घरमहाराष्ट्रविकासाच्या उंबरठ्यावरील गावांची पाण्यासाठी वणवण

विकासाच्या उंबरठ्यावरील गावांची पाण्यासाठी वणवण

Subscribe

जेएनपीटी आणि उरण शहराच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या सिडको हद्दीतील गावांना पाणीटंचाईने ग्रासले असून हंडाभर पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे. पाण्यासाठी पुरुष-महिला चार-पाच किलोमीटर पायपीट करून सिडको ट्रेनिंग सेंटर जवळच्या एका फुटक्या व्हॉल्व्हमधून पाणी भरण्यासाठी रोज गर्दी करत असल्याचे चित्र दिसत आहे.

विकासाच्या नावाखाली तालुक्यातील बहुतांश जमिनी सिडको आणि जेएनपीटीने संपादित केल्या. या जागांवर मोठमोठाले प्रकल्प आणि उंचच उंच इमारती बांधण्यात आल्या. सिडकोने या उंच इमारतींवर पाणी पोहचविले. मात्र ज्या ग्रामस्थांनी या प्रकल्पांसाठी आणि इमारतींसाठी आपल्या जमिनी कवडीमोल दराने दिल्या. त्या गावात मात्र हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे. डोंगरी, पाणजे, फुंडे, बोकडवीरा या गावातील नागरिक चार-पाच किलोमीटर पायपीट करीत किंवा आपल्या दुचाकी आणि सायकली घेऊन बोकडवीरा गावाजवळील सिडको ट्रेनिंग सेंटर जवळ फुटक्या पाइपमधून गळणारे पाणी भरण्यासाठी गर्दी करीत आहेत. या सर्व गावांत जरी अर्थिक सुबत्ता आली असली तरी हंडाभर पाण्यासाठी तेथील करोडपती व्यक्तीसुद्धा येथे लाइनमध्ये उभे राहत असल्याचे पहायला मिळते.

- Advertisement -

या गावांमध्ये सध्या एमआयडीसीमार्फत पाणी पुरवठा सुरू आहे. मात्र कमी दाबाने होणारा पाणी पुरवठा आणि हे पाणी अशुद्ध असल्याने नागरिक ते इतर कारणांसाठी वापरतात. मात्र पिण्यासाठी या गावातील नागरिक सिडकोच्या हेटवणे धरणातील पाणी वापरतात. सिडकोने हेटवणे धरणाचे शुद्ध पाणी येथील नव्याने तयार झालेल्या वसाहतींना आणले आहे. या वसाहतींना 24 तास हे शुद्ध पाणी सुरू असते. मात्र ज्यांनी या इमारतींसाठी जागा दिल्या त्यांना मात्र अशुद्ध आणि अत्यंत कमी पाणी मिळत आहे.

या चारही गावांच्या हाकेच्या अंतरावर जेएनपीटी आहे. विकासाची कोट्यवधी रुपयांची कामे आजूबाजूला सुरू आहेत. बोकडवीरा गावाजवळ साडेबारा टक्के योजनेच्या भूखंडावर नजर पोहचणार नाही अशा इमारती तयार होत आहेत. या इमारतींना 24 तास मुबलक पाणी मिळत असताना बाजूलाच असणार्‍या या गावांना मात्र हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -