ण इकोफ्रेंडली मूर्ती असल्यामुळे गेल्या वर्षी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन कि बात या कार्यक्रमात देखील या मंडळाचे कौतूक केले होते. यंदाच्या भक्तांना आपल्या राजाचे एक वेगळेच रूप पाहायला मिळणार आहे. या सोबतच यंदा मंडळात प्लास्टिक कलेक्शन सेंटर हा मुख्य उपक्रम असणार आहे.

जीएसबी सेवा मंडळ

मुंबईतील किंग सर्कल येथील जीएसबी सेवा मंडळ हा एक सर्वात मोठा मानाचा गणपती म्हणून ओळखला जातो. मुंबईतील सर्वात श्रीमंत मंडळ अशी या मंडळाची ओळख आहे. संपूर्ण पारंपरिक पद्धतीने या बाप्पांची पूजा केली जाते. बाप्पांची संपूर्ण आरास दागिने सोन्याचांदीचे असतात. या सोबतच संपूर्ण मूर्ती शाडू मातीची बनवली जाते.

अंधेरीचा राजा

मुंबईतील नवसाच्या गणपतींमध्ये मनाचा एक गणपती म्हणजे अंधेरीचा राजा. मुंबईतील सामान्य गणेश भक्तांपासून सिने अभिनेत्यांपासून राजकीय पक्षातील अनेक दिग्गज मंडळी येथे दर्शनाला येतात. हा गणपती फक्त १० दिवसांसाठी भक्तांच्या दर्शनासाठी न येता तब्बल २१ दिवसांसाठी विराजमान होतो. या गणपतीचे विसर्जन अनंत चतुर्दशीला ना होता त्यानंतर येणार्‍या संकष्टीला केले जाते.

गणेशोत्सव मंडळाची शतकी परंपरा

केशवजी नाईक चाळ, गिरगाव

लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने हा उत्सव सुरू केला त्या उद्देशाचा आदर्श ठेवून परिपूर्ण उत्सव साजरा करण्याची परंपरा गिरगावातील केशवजी नाईक चाळीने जोपासली आहे. यावर्षी या चाळीचे यंदा १२४ वे वर्ष आहे. १९३५ साली अस्तित्वात आलेल्या घटनेनुसारच या गणेशोत्सवाचे कामकाज आजही चालू आहे. कोणताही डीजे, प्रसिद्धी वलय या सगळ्यात न पडता बाप्पांची लहानशी मूर्ती आणूनच केशवजी नाईक चाळीमध्ये आजही हा उत्सव साजरा करण्यात येत आहे. साधेपणा हाच या उत्सवाचे आणि या मंडळाचेही वैशिष्ट्य आहे. तरुणवर्ग सर्वच बाबतीत उत्साहाने यात भाग घेत असून दरवर्षीच साधेपणा जपण्यावर या मंडळाचा जास्त कल असतो. तर ढोल – पथकाची वेगळी ओळख असून या मिरवणुकीचे वैशिष्ट्य हे ढोलताशा पथक असते.

कामत चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, ठाकूरद्वार

समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे, कामगार चळवळीतील अग्रणी श्रीपाद अमृत डांगे अशा मान्यवर मंडळींचे वास्तव्य असणार्‍या कामत चाळीचे यंदाचे १२३ वे वर्ष आहे. गिरगावातील केशवजी नाईक चाळीनंतर दुसरा मानाचा गणपती हा कामत चाळ आणि जगन्नाथ चाळीतील धर्मैक्य संरक्षक संस्थेचा मानला जातो. आजही पारंपरिक पद्धतीने पालखीतून अगदी छोटी गणपतीची मूर्ती आणण्यात येत असून गणपतीचा संपूर्ण उत्सव हा सगळेजण अगदी गुण्यागोविंदाने साजरा करतात. मंडळातील कार्यकर्तेच मंडप बांधतात. बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी मोदकाच्या आकाराची फुलाची वाडी तयार केली जाते. विसर्जन मिरवणुकीत हे एक खास आकर्षण आहे.

धर्मैक्य संरक्षक संस्था, जगन्नाथ चाळ

 

पारंपरिक पद्धतीने बाप्पांचं आगमन जगन्नाथ चाळीतील रहिवासी करतात. तर या संस्थेचे देखील हे १२३ वे वर्ष आहे. सध्या बर्‍याच लोकांना वेळ नसतो. मात्र गणपतीच्या दिवसांत चाळ सोडून गेलेले रहिवासी देखील एक दिवस काढून महाप्रसादाला सर्वांना भेटायला येतात. महाप्रसाद करण्याचे हेच मोठे प्रयोजन आहे. जेणेकरून लोक एकमेकांना पुन्हा भेटू शकतील. सध्या मंडळामध्ये कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांची ही चौथी पिढी आहे. पूर्वापार चालत आलेली परंपरा आजही तशीच जपली जाणे हा या चाळीतील रहिवाशांचा प्रमुख उद्देश आहे आणि अजूनही त्याच उद्देशाने हा गणेशोत्सव चालू आहे.

