घरमहाराष्ट्रकासटवाडी- कशिवली घाट रस्ता कोणाचा?

कासटवाडी- कशिवली घाट रस्ता कोणाचा?

Subscribe

सरकारी यंत्रणांची टोलवाटोलवी

जव्हार शहरापासून अगदी 9 कि.मी. अंतरावर असलेला कासटवाडी ते कशिवली घाटावरील अपघात वाढले आहेत. मागील वर्षी आणि यंदाच्या पावसाळ्यात 26 हून अधिक अपघाताच्या घटना या ठिकाणी घडल्या आहेत. त्यात एकाचा मृत्यू झाला असून 70 हून अधिक वाहन चालक, बाईकस्वार प्रवासी जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. जव्हार- कासटवाडी-कशिवली हा मुंबई, ठाणे, कल्याण, पालघरकडे जाणारा मुख्या रस्ता आहे. हा रस्ता गेल्या दोन वर्षापूर्वी जव्हारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता. मात्र त्यानंतर हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतर झाल्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग सांगत आहे. तर हा रस्ता आमच्या ताब्यात नसल्याचे प्राधिकरणाचे म्हणणे आहे. त्यामुळे या रस्त्याची जबाबदारी कोणाची हा प्रश्न आहे.

कासटवाडी गावाजवळील 3 किलोमीटरचा रस्ता गुळगुळीत झाल्यामुळे पावसाळ्यात वाहन चालकांनी ब्रेक मारले तरीही वाहनाचा टायर सरकून अपघात घडत आहेत. पाऊस सुरू असला कि, गुळगुळीत रस्त्यामुळे दिवसाआड मोटार सायकलस्वार घसरून अपघात होत आहेत.

- Advertisement -

तीन किलोमीटरच्या रस्त्यावर पाच ठिकाणी गतिरोधक टाकण्यात आले आहेत. मात्र तरीही या रस्त्यावरील अपघातांचे सत्र सुरूच आहे. कासटवाडी ते कशिवली घाट हा नागमोडी वळणाचा असून, या घाटात रस्त्यावरील संरक्षक भिंती तुटल्यामुळे रस्ता खचला आहे. 25 ते 30 वर्षापूर्वी रस्त्याला काही ठिकाणी संरक्षक भिंती बांधण्यात आल्या. तर काही ठिकाणी दगड रचून दगडी बांध म्हणजेच संरक्षण कठडे बांधण्यात आले आहेत. आता संरक्षक भिंती व दगडी बांध तुटले असून, हा घाट अत्यंत धोकादायक बनला आहे.

अरुंद रस्ता, त्यातच नागमोडी वळणे, तुटलेला रस्ता, तुटलेले संरक्षण कठडे त्यामुळे रात्रीच्यावेळी मोठी कसरत करावी लागत आहे. जव्हार हे पर्यटन असल्याने या घाटातील रस्त्यावरून पावसाळ्यात रोजच शेकडो पर्यटक येत आहेत. अपघातात नवख्या पर्यटकांच्या वाहनांचे अपघात अधिक होत आहेत.

- Advertisement -

हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरीत करण्यात आलेला आहे. त्यामुळे आमच्या विभागाचा रस्त्याशी कोणताही संबंध नाही.
…डी. जी. होले, उपअभियंता, सा. बां. विभाग, जव्हार

हा रस्ता आमच्या विभागाकडे हस्तांतरीत झालेला नाही. याची दुरुस्ती करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे.
-निलेश महाजन, उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
-डी.जी.होले, उपअभियंता सां.बा. विभाग जव्हार.

अपघाताचे प्रमाण वाढल्याने रस्ता जीवघेणा ठरत आहे. पंधरा दिवसात रस्त्याची सुधारणा झाली नाही तर आदिवासी युवा तीव्र आंदोलन करणार आहे.
– एकनाथ दरोडा, अध्यक्ष, युवा आदिवासी संघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -