घरक्रीडाअब की बार 500

अब की बार 500

Subscribe

लंडनमध्ये आयसीसीने आयोजित केलेल्या वर्ल्डकप कॅप्टनच्या मीडिया कॉन्फरन्समध्ये विराट कोहली इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनला उद्देशून म्हणाला, ‘वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंडचा संघ 500 ची मजल मारु शकेल’. कोहली चेष्टेत असे म्हणाला खरा, पण इंग्लंडमध्ये पाटा खेळपट्ट्यांचे प्रमाण अलिकडे वाढत चालले आहे. गेल्यावर्षी यजमान इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुध्द 6 बाद 481 अशी विक्रमी धावसंख्या रचली होती ती नॉटिंगहॅम टे्ंरट ब्रिजवर. पाक विरुध्दही इंग्लंडने 444 धावांचा डोंगर उभारला होता.

इंडियन पोलिटिकल लीग आणि इंडियन प्रिमियर लीगचा (आयपीएल) तमाशा पार पडल्यानंतर तमाम भारतीयांना आता वेध लागले आहेत ते वर्ल्डकपचे. 30 मे ते 14 जुलै दरम्यान तब्बल 46 दिवस बारावी वर्ल्डकप स्पर्धा इंग्लंड-वेल्समधील 11 विविध स्टेडियम्समध्ये रंगेल. यंदाच्या वर्ल्डकपचे वैशिष्ठ्य म्हणजे स्पर्धेचा ढाचा बदलण्यात आला असून 10 संघांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत गटवार साखळी लढतींना फाटा देण्यात आला असून प्रत्येक संघ एकमेकांशी झुंजतील. 456 सामन्यानंतर अव्वल 4 संघात उपांत्य झुंजी रंगतील. रविवार 14 जुलै रोजी क्रिकेटच्या पंढरीत लॉर्डसवर अंतिम सामना खेळला जाईल.

- Advertisement -

‘अब की बार तीन सौ पार’ ची शानदार त्रिशतकी खेळी करुन मोदी-शहा जोडगोळीने भाजपला घवघवीत यश मिळवून दिले आणि दिल्लीचे तख्त राखले. राजधानी दिल्लीसह सा-या भारतात जल्लोष सुरू असताना, लंडनमध्ये आयसीसीने आयोजित केलेल्या वर्ल्डकप कॅप्टनच्या मीडिया कॉन्फरन्समध्ये विराट कोहली इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनला उद्देशून म्हणाला, ‘वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंडचा संघ 500 ची मजल मारु शकेल’. कोहली चेष्टेत असे म्हणाला खरा, पण इंग्लंडमध्ये पाटा खेळपट्ट्यांचे प्रमाण अलिकडे वाढत चालले आहे. गेल्यावर्षी यजमान इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुध्द 6 बाद 481 अशी विक्रमी धावसंख्या रचली होती ती नॉटिंगहॅम टे्ंरट ब्रिजवर. पाक विरुध्दही इंग्लंडने 444 धावांचा डोंगर उभारला होता.

यंदाच्या स्पर्धेत टोलेजंग धावसंख्या रचल्या जातील. परंतु वर्ल्डकपसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत 370-380 धावांचा पाठलाग करणे सोपे नाही. तसेच कधी कधी 260-270 धावांचा पाठलाग करणे मुष्किल जाते. असे उद्गार कोहलीने काढले. सुरुवातीच्या लढतींमध्ये 300-350 धावा रचल्या जातीलही. परंतु स्पर्धेच्या उत्तरार्धात 250 धावांचे रक्षण करण्यात संघ यशस्वी ठरतील. कारण वर्ल्डकपची बातच और ! दडपणाखाली खेळणे सोपे नसते. अशी पुस्तीही कोहलीने जोडली.

- Advertisement -

यजमान इंग्लंडप्रमाणे विराट कोहलीचा भारतीय संघदेखील जेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. ऑस्टे्रलियाचा जादुई फिरकीपटू शेन वॉर्न इंग्लंडप्रमाणे भारताला अग्रक्रम देतो. दीड महिना चालणा-या या स्पर्धेत प्रत्येक संघाला किमान 9 सामने खेळावे लागतील. यजमान इंग्लंड- दक्षिण आफ्रिका यांच्यातील सलामीची झुंज 30 मे रोजी ओव्हलवर खेळली जाईल.

भारताची सलामीला गाठ पडेल दक्षिण आफ्रिकेशी. 5 जून रोजी साऊदॅम्पटन रोझबौलवर सामना रंगेल. कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा, दिल्लीकर शिखर ढवण या त्रिकुटावर भारतीय फलंदालीची मदार असेल. चौथ्या क्रमांकाच्या खेळाडूबाबत निवड समितीने बराच खल करुन तामिळनाडूच्या विजय शंकरची निवड केली. निवड समितीचे अध्यक्ष मनवा प्रसाद यांनी विजयच्या निवडीचे समर्थन करताना त्याच्या तिहेरी मितीचे (थ्री डायमेंशनल) कौतुक केले. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण (इंग्लंडमध्ये ढगाळ वातावरणात विजयची ‘कामचलाऊ’ गोलंदाजी उपयुक्त ठरेल अशी प्रसाद यांची धारणा आहे) यात विजय माहीर आहे. मनवा प्रसाद यांच्या मताशी सहमत होणे तसे कठीणच. वर्ल्डकपची वारी हुकलेल्या अंबटी रायुडुने थ्रीडी गॉगल लावुन वर्ल्डकप बघणार असल्याचे ट्विट केले. परंतु, बीसीसीआयने रायडवर कारवाई करण्याचे टाळले.

कर्नाटकाच्या लोकेश राहुलचाही भारतीय चमूत समावेश करण्यात आला आहेे तो राखीव सलामी वीर म्हणून. वेळप्रसंगी राहुलदेखील चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो असे सुतोवाच मनवा प्रसाद यांनी केले. चौथ्या क्रमांकासाठी बरेच पर्याय असले तरी याबाबतचा निर्णय दौ-यावरील निवड समिती (कर्णधार विराट कोहली, प्रशिक्षक रवि शास्त्री) घेईल.

रोहित शर्मा, शिखर ढवन या बिनीच्या जोडीने गेल्या 4 वर्षात 2609 धावा रचल्या असून त्यात 8 शतकी भागिदार्‍यांचा समावेश आहे. रोहित शर्मा, विराट कोहली या जोडीने 9 शतकी भागिदार्‍या रचल्या असून भारतीय संघाची भिस्त या त्रिकुटावर आहे. इंग्लंडमध्ये खेळपट्ट्यांचे स्वरुप बदलल्याची चर्चा सुरू असून पाटा खेळपट्ट्या बनवण्याचा आदेशच दिला असावा असे वाटते. चौकार, षटकारांची आतषबाजी बघायला प्रेक्षकांना आवडते.

इंग्लंडमध्ये लहरी हवामान लक्षात घेता सर्व सामन्यात त्रिशतकी धावसंख्या रचली जाणे शक्य नसले तरी 260-270 धावांचा पाठलाग करणेदेखील तितकेसे सोपे जाणार नाही. ढगाळ वातावरणात चेंडू स्विंग होत असल्यामुळे फलंदाजांची कसोटीच लागेल. लंडनचा (लॉर्डस, ओव्हल) अपवाद वगळता ओल्ड ट्रॅफर्ड, एजबॅस्टन, हेडींग्ली, डरहॅम या ठिकाणी चेंडू चांगला स्विंग होतो.

रोहित, शिखर, विराट हे त्रिकुट एकसाथ अपयशी ठरल्यास भारताची अवस्था बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विजय शंकर, धोनी, हार्दिक पंड्या, केदार जाधव, दिनेश कार्तिक अशी भारताची मधली फळी असून धोनीचा अपवाद वगळता अनुभवी, भरवशाच्या फलंदाजांची उणीव भारताला जाणवू शकते. धोनी वयस्कर असून त्याच्या फलंदाजी पूर्वीप्रमाणे सातत्य व जोश याची कमतरता जाणवते. पाचव्या सहाव्या क्रमांकावर धोनी, हार्दिक पंड्या आल्यास नंतर अष्टपैलू जाडेजा, चहल, कुलदीप यादव यापैकी एक तसेच भुमरा, भुवनेश्वर, महमद शमी असा भारतीय संघ असेल.

जसप्रीत भूमरासारखा अनमोल हिरा भारताकडे आहे. सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम तेज गोलंदाजात त्याची गणना केली जाते. कसोटी, झटपट क्रिकेट, टी-20, या क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात त्याने आपली छाप पाडली आहे. गोलंदाजीची अनोखी शैली, भन्नाट वेग ही त्याची वैशिष्ठ्ये. इंग्लंडमधल्या ढगाळ वातावरणात त्याची गोलंदाजी प्रतिस्पर्ध्यांसाठी घातक ठरु शकेेल. महमद शमी, भुवनेश्वर या तेज जोडगोळीने प्रतिस्पर्धांना खिंडार पाडल्यास चहल, कुलदीप यादव यांची फिरकी कितपत भेदक, प्रभावी ठरते यावर भारताचे यशापयश अवलंबून असेल, गोलंदाजीतील विविधता हेच भारताचे बलस्थान.

वर्ल्डकप मोहिमेवर निघालेल्या कोहलीच्या भारतीय संघाकडून जेतेपदाची अपेक्षा करण्यात येत आहे. इंग्लंडमधील पहिल्या दोन वर्ल्डकप स्पर्धेत (1975, 1979) वेंकटराघवन यांच्या भारतीय संघाची कामगिरी विसरण्याजोगीच होती. इंग्लंडमधून भारतीय संघ रिकाम्या हाताने मायदेशी परतला. परंतु, 1983 मध्ये कपिलदेव निखंजच्या भारतीय संघाने चमत्कार घडवताना क्लाईव्ह लॉईडच्या विंडीज संघाचे जेतेपदाच्या हॅटट्रिकचे स्वप्न उधळून लावले. कपिलच्या संघाने प्रुडेन्शियल वर्ल्डकप जिंकला तो 25 जून 1983 रोजी. भारतीय क्रिकेट चाहत्यांना हा सुखद धक्काच होता.

वर्ल्डकप जेतेपदानंतर क्रिकेटच्या लोकप्रियतेत अधिकच भर पडली. झटपट क्रिकेट सामन्यांचा ऊरुस भरवून बीसीसीआयने पैसा कमावला. 1987 चा वर्ल्डकप स्पर्धेचे यजमानपद भारत-पाकिस्तानला लाभले. यजमानांचे आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले. पण कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर इंग्लंड-ऑस्टे्रलिया या अंतिम झुंजेसाठी बंगाली बाबूनी गर्दी केलीच. अ‍ॅलन बोर्डरच्या ऑस्टे्रलियन संघाने इंग्लंडला नमवून रिलायन्स वर्ल्डकपवर आपले नाव कोरले.

1992 च्या वर्ल्डकप स्पर्धेचे यजमानपद ऑस्टे्रलिया-न्यूझीलंडने भूषविले. 9 संघांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेचा ढाचा बदलण्यात आला. यजमान ऑस्टे्रलियन संघ साखळीतच गारद झाला. इमरान खानच्या पाकिस्तानने इंग्लंडला नमवून वर्ल्डकपवर जेतेपदाचेे मोहोर उमटविली. या स्पर्धेनंतर आजतागायत इंग्लंडला वर्ल्डकप स्पर्धेत आपला ठसा उमठवता आलेला नाही. 1999 मध्ये इंग्लंडलाच वर्ल्डकपचे यजमानपद लाभले. पण साखळीतच गारद होण्याची आफत त्यांच्यावर ओढवली.

तब्बल 20 वर्षानंतर वर्ल्डकप स्पर्धेच्या आयोजनाची संधी इंग्लंडला लाभली असून यंदा मात्र त्यांची बाजू मजबूत दिसते. 2010 मध्ये कॅरेबियन बेटांवरील टी-20 वर्ल्डकप स्पर्धा इंग्लंडने जिंकली. आतातर इंग्लंडमध्ये 100 चेंडूंच्या क्रिकेटचे वारे वाहू लागले आहेत. इंग्लीश मोसमाच्या उत्तरार्धात वर्ल्डकप स्पर्धा होत असल्याने खेळपट्ट्या कोरड्या व ठणठणीत असतील. परंतु इंग्लंडमधील लहरी हवामानाचा विचार करता स्विंग, गोलंदाजांना अनुकुलता लाभू शकेल. इयॉन मॉर्गनच्या इंग्लंड संघात जेसन रॉय, जोस बटलर, जो रुट, बेन स्टोक्स, जॉनी बेयरस्टो, टॉम करन सारखे स्फोटक फलंदाज असून मोईन अली, आदील रशीद ही फिरकी जोडगोळी तसे जोफ्रा आर्चर, क्रिस वोक्स ही तेज गोळी मौजूद आहे. इंग्लंडचा संघ कागदावर तरी भक्कम वाटतो. प्रत्यक्ष मैदानात ते कशी कामगिरी करतात याकडे सा-या जगाचे लक्ष असेल.

चार वर्षापूर्वी ऑस्टे्रलिया-न्यूझीलंडमधील वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंडवर सलामीलाच गारद होण्याची आपत्ती ओढवली. केवळ अ‍ॅशेस मालिकेवर भर देऊन चालणार नाही याची जाणीव इंग्लंड क्रिकेट मंडळाच्या धुरिणांना झाली. नव्याने संघाची बांधणी करताना अनेक बदल करण्यात आले. जुन्या नामवंत खेळाडूंना डच्चू देऊन नव्या दमाच्या खेळाडूंची संघात निवड करण्यात आली. त्याचा सकारात्मक परिणाम जाणवला आणि आयसीसी वनडे रँकिंंगमध्ये इंग्लंडने अव्वल स्थानावर झेप घेतली. अलिकडेच पार पडलेल्या पाकिस्तानविरुध्दच्या मालिकेत 4-0 असा विजय संपादताना इंग्लंडनेे प्रत्येक सामन्यात त्रिशतकी मजल मारली.

गेल्या 4 वर्षात इंग्लंडच्या फलंदाजांनी कात टाकली असून त्याला मायदेशातील पाटा खेळपट्ट्याही बव्हंशी जबाबदार आहेत. 36 सामन्यात इंग्लंडने त्रिशतकी मजल मारली. त्यापैकी 14 सामन्यात त्यांनी 350 अथवा त्याहून अधिक धावा केल्या. गेल्या मोसमात त्यांनी 400 हून अधिक धावा दोनदा (481 आणि 444) नोंदवल्या. फलंदाजी हीच इंग्लंडची जमेची बाजू. जोफ्रा आर्चर, क्रिस वोक्स, टॉमकरण असे जलद त्रिकूट इंग्लंडचे आहे. दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, भारत यांच्या इतकी भेदक नसलीतरी प्रतिस्पर्धांचे फलंदाज गारद करण्याची क्षमता इंग्लिश गोलंदाजीत नक्कीच आहे. खेळपट्ट्या फिरकीस अनुकूल ठरल्यास त्याचा फायदा उठविणारे मोईन अली, आदिल रसीद ही फिरकी जोडगोळी कर्णधार मॉर्गनला उपलब्ध असे.

11 पैकी 5 वेळा वर्ल्डकप पटकाविण्याची किमया ऑस्टे्रलियाने केली असून डेव्हिड वॉर्नर, स्टीव स्मित यांच्या समावेशामुळे त्यांची बाजू मजबूत झाली आहे. ऑस्टे्रलियन निवड समितीचे अध्यक्ष टे्रव्हर हॉन्स म्हणाले, वॉर्नर, स्मित यांना वर्षभराच्या बंदीनंतर सूर गवसला. हे ऑस्टे्रलियासाठी शूभवर्तमान. आयपीएलमध्ये 682 धावा पटकावून वॉर्नरने ऑरेेंज कॅप पटकाविली तर स्मिथने न्यूझीलंडविरुध्द सातत्यपूर्ण खेळ केला. पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नॅथन कोल्टर-नाईल या तेज त्रिकूटाला अ‍ॅडम झम्पाच्या फिरकीची साथ लाभेल. ग्लेन मॅक्सवेलसारखा सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू कांगारुंकडे आहे. कर्णधार एरॉन फिंच, यष्टी रक्षक अ‍ॅलेक्स कॅरी सलामी देत उस्मान ख्वॉजा यांच्यावर देखील अ‍ॅास्टे्रलियन फलंदाजीची भिस्त असेल.

वेस्ट इंडीजने (1975, 1979) सलग दोनदा विश्वचषक पटकावला. परंतु त्यानंतर त्यांना जेतेपद तर दूरच राहिला, अंतिम फेरीदेखील गाठता आलेली नाही. जेसन होल्डरच्या विंडीज संघात क्रिस गेल, आंद्रे, रसेलसारखे स्फोटक फलंदाज आहेत. हेटमायर, शाई होप, निकलस पुरनसारख्या युवा प्रतिभावान फलंदाजांचा समावेश आहे.

सर्फराज अहमदचा पाकिस्तान संघ प्रतिस्पर्धांसाठी धोकादायक ठरु शकतो. इंग्लंडकडून त्यांना 4-0 अशा पराभवाला सामोरे जावे लागले. परंतु इंग्लंडला चिवट झुंज देतांना त्यांनीदेखील त्रिशतकी मजल मारली. पाटा खेळपट्ट्यांवर पाकची फलंदाजी बहरत असताना गोलंदाजी मात्र निष्प्रभ ठरली. 16 जून रोजी ओल्ड ट्रॅफर्ड मँचेस्टर येथे होणा-या भारत-पाक सामन्यावर सार्‍यांच्या नजरा असतील. विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानावर 6 विजय संपादले आहेत. यंदा कोहलीचा संघ पाकविरुध्द विजयाची परंपरा कायम राखतो का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. परंतु, भारतीय संघ पाकशी सामना खेळेल का याबाबतचा निर्णय केंद्र सरकार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ घेईल.

केन विल्यम्सनचा न्यूझीलंड संघ उपांत्य फेरी गाठण्याची अपेक्षा आहे. गेल्या विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड उपविजेते ठरले होते. विश्वचषक स्पर्धेत सहा वेळा उपांत्य फेरी गाठण्याची किमया किवीजनी केली असली तरी जेतेपदाने त्यांना कायम हुलकावणी दिली आहे.

दक्षिण आफ्रिकन संघाला ‘चोकर्स’ असे म्हटले जाते. ड्यू प्लेसिसच्या दक्षिण आफ्रिकन संघात डेल स्टेन, कागिसो रबाडा ही तेज जोडगोळी तसेच इम्रान ताहीरसारखा अनुभवी फिरकी गोलंदाज असून तेच दक्षिण आफ्रिकेचे बलस्थान.

माजी विजेता श्रीलंकन संघ कमकुवत वाटतो. लसिथ मलिंग, अँजेलो मॅथ्युजसारख्या अनुभवी खेळाडूंची ही अखेरचीच विश्वचशक स्पर्धा ठरावी. नईबच्या अफगाणी संघाकडून फारशा अपेक्षा नसल्यातरी रशीद खान, नबी या फिरकी दुकलीवर सार्‍यांच्या नजरा असतील.

2019 वर्ल्ड कप भारताचे सामने

तारीख
प्रतिस्पर्धी
ठिकाण
5 जून 2019
दक्षिण ऑफ्रिका
रोझ बॉल, साऊदॅम्प्टन
9 जून 2019
ऑस्टेलिया
ओव्हल, लंडन
13 जून 2019
न्यूझीलंड
टे्ंरट ब्रिज, नॉटिंगहॅम
16 जून 2019
पाकिस्तान
ओल्ड टॅ्रफर्ड, मँचेस्टर
22 जून 2019
अफगाणिस्तान
रोझ बॉल, साऊदॅम्प्टन
27 जून 2019
वेस्ट इंडिज
ओल्ड टॅ्रफर्ड, मँचेस्टर
30 जून 2019
इंग्लंड
एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
2 जुलै 2019
बांगलादेश
एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
6 जुलै 2019
श्रीलंका
हेडिंग्ली, लीडस

-शरद कद्रेकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -