घरमहाराष्ट्रपांडवकडा धबधब्याच्या प्रवाहात बुडून ४ तरूणींचा दुर्दैवी मृत्यू

पांडवकडा धबधब्याच्या प्रवाहात बुडून ४ तरूणींचा दुर्दैवी मृत्यू

Subscribe

गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण रायगड जिल्ह्यात, विशेषतः दक्षिण भागात मुसळधार पावसाने अक्षरशः हाहा:कार उडविला असून, जनजीवन ठप्प झाले आहे. पावसामुळे सावित्री, काळ, अंबा, कुंडलिका नद्यांना पूर आला असल्याने तेथे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पोलादपूरनजिक दोन ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या, तर मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक मंदावली होती. रोहे तालुक्यातील काही गावांतून पाणी शिरल्यामुळे स्थानिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. दरम्यान, खारघरमधील पांडवकडा धबधब्याच्या प्रवाहात 4 युवती वाहून गेल्या. त्यापैकी तिघींचे मृतदेह सापडले आहेत. नागोठण्यात एक तरुण वाहून गेला. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती.

महाडमध्ये सावित्री, गांधारी, काळ नद्यांनी शुक्रवारी सायंकाळीच धोक्याची पातळी ओलांडल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला. शहरातील सुकट गल्ली आणि दस्तुरी नाका परिसरात पुराचे पाणी घुसल्याने दस्तुरी नाका ते नाते खिंड हा मार्ग बंद करण्यात आला. गांधारी पुलावरून पाणी गेल्याने हा मार्गदेखील रात्री वाहतुकीस बंद ठेवण्यात आला. केंबुर्ली येथून महाड शहरात प्रवेश होत असलेल्या दोन्ही मार्गावर पाणी आले होते. मुख्य बाजारपेठेत पुराचे पाणी आल्याने बाजारपेठ बंद राहिली. तर नागोठण्यातही शुक्रवारी रात्रीपासून अंबा नदीच्या पुराचे पाणी बाजारपेठ, कोळीवाडा परिसरात घुसण्यास सुरूवात झाल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगत रात्र जागून काढली. शनिवारी सकाळी १० नंतर पुराचे पाणी ओसरले असले तरी पुन्हा एकदा जनजीवन विस्कळीत झाले आहे. सायंकाळी पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने नदी काठावरील नागरिकांच्या पोटात गोळा आला आहे.

- Advertisement -

माणगावमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन कोलमडले असून, रस्ता पाण्याखाली गेल्याने माणगाव-श्रीवर्धन मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली. सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांचे कमालीचे हाल झाले. कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने रोहे तालुक्यातील रोठ गावात पाणी शिरल्याने आठ कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. कोलाडमधील संजय गांधीनगरमधील 35 व्यक्तींना ग्रामपंचायत कार्यालयात हलविण्यात आले. धाटाव नाका रोड येथे पाणी घुसल्याने काहींना जिल्हा परिषद शाळेत हलविण्यात आले. नागोठणे-काळकाई रस्त्यावर दरड कोसळली, ती हटविण्यात आली आहे. रोहे तालुक्यातील आंबेवाडी येथे घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे 35 व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

खारघर येथील पांडवकडा धबधब्यावर चार युवती वाहून गेल्याने एकच खळबळ उडाली. यापैकी नेहा जैन (19, रा.चेंबूर नाका), आरती नायर (18, रा. नेरूळ) व श्वेता नंदी (18, रा. ऐरोली) यांचे मृतदेह सापडले असून, नेहा दामा ही युवती अद्याप बेपत्ता आहे. नागोठणे येथे संतोष गडले (25, रा. वरवठणे, ता. रोहे) हा तरुण अंबा नदीच्या प्रवाहात शनिवारी सायंकाळी वाहून गेला. त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

- Advertisement -

पोलादपूर तालुक्यात कशेडी घाटात भोगाव येथे रस्ता खचला आहे. त्यामुळे तेथे एकेरी वाहतूक सुरू आहे. गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मूर-वडवली रस्त्यावर पाणी आल्यामुळे या मार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली होती. पोलादपूर-महाबळेश्वर रस्त्यावर झाड पडल्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मुंबई-गोवा महामार्गावर चोळई येथे दरड कोसळल्याने महामार्गावरील वाहतूक काही काळ थांबविण्यात आली होती. म्हाप्रळ-पंढरपूर रस्त्यावरील रावढळ पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे वाहतूक थांबविण्यात आली होती. मुरुड तालुक्यातील बोर्ली येथे समुद्र किनार्‍यावरील घरांचे उधाणामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. पाली येथील अंबा नदीलाही पूर येण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासन सतर्क झाले आहे.दरम्यान, येत्या 24 तासात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

शनिवारी सकाळी ८ वाजेपर्यंत झालेली पावसाची नोंद अशीः-
अलिबाग-106 मिलिमीटर, पेण-112, मुरुड-159, पनवेल-76.60, उरण-54, कर्जत-117.80, खालापूर-100, माणगाव-226, रोहे-295, सुधागड-175, तळे-210, महाड-188, पोलादपूर-245, म्हसळे-200, श्रीवर्धन-135 व गिरिस्थान माथेरान-206. एकूण 2615. 20, तर सरासरी 163.45 मिलिमीटर.

शुक्रवारपासून धुमाकूळ घातलेल्या पावसाने रोहे व महाड तालुक्याला सन 1989 व 2005 च्या पुराची आठवण झाली. शनिवारी सायंकाळी उशिरापर्यंत पावसाचा जोर कमी होण्याच चिन्हे नसल्याने अनेक ठिकाणचे नागरिक एका अनामिक भीतीच्या सावटाखाली असल्याचे दिसत आहे. मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी शेतीची दैना उडविली असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. बरीचशी शेती पाण्याखाली असून, केलेली मेहनत वाया जाते की काय, अशी शंका शेतकरी व्यक्त करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -