बारा वर्षाच्या मुलीने पालकांना शिकवला धडा

खंडणीची मागणी करुन कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी

खंडणीची मागणी करुन कुटुंबियांना धमकी दिल्याचा प्रकार बोरिवली परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी गुन्हा नोंद होताच एका बारा वर्षांच्या मुलीनेच तिच्या आई-वडिलांना धडा शिकविण्यासाठी बोगस मेलवरुन ही धमकी दिल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. लहान मुलीवर आई-वडील जास्त प्रेम करतात, तिचे जास्त लाड करुन स्वत:कडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे तिने तिच्या पालकांकडेच खंडणीसाठी धमकी देऊन त्यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचे एपीआय विठ्ठल चौगुले यांनी सांगितले. यातील तक्रारदार बोरिवली परिसरात त्यांच्या पत्नी आणि दोन मुलीसोबत राहतात. ते सीए असून एका नामांकित बँकेत वरिष्ठ पदावर काम करतात. 16 जुलै ते 19 जुलै या दरम्यान त्यांना दोन वेगवेगळ्या मेलवरुन काही मॅसेज आले होते. या मॅसेजमध्ये अज्ञात व्यक्तीने तो चायनीस व्यक्ती असल्याचे सांगून त्यांच्याकडे एक लाख रुपयांची आणि नंतर बारा मिलियन रुपयांची मागणी केली होती.

ही रक्कम दिली नाहीतर त्यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलींची हत्या करण्याची धमकी दिली होती. संबंधित मेसेज वाचल्यानंतर तक्रारदार हे प्रचंड घाबरले आणि त्यांनी बोरिवली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी खंडणीचा गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली होती. या गुन्ह्यांचा संमातर तपास पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय विठ्ठल चौगुले व गुन्हे शाखेचे कांदिवली युनिटचे अधिकारी करीत होते. तपासादरम्यान विठ्ठल चौगुले यांनी संबंधित मेलचे अकाऊंटबाबत बारकाईने तांत्रिक तपास सुरु केला होता. तपासादरम्यान ते मेल तक्रारदाराच्याच नावाने मोबाईलवरुन पाठविण्यात आल्याचे उघडकीस आले. त्यांच्यासह त्यांची पत्नी आणि बारा वर्षांच्या मुलीकडे मोबाईल होते, ऑनलाईन शिक्षणासाठी त्यांनी त्यांच्या मुलीला मोबाईल दिला होता.

मेल आलेला मोबाईल त्यांची मुलगी वापरत असल्याने तिची तिच्या आई-वडिलांसमोरच पोलिसांनी कसून चौकशी केली असता तिनेच खंडणीचे मेसेज तिच्या वडिलांना पाठविल्याचे सांगितले. ते मेसेज तिने रागातून पाठविले होते, तिचे आई-वडील लहान मुलीवर जास्त प्रेम करतात, तिचे लाड करताना तिच्याकडे मात्र दुर्लक्ष करतात. वारंवार रागावून बोलतात ही भावना मनात निर्माण झाल्याने तिच्या मनात आई-वडिलांविषयी प्रचंड राग होता. त्यांना धडा शिकविण्यासाठीच त्यांनी ते मेल पाठवून दिले होते. या प्रकारानंतर ही माहिती बोरिवली पोलिसांना कळविण्यात आली असून आता पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे. लवकरच या मुलीची पोलिसांकडून चौकशी करुन याबाबतचा अहवाल लोकल कोर्टात सादर केला जाईल, असे पोलिसांनी सांगितले. बारा वर्षांच्या मुलीने सुडापोटी आपल्या आई-वडिलांना धमकी दिल्याचे उघडकीस येताच तपास अधिकार्‍यांनाही धक्का बसला होता.