राजकारणातला मूलमंत्र!

Mumbai
dokyala shot article
डोक्याला शॉट लेख

साहेब म्हणतात त्याप्रमाणे राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा शत्रू नसतो आणि कुणीच कुणाचा कायमचा मित्र नसतो…म्हणूनच कुणी कुणावर कायम विश्वास ठेवायचा नसतो…
…विश्वासराव कधीच पानिपतात गेले असं अजूनही लोक म्हणतात.
,,,,,,,,,,,,,,,,,,,
राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा शत्रू नसतो आणि कुणीच कुणाचा कायमचा मित्र नसतो…ज्यांना हे कायम कळतं ते कायमचे यशस्वी होतात.
…परवा साहेबांनी सातार्‍यात दोन राजेंना हाच मुलमंत्र समजावून सांगितला…आणि दोन्ही राजे साहेबांना आणि एकमेकांनासुध्दा पटले…
…हे कायमचा शत्रू नसणं आणि कायमचा मित्र नसणं ह्यालाच पटवापटवी म्हणतात…ह्यालाच प्राचीन भाषेत लोक तह म्हणायचे…
…अमित शहांनी महिनाभरापुर्वीच कुणाला तरी पटकण्याची भाषा केली…आणि पटकन महिनाभरात त्यांनाच पटवण्यासाठी ते धावत आले…
…अमित शहांच्या साहेबांनी ज्या साहेबांचा हात पकडून म्हणे राजकारणाची मुळाक्षरं गिरवली, त्या साहेबांना कुणाचा हात कधी पकडायचा आणि कुणाचा कधी सोडून द्यायचा ह्याचं उपजत ज्ञान होतं…
…पण हे हात धरण्याचं आणि हात झटकण्याचं ज्ञान तसं राजकारणातल्या प्रत्येकाला उपजत असतं…केजरीवालसारख्यांनासुध्दा ते उपजत नसलं तरी हळुहळू कळू लागतंच…
…महाराष्ट्र प्रदेशातला तह हा शब्द मायावतींच्या उत्तर प्रदेशात कोणे एके काळी सोशल इंजिनीयरिंग म्हणून ओळखला जायचा…पण आता त्यांचा हाच तह समाजवाद्यांसह झाला आहे…
…बिहारातल्या नितीशकुमारांनी योग्य वेळी लालूंचा हात घट्ट पकडला आणि योग्य वेळी जोरात झटकून दिला…पण नंतर योग्य वेळीच हळूच भाजपचा हात आपल्या मऊ हातांनी हळूच दाबला…
…भाजपवाल्यांनी लाख दुषणं अंगावर घेतली, पण पीडीपीसोबतचा आपला डीपी बराच काळ ठेवला…पण तशीच वेळ आली तेव्हा डीपी तर बदललाच, टोपीसुध्दा बदलली…
…चंद्राबाबू नायडूंनी गंभीर चेहर्‍याने भाजपशी गंभीरपणे संसार केला…आणि एके दिवशी गोरज मुहूर्त पाहून संसारातून तितक्याच गंभीरपणे पोबारा केला आणि राहूल गांधींकडे येऊन आपलं मन धीरगंभीरपणे मोकळं केलं…
…एके काळी फडणवीस वाघाचे दात मोजायला निघाले होते…पण आता वाघाला गोंजारायला निघाले आहेत…
…तात्पर्य, साहेब म्हणतात त्याप्रमाणे राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा शत्रू नसतो आणि कुणीच कुणाचा कायमचा मित्र नसतो…म्हणूनच कुणी कुणावर कायम विश्वास ठेवायचा नसतो…
…विश्वासराव कधीच पानिपतात गेले असं अजूनही लोक म्हणतात…आणि अमित शहा म्हणतात, 2019ची निवडणूक म्हणजे पानिपतची लढाई आहे…

-अँकर

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here