पावसाळी आजारांपासून लहान मुलांना सांभाळा

पावसात अनेक आजार डोकंवर काढतात. अशावेळी लहान मुलांची विशेष काळजी घेणे गरजेचे असते.

Mumbai
Maintain small children from rainy diseases
पावसाळी आजारांपासून लहान मुलांना सांभाळा

पावसात मनसोक्त खेळ खेळणाऱ्या लहान मुलांना अनेकदा सर्दी, खोकला, ताप, उलट्या, जुलाब अशा तक्रारी सुरू होतात. अनेकदा हा विषाणूजन्य ताप असतो. मात्र, वेळीच लक्ष दिले नाही, तर मुलांच्या आजारात गुंतागुंत होण्याची शक्यता जास्त असते. पावसाळ्यात होणाऱ्या आजारांपासून बचाव करण्यासाठी लहान मुलांची विशेष काळजी घेतली गेली पाहिजे. पालकांनी घरात डासांची उत्पत्ती होणार नाही याकरिता ठराविक उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. मुंबई सारख्या शहरात पावसाळ्यात पाणी साचण्याच्या घटनांचे प्रमाण वाढल्याने डासांची उत्पत्ती होण्यास पोषक वातावरण तयार होते आणि त्याकारणाने या दिवसात साथीच्या रोगांमध्ये वाढ होते. यापासून लहान मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी तज्ञ डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याचे पालन करून वेळीच तपासणी करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे पावसामुळे जागोजागी पाणी साचते. पाण्याची डबकी तयार होतात. त्यामुळे चिलटे, माशा यांचा प्रादुर्भाव होण्याची भीती असते. त्यामुळे त्यातून विषाणूसंसर्ग होऊ शकतो.

पावसाळ्यात डेंगू, मलेरिया, दस्त, टाइफइड आणि श्वसनासंबंधी विकारांबाबत तक्रारींनी पिडीत बालक रुग्णालयाकडे धाव घेत आहे. घशांसंबधी विकार तसेच ताप असल्यास मुलांना घरगुती उपचार न करता तज्ञ डॉक्टरांकडे घेऊन जावे आणि त्यांच्या सल्ल्याने औषधोपचारा सुरुवात करणे आवश्यक आहे. विषाणुजन्य आजारांची लागण होऊ नये याकरिता पालकांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. अनेक आजार हे अस्वच्छतेमुळे उद्भविणारे असून घरात तसेच आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता राखणे आवश्यक आहे. दुषित पाण्यामुळे देखील लहान मुलांमध्ये साथीच्या आजाराची लागण होत आहे.

डेंगू, मलेरियासारख्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी त्याचे घर तसेच आजाबाजूच्या परिसरात पाणी साचणार नाही याची विशेष खबरदारी घ्यावी. तसेच साचलेल्या पाण्यात डासांची पैदास होऊन आजारांना आमंत्रण दिले जात असल्याने स्वच्छतेची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. मुलांना पोषक आहार देणे ज्यामध्ये व्हिटॅमिन, खनिज तसेच एन्टीऑक्सीडन्ट्सचा समावेश असणे फायदेशीर ठरेल. बाहेरील अन्नपदार्थांचे सेवन करता फळ तसेच भाज्यांचा आहारात समावेश केल्यास मुलांना आजारांपासून दूर ठेवता येईल. त्याचप्रमाणे बाजारातील फळे आणि भाज्या स्वच्छ पाण्याने धुवून मगच वापरात आणाव्यात. तसेच जंक फुडचे सेवन न करणेच योग्य ठरेल.

– डॉ. शकुंतला प्रभु, मेडिकल डायरेक्टर, बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रन आणि डॉ. सुरेश बिराजदार, मदरहुड हास्पिटल, खारघर

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here