माध्यमांची मुस्कटदाबी रोखा; भाजप शिष्टमंडळाची राज्यपालांना विनंती

bjp leaders meet governor of maharashtra
भाजप नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली

राज्यात ठाकरे सरकारच्या आश्रयाने माध्यमांची मुस्कटदाबी केली जात असून ती रोखण्यात यावी, अशी विनंती भाजपच्या शिष्टमंडळाने मंगळवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटून केली. सोशल मिडियाचे अभिव्यक्ति स्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे, अशी भूमिकाही भाजपने मांडली. भाजपच्या आमदारांच्या शिष्टमंडळाने आज राजभवनवर राज्यपालांची भेट घेतली. या भेटीनंतर बोलताना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले, सोशल मिडियाच्या माध्यमातून आपली मते व्यक्त करणा-या भाजपच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात येत आहे. तसेच कोणीही व्यक्ती सोशल मिडियावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करत असेल तर त्यांनाही पोलिस स्टेशनला बोलवून त्यांच्यावर गु्न्हा दाखल करणे असे प्रकार सध्या सुरु आहेत.

 

सोशल मिडियाच्या माध्यमातून व्यक्त होणारे अभिव्यक्ति स्वातंत्र्य तसेच प्रसार माध्यमांची स्वातंत्र्यता याबाबत सरकारचा एकतर्फी जुलूमी कारभार सुरु आहे. त्यामुळे यासंदर्भात अंकुश आणण्यासाठी निवृत्त न्यायाधीश, मुख्य सचिव आणि सोशल मीडियामधील तज्ज्ञ सदस्यांची एक समिती नियुक्त करावी. या समितीचा अहवाल मागून राज्यपालांनी या विषयात स्वत: हस्तक्षेप करुन या गोष्टी थांबवाव्यात , अशी मागणी राज्यपालांकडे केल्याचे दरेकर यांनी सांगितले.

प्रवीण दरेकर आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात खासदार गोपाल शेट्टी, आमदार आशिष शेलार, भाई गिरकर, योगेश सागर, पराग अळवणी, मनिषा चौधरी, भारती लव्हेकर, कॅप्टन तमिल सेल्वन, सुनील राणे आदींचा समावेश होता.