कर्जतमध्ये रंगला हेल्मेट गरबा

दुचाकींच्या अपघातात हेल्मेट न घातल्याने डोक्यावर गंभीर इजा होण्याचे प्रमाण जास्त असल्याने समाजाला एक नवा संदेश देण्याचं काम कर्जत मेडिकल असोसिएशनने केले आहे. कर्जत येथे असोसिएशनच्यावतीने मंगळवारी हेल्मेट गरबा रंगला होता. सध्या या गरब्याची चर्चा संबंध तालुक्यात सुरू आहे.

कोजागरीच्या शीतल चंद्र प्रकाशात रॉयल गार्डनमध्ये या रास गरबा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉक्टर म्हणून समाजात काम करताना या समाजासाठी आपण आपले योगदान देणे हे कर्तव्य समजून एक अनोखा संदेश गरब्याच्या निमित्ताने देण्यात आला. असोसिएशनच्या डॉक्टर सदस्यांनी आपल्या कुटुंबियांसह गरब्यात डोक्यात हेल्मेट घालून गरबा खेळला. दुचाकीवर हेल्मेट घालणे गरजेचे आहे. या हेल्मेट सक्तीच्या संदेशाबरोबर बेटी बचाव बेटी पढाव, स्वच्छ भारत सुंदर भारत, असे संदेश देखील देण्यात आले.

कार्यक्रमातून सामाजिक संदेश देण्यात आलेल्या या हेल्मेट गरब्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. गणेश साळुंखे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. पडते, डॉ. म्हात्रे, डॉ. पाटील, डॉ. माने यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

आपण डॉक्टर झालो की, समाजाचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. आपण लोकांसाठी एक खास व्यक्तिमत्त्व होतो आणि समाजासाठी आदर्श असतो. म्हणूनच आपण समाजात लोकांपर्यंत काही चांगले संदेश देण्यास किंवा पोहचवण्यास बांधील असतो. ती सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे, असे मला स्वतःला वाटते.
-डॉ. गणेश साळुंखे, अध्यक्ष, कर्जत मेडिकल असोसिएशन