घरमहाराष्ट्रकिती थापा मारणार, त्यालाही काही मर्यादा

किती थापा मारणार, त्यालाही काही मर्यादा

Subscribe

पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. यामध्ये काँग्रेसने आघाडी घेतली आहे. हा लोकशक्तीचा विजय आहे. नोटाबंदीसारख्या निर्णयाविरोधात जनतेने कौल दिला आहे. याचबरोबर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव संपला आहे. हे या पाच राज्यांच्या निकालावरुन सिद्ध झाले आहे. एकप्रकारे धनशक्तीवर जनशक्तीचा हा विजय आहे. आगामी 2019 लोकसभा निवडणुकांमध्ये देशात काँग्रेसचीच सत्ता येणार आहे. त्यामुळे ‘मोदीजी जानेवाले है, राहुलजी आनेवाले है’, सध्या या राज्यांमध्ये जे काही सुरू आहे, अशीच परिस्थिती महाराष्ट्रातही पहायला मिळणार आहे. त्यामुळे राज्यातील मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार काही महिन्यापुरतेच राहील आणि महाराष्ट्रातसुद्धा असेच चित्र पहायला मिळेल.
– अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष,काँग्रेस

जनता कोणाचीही मग्रुरी सहन करत नाही, हेच या निकालावरुन स्पष्ट होत आहे.
– शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

- Advertisement -

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या निकालावरुन आगामी लोकसभेचा अंदाज लावता येणार नाही. कारण देशातील जनतेला हे माहीत आहे की देश कुणाच्या हातात सोपवायचा आहे. जनतेने स्थानिक बाबींमुळे आम्हाला यावेळी नाकारले असले तरी जनतेची भाजपवरची नाराजी खूप काळ टिकणार नाही आणि लोकसभा निवडणुकीत जनता भाजपलाच कौल देईल. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष महाराष्ट्रात एकत्र आले तरी भाजपला निवडणुकांमध्ये पूर्वीपेक्षा जास्त जागा मिळतील. राज्यात आणि केंद्रामध्ये पुन्हा एकदा भाजपचीच सत्ता येणार आहे. शिवसेनाही सोबत असावी.
– रावसाहेब दानवे, प्रदेशाध्यक्ष, भाजप.

पर्याय कोण या प्रश्नात गुंतून न पडता नको असलेल्यांना मतदारांनी नाकारले आहे, मतदारांचे मी अभिनंदन करतो. निवडणुकीत हार-जीत तर होतच असते. जिंकतो त्याचे अभिनंदन होत असते. पण या चार राज्यात परिवर्तन घडवणार्‍या मतदारांचे अभिनंदन. त्यांनी इव्हीएम, पैसेवाटप, गुंडगिरी आणि पर्याय कोण? या प्रश्नांमध्ये अडकून न पडता जे नको आहेत, त्यांना नाकारले. मतदारांच्या या धाडसाने देशाला दिशा दाखवली आहे.
– उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना.

- Advertisement -

पाच राज्यांचे निवडणूक निकाल म्हणजे मित्र पक्षाला कमी लेखणार्‍या भाजपला जनतेने शिकवलेला हा धडाच आहे. भाजपने आत्मचिंतन करावे. या विजयाकडे केवळ काँग्रेसचा विजय म्हणून पाहता येणार नाही. लोकांनी भाजपविरोधात व्यक्त केलेला हा राग आहे. शिवसेनेने गेल्या २५ वर्षांपासून भाजपसोबतचे संबंध जपले आहेत. आतादेखील धर्माच्या मुद्यावर शिवसेना भाजपसोबत आहे. मात्र, भाजपने नेहमीच मित्रपक्षांना कमी लेखले, त्यांना वाईट वागणूक दिली. मध्यंतरी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने शिवसेनेला फारशी किंमत न देण्याची भूमिका घेतली होती. मात्र, गेल्या काही काळातील बदलती परिस्थिती लक्षात घेता भाजपने शिवसेनेशी पुन्हा जुळवून घ्यायला सुरुवात केल्याचे चित्र आहे.
– संजय राऊत, खासदार, शिवसेना.

येणार्‍या काळात मोदी,भाजप-शिवसेना यांचा पराभव करायचा हे एकच ध्येय असले पाहिजे आणि त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस या पराभवाचे माध्यम ठरला पाहिजे. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा असा भाजपचा कारभार सुरू आहे. देशात अराजकता आणि हुकुमशाही सुरू आहे. सत्तेचा दुरुपयोग माझ्या आयुष्यात मी पाहिला नाही इतका दुरुपयोग भाजप सरकारने केला आहे. त्या सर्वाचा परिणाम पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांत दिसून आला.
– अजित पवार, विधिमंडळ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस.

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे जे निकाल आले, ते अपेक्षितच होते. किती थापा मारणार, त्यालाही काही मर्यादा असतात. जनता दुधखुळी नाही. खरे तर याचे श्रेय गुजरातच्या जनतेला दिले पाहिजे. त्यांनी मोदी सरकार, भाजप सरकारविरोधात मतदान करण्याचा पायंडा पाडला. नरेंद्र मोदी ज्या बहुमताने सत्तेवर आले, त्या तुलनेत गुजरात विधानसभेत त्यांनी १६५ जागा जिंकू, असा विश्वास व्यक्त केला होता. गुजरातच्या जनतेने मात्र त्यांना ९९ वर आणून ठेवले. त्यानंतर कर्नाटकच्या जनतेने तो कित्ता गिरवला. मोदींना पर्याय कोण, अशा चर्चा निरर्थक आहेत. एका खोलीत बसून संपूर्ण देश पाहता येत नाही. १२५ कोटींच्या या देशात ‘पर्याय नाही’ म्हणणे चुकीचे आहे. राहुल गांधींना विरोधक ‘पप्पू’ म्हणून हिणवायचे. आता तेच ‘परमपूज्य’ बनले आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी एकटे होते. गुजरातच्या निवडणुकीतही ते एकटेच होते, पण निवडणूक निकालात बदल झाला ना, कर्नाटकातही ते एकटे होते आणि आता या पाच राज्यांच्या निवडणुकांतही राहुल गांधी एकटेच फिरत होते. देशातील वातावरण ते बदलत आहेत. देशातील जनतेला राम मंदिराची नाही तर रामराज्याची गरज आहे. सरकारने गेल्या साडेचार वर्षात काहीही काम केलेले नाही. त्यामुळे जनतेला दाखवण्यासारखे त्यांच्याकडे काही उरलेले नाही.
– राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -