आहार भान: गावठी काकडीचे डोसे

एकेक पदार्थ पहिल्या घासालाच तुमची विकेट घेतात आणि तुम्ही त्याच्या प्रेमात पडता. गावठी काकडीचे डोसे पण याच वर्गातले. माझी प्रिय शेजारीण हेमाने 2-3 वर्षा पूर्वी मला काकडीचे डोसे खिलवले होते. आहाहा, काय त्यांचा लुसलुशीत पणा, पिसाहून हलके, तोंडात घातले की विरघळणारे. पावसाळ्यात मिळणाऱ्या गावठी काकडी ची चव छान असतेच पण तीच काकडी खिसल्यावर आणि वाटून डोशाच्या पिठात घातल्यावर आपण कल्पनाही करू शकत नाही इतकी तिची चव आणि गंध खुलून येतात. पहिल्या पावसात निखरलेला मृद्ग़ंध जसा काही काकडी मध्ये भिनलेला.

Ahar Bhan: Gavthi Cucumber Dosa
आहार भान: गावठी काकडीचे डोसे

प्रत्येक पदार्थाचा आस्वाद हा पंचेंद्रियानी घ्यावा. डोळ्यांनी रंग निरखावा, नाकाने सुगंध घ्यावा आणि हाताने स्पर्श अनुभवावा. मग जिभेने त्याचा आस्वाद घ्यावा.काकडीच्या डोशाचेच बघ ना.

एकेक पदार्थ पहिल्या घासालाच तुमची विकेट घेतात आणि तुम्ही त्याच्या प्रेमात पडता. गावठी काकडीचे डोसे पण याच वर्गातले. माझी प्रिय शेजारीण हेमाने 2-3 वर्षा पूर्वी मला काकडीचे डोसे खिलवले होते. आहाहा, काय त्यांचा लुसलुशीत पणा, पिसाहून हलके, तोंडात घातले की विरघळणारे. पावसाळ्यात मिळणाऱ्या गावठी काकडी ची चव छान असतेच पण तीच काकडी खिसल्यावर आणि वाटून डोशाच्या पिठात घातल्यावर आपण कल्पनाही करू शकत नाही इतकी तिची चव आणि गंध खुलून येतात. पहिल्या पावसात निखरलेला मृद्ग़ंध जसा काही काकडी मध्ये भिनलेला.

पांढऱ्या शुभ्र डोशावर दिसणारा हलक्या पोपटी रंगाचा तो किस, त्याचा मृदू मुलायम स्पर्श …. काकडीची तोंडात रेंगाळणारी चव …
अनुभवायची गोष्ट….
खूप औषधे घेवून जेव्हा तोंड आलेले असते, शरीरातून उष्णतेच्या वाफा निघत असतात आणि नेहमीचं जेवण नकोसे झालेले असते तेव्हा शरीराला थंडावा देणारे हे डोसे खावून बघा. एक समाधानाचे मंद स्मित तुमच्या चेहऱ्यावर येईल😊

साहित्य 
गावठी काकडी – 3
जाडे तांदूळ – 2 कप
मुगडाळ – पाव कप
उडीद डाळ – 1 मूठ
खिसलेला ओला नारळ – पाव कप
चवी नुसार मीठ

कृती
1. जाडे तांदूळ, मुगडाळ आणि उडीद डाळ 3 वेळा धुऊन फिल्टरचे पाणी घालून भिजत ठेवा .

2. चार तासांनी मिक्सर मधून बारीक वाटून घ्या. वाटताना त्यात खिसले ला ओला नारळ, अर्धी काकडी , चवीनुसार मीठ घाला..

3. हे पीठ जास्त आंबावयाचे नाही. 3-4 तास ठेवायचे बस. म्हणजे सकाळी 8 वाजता डाळ तांदूळ भिजवले तर 12 वाजता वाटायचे आणि दुपारी 4 वाजता डोसे काढायचे.

4. डोसे काढण्या साठी एका भांड्यात अर्धे पीठ काढून घ्यावे. त्यात एक काकडी खिसून घालावी. थोडे मीठ घालावे.

5. बिडाचा किंवा नॉनस्टिक तव्यावर थोडे खायचे खोबरेल तेल घालून डोसे काढावेत.

6. चटणी बरोबर गरम गरम खायला द्यावेत😊
नक्की करून बघा.

डॉ . ऋजुता पाटील कुशलकर
[email protected]