इंद्रवदन सोसायटी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, शिवाजी पार्क

इंद्रवदन सोसायटीचे हे शतकमहोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे यावर्षी अनेक मान्यवरदेखील या गणेशोत्सवामध्ये उपस्थिती लावणार आहेत. या महोत्सवासाठी महापौर विश्वनाथ महाडेश्वर तसेच या वास्तूत वास्तव्य केलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची देखील यंदा उपस्थिती राहणार आहे. इंद्रवदन सहनिवासातील गणेशोत्सवात सुमारे दीडशेहून अधिक कुटुंबे यात सहभागी होतात. शिवाय इथून बाहेर पडलेली कुटुंबे तसेच लग्न झालेल्या माहेरवाशिणी देखील उत्सवात सहभागी होणार असून त्यांच्यासाठी खास कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. इतकेच नाही तर, राष्ट्रीय किर्तनकार चारूदत्त आफळे, राशीचक्रकार शरद उपाध्ये, शरद पोंक्षे, दिलीप प्रभावळकर, सत्यजित पाध्ये इतर मान्यवरांचे कार्यक्रमदेखील आयोजित करण्यात आले आहेत.

अशी सजली बाजारपेठ

सणासुदीचे दिवस आल्यावर दादरच्या घाऊक बाजारपेठा गजबजून जातात. आता गणपतीच्या आगमनापूर्वीच दादरमध्ये उत्सवाचे वातावरण आहे. देखाव्यातील रंगबिरंगी लुकलुकणार्‍या विजेच्या तोरणांपासून देखाव्याचे सामान, फुलबाजार, फळबाजार बहरून येतो. दादरच्या फुलबाजारात म्हणजे माँसाहेब मीनाताई ठाकरे फुलबाजारात असंख्य रंगबिरंगी फुलांची आवक सुरू झाली आहे. खास करून पालघर, ठाणे, पुणे, तळेगाव, नाशिक, सातारा जिल्ह्यापासून कर्नाटकमधून आवक सुरू झाली आहे. संपूर्ण मुंबई साखरझोपेत असताना पहाटे चार वाजता दादरचा फुलबाजार बहरतो. वसई, विरार, पालघर, विक्रमगडचे शेतकरी व व्यापारी शेवंती, जास्वंद, कागडा, नेवाळी, तगर, मोगरा, सायली, चमेली बेल, तुळस, केळीचे खांब घेऊन विक्रीसाठी येतात. केवळ फुले नाहीत तर फुलपुड्या बांधण्यासाठी लागणारी पाने, दोरा यांचीही उलाढाल वाढते. पुढील आठवड्यात फुलांची आवक आणखी वाढेल. व्यापार्‍यांच्या भाषेत सांगायचे तर गणपती, दिवाळी, दसरा सोडून इतर काळात आमचा ऑफ सिझन असतो. ऑफ सिझनमध्ये या बाजारात आठ ते दहा टेम्पो येतात तर गणपती, दिवाळी, दसरा या काळात दररोज सरासरी चाळीस ते पन्नास टेम्पो भरून फुले येतात. या बाजाराच्या बाजूला म्हणजे दादर स्टेशनला खेटून आणखी एक फुलबाजार आहे. या बाजारात प्रामुख्याने कट फ्लॉवर विक्रीसाठी येतात. म्हणजे लिलीयम, जरबेरा कॉर्नेशन, ग्लॅडिओला, डच गुलाब, ऑर्किड अशा डेकोरेशनची फुले येतात सिझनच्या काळात पहाटे पाच ते दुपारी बारा आणि दुपारी तीन ते रात्री आठ वाजेपर्यंत कट फ्लॉवरचा बाजार बहरतो. पूर्वी जरबेरा, ऑर्किड, डच गुलाब या फुलांची आवक कर्नाटकमधून होती. पण आता सांगली, सातारा, पुणे, तळेगावमध्ये अनेक शेतकर्‍यांनी पॉली हाऊसमध्ये ही फुले फुलवण्याचा प्रयोग यशस्वी केला आहे. त्यामुळे डेकोरेशनच्या फुलांसाठी आता दुसर्‍या राज्यांवर अवलंबून राहावे लागत नाही.

संकलन – सौरभ शर्मा, धवल सोलंकी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -