घरमहाराष्ट्रविदेशी पक्ष्यांच्या गर्दीने बहरला हिप्परगा तलाव

विदेशी पक्ष्यांच्या गर्दीने बहरला हिप्परगा तलाव

Subscribe

पक्ष्यांचे तीर्थस्थान म्हणून ओळख असलेल्या सोलापूर शहराजवळच्या हिप्परगा तलावावर यंदा विविध प्रकारचे विदेशी पक्षी स्थलांतर करून आले आहेत. शहराच्या उत्तरेस अवघ्या काही किलोमीटर अंतरावर ब्रिटीश काळात साकारलेल्या या जलस्थानावर तुलनेने या वर्षी बहुसंख्येने विदेशी पक्ष्यांनी गेल्या महिनाभरापासून गर्दी केली आहे. एकेकाळी सुमारे वीस प्रकारच्या स्थलांतरित बदकांसह इतर विशिष्ट विहंगासाठी प्रसिद्ध असलेला हा तलाव गेल्या दहा-बारा वर्षांच्या खंडानंतर परदेशी पाहुण्यांच्या आगमनाने गजबजला आहे.

कधी कधी रोहित नगर म्हणून संबोधणार्‍या या तलावावर यंदा थंडी सुरू होण्यापूर्वीच सुमारे दोनशेच्या आसपास संख्येने नजाकतदार फ्लेमिंगो अर्थात रोहित पक्षी कच्छच्या रणातून थवेने येऊन दिवसभर मुक्त विहार करत आहेत. कपाळावर दोन्ही बाजूला दोन-तीन आडवे काळी पट्ट्याने अफाट सौंदर्य लाभलेली पट्टकदंब हंस (बार हेडेड गूज) दोन-चार वर्षे पाठ फिरवून यावर्षी सुमारे ऐंशीहून अधिक संख्येने लडाक व मॅनमार येथून स्थलांतर करून तलावातील चिखलाणीत गाळ चाळताना व्यस्त आहेत. युरोप व मध्य आशिया या ठिकाणी मूळ वास्तव्याला असणारे क्रौंच तथा कांड्याकरकोचे (कॉमन क्रेन्स) हे महाकाय करकोचे मोठ्या थव्याने तलावावर सद्या ढेरा टाकून आहेत. पश्चिम आशिया व आफ्रिका तसेच युरोपमध्ये वीण घालणारे श्वेतबलाक (व्हाईट नेक स्टॉर्क) या करकोचा कुळातील पक्ष्याचे सोलापूरचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. चित्रबलाका सारखाच दिसणारा, परंतु शुभ्र सफेद शरीर व काळी झुपकेदार शेपटी असलेला हा मनमोहक पाहुणा पक्षी तलावाकाठी दलदलीत मोठ्या ढांगा टाकत दिमाखात फिरताना दिसतो.

- Advertisement -

तीन वर्षांच्या खंडानंतर दोन श्वेतबलाक याठिकाणी आले आहेत. चोचीचा अग्रटोक वरच्या बाजूला विशिष्ट पद्धतीने वळलेल्या उचाटा अर्थात कवड्या टिलवा (एवोसेट) हा विशिष्ट पक्षी उत्तर बलुचिस्तानातून खूप वर्षांनी हिप्परग्याच्या भेटीला आला आहे. चक्रवाक अर्थात ब्राह्मणी बदके हिवाळ्यात दरवर्षी या ठिकाणी येऊन धडकतात, मात्र याच कुळातील परंतु अतिशय दुर्मीळ असलेला शाही चक्रवाक (कॉमन शेल्डक) हे बदक आपले प्रतिनिधित्व केले आहे. युरोपातील शीतप्रदेशातून सोनचिखल्या (गोल्डन प्लवर) या छोट्या पक्ष्याची एक जोड तलावाच्या चिखलात खाद्यान्नावर ताव मारताना नजरेस पडतात. सोनुला (युरेशियन वीजन), चक्रांग (टील), चिखल्या (गार्गेनी), परी (नॉर्दन शॉवलर), सरग्या, ५ चिमण शेंद्य्रा (पोचार्ड) इत्यादी बदके पॉलीआर्क्टिक परदेशातून आले आहेत.

याच बरोबर मध्य आशिया व लडाख या भागातून टिलवा (रेड व ग्रीन शांक), पाणतुतवार (सॅन्ड पायपर ), पाण टिवळे (गॉडविट), चिमण कोरल (विंबरेल) इत्यादी टिटवी कुळातील पक्षी आपले आवडीचे खाद्यपदार्थ घशाखाली ढकलण्यासाठी आले आहेत. पाणघार (मार्श हॅरियर), टिटक्यांचा पाणगरूड (ग्रेटर स्पॉटेड ईगल) व ब्राह्मणी घार (ब्राह्मणी काईट) हे शिकारी पक्ष्यांनीही गर्दी केली आहे. नेहमी खार्‍या पाण्यातील माशांची चव चाखणारे तपकिरी शिर कुरव (ब्राऊन हेडेड गल), पल्लास कुरव (पल्लास गल) या मत्स्याहारी समुद्रपक्ष्यांचा एक मोठा थवा सध्या तलावाच्या पाण्यावर मासेमारी करण्यात सक्रीय झाले आहेत. स्थलांतरितांच्या संगतीने चित्रबलाक, मुग्धबलाक, चमचे चोच, पांढर्‍या मानेच्या करकोचे, राखी बगळे, शेकाट्या, पाणकावळे, हळदीकुंकू बदके, विविध प्रकारच्या टिलवा (प्लवर) इत्यादी स्थानिक पक्ष्यांनी तलाव परिसरात खाद्य मटकावताना दिसतात.

- Advertisement -

यावर्षी हिप्परगा तलावावर स्थलांतरित पक्षी इतक्या संख्येने आले आहेत की त्यांना ओळखळेही कठीण झाले आहे. दिवसेंदिवस पक्षी निरीक्षक व छायाचित्रकार गर्दी करत आहेत. त्यांना जवळून टिपण्यासाठी त्यांच्या परीघात शिरकाव करून त्यांच्या विहारात व्यत्यय आणत आहेत. सोलापूरचे पक्षीवैभावाचा हा अनमोल ठेवा जपायचे असेल तर सर्वांनी संयम ठेवायला पाहिजे. -अरविंद कुंभार, पक्षी अभ्यासक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -