घरमहाराष्ट्रसातार्‍याची ‘गादी’ राष्ट्रवादी राखणार का?

सातार्‍याची ‘गादी’ राष्ट्रवादी राखणार का?

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गड असलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघातील वाई विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मकरंद पाटील आमदार आहेत. कोरेगावमध्ये राष्ट्रवादी काँगे्रसचे शशिकांत शिंदे, कराड उत्तरमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसचेच शामराव पाटील आमदार आहेत. तर कराड दक्षिणमध्ये काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण आणि पाटणमध्ये शिवसेनेचे शंभुराज देसाई आमदार आहेत. अशा प्रकारे सहा विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन विधानसभा मतदारसंघात आमदार आहेत.

तसेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही २०१४ प्रमाणेच नरेंद्र मोदींची लाट असतानाही या ठिकाणी राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले विजयी झाले आहेत. त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादीची ताकद अजूनही कायम आहे. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप-शिवसेनेत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधून जे इनकमिंग सुरू झाले, त्याची लागण सातारा जिल्ह्यालाही झाल्याने राष्ट्रवादी हा गड राखणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

- Advertisement -

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांनी शिवसेना-भाजपात प्रवेश केल्याने जसे अन्य जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादीला घरघर लागली, तशी सातारा जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँगे्रसचे खासदार उदयनराजे भोसले हे भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा जोर धरली आहे. त्यांचा पक्ष प्रवेश निश्चित मानला जात असतानाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अन्य नेत्यांनी उदयनराजे यांची समजूत काढून त्यांना थोपवून धरले आहे, परंतु यातून चर्चेला मात्र उधाण आले असून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे याचा थेट परिणाम विधानसभा निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे. ज्या सातार्‍यात भाजपला शिरकावही करता आला नाही, त्या सातार्‍यात भाजपची आता राजकीय महत्त्वाकांक्षा वाढलेली आहे. त्यामुळे भाजपने थेट खासदार उदयनराजे भोसले यांनाच गळाला लावले आहे. त्यामुळे एकंदरीच संपूर्ण जिल्ह्यांवर त्याचा प्रभाव पडणार आहे.

वाई मतदारसंघात मकरंद पाटील यांना भाजप-शिवसेना युती टक्कर कशी देणार की त्यांनाच पक्षात घेणार, हे पहावे लागेल. त्याचप्रमाणे कोरेगाव मतदारसंघात शशिकांत शिंदे यांनाही शह देण्याचा युतीकडून प्रयत्न होईल. कर्‍हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व सध्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण हे करत आहेत. त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघातील कराड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडेही सर्वांचे लक्ष लागणार आहे. याठिकाणी २०१४ मध्ये ७ वेळा आमदार झालेले विलासकाका उंडाळकर यांना बाजूला करून काँग्रेसने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी दिली होती. तेव्हा नाराज विलासकाका यांनी अपक्ष लढून पृथ्वीराज चव्हाण यांना शह दिला होता. २०१९ मध्ये उंडाळकर गटाचा चव्हाणांना त्रास होणार हे निश्चित आहे. अशा वेळी भाजप येथे शिरकाव करून विलासकाकांच्या मदतीने ही जागाही बळकावण्याचा प्रयत्न करेल, अशीही शक्यता आहे.

- Advertisement -

प्रमुख समस्या – रस्ते, पाणी टंचाई, शेती उत्पादनाला हमीभाव, टोलमाफीची अपेक्षा
सहा विधानसभा मतदारसंघांतील एकूण मतदार – १७ लाख ३४ हजार ८८२
जिल्ह्यात प्रभाव असलेला पक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

Nityanand Bhise
Nityanand Bhisehttps://www.mymahanagar.com/author/bnityanand/
राष्ट्रीय भावना अधिक असलेला तितकाच सामाजिक जाणिवांबाबत हळवा असलेला मी धर्म, देव, श्रद्धा या बुरसटलेल्या, थोतांड गोष्टी मानणार्यामधला नाही, मी पुरोगामी नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -