दुष्काळ जाऊ दे, आरक्षण टिकू दे – चंद्रकांतदादांचे विठ्ठलाकडे साकडे

कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरीनगरी भाविकांनी गजबजली असून चार लाखांहून अधिक भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली.

Maharashtra
chandrakant patil
चंद्रकांत पाटील विठ्ठलाच्या दर्शनाला

कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यासाठी सोमवारी, १९ नोव्हेंबर रोजी पंढरीनगरी भाविकांनी गजबजली असून चार लाखांहून अधिक भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. शासकीय महापूजेसाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील सहपत्नीक रात्री उशिरा पंढरीत दाखल झाले आहेत. पदस्पर्श दर्शन रांगेत ५० हजारांवर भाविक उभे आहेत, अशी माहिती मंदिर समितीच्या वतीने देण्यात आली. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज पहाटे अडीच वाजता कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. यावेळी वारकरी प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहण्याचा मान कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी बाळासाहेब हरिभाऊ मेंगाणे आणि त्यांच्या पत्नी आनंदी मेगाणे (राहणार मळगे बुद्रुक, तालुका कागल) यांना मिळाला. श्री विठ्ठल-रुक्मिणी च्या महापूजेनंतर मंदिरातील सभामंडपात झालेल्या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते मानाचे वारकरी म्हणून महा पूजेला उपस्थित राहण्याचा मान मिळालेल्या मेंगाणे दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला.

वाचा : कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूर परिसरातील वाहतुकीत बदल

राज्यभरातून भाविक पंढरीत दाखल 

कार्तिकी यात्रेचा एकादशीचा मुख्य सोहळा आज साजरा होत आहे. या सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या काना-कोपर्‍यातून तसेच कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशातून शेकडो दिंड्या पंढरीत दाखल झाल्या आहेत. दिंड्यांनी ६५ एकर येथील भक्‍तिसागर, शहरातील मठ, मंदिरे, धर्मशाळा आणि उपनगरे गजबजून गेली आहेत. श्री विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग पत्राशेडमधील ७ व्या शेडच्याही पुढे गेली आहे. रविवारी रात्री सुमारे ५० हजार भाविक रांगेत उभा असल्याचे मंदिर समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. चंद्रभागेच्या वाळवंटाबरोबरच मंदिर परिसर, महाद्वार, चौफाळा, प्रदक्षिणा मार्ग, भक्‍तिसागर परिसरात भाविकांची गर्दीने जमली आहे.

दुष्काळातून राज्याला बाहेर काढण्याची प्रार्थना 

यावेळी राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर काढण्यासाठी राज्य शासनाला बळ दे आणि मराठा समाजाला दिलेले आरक्षण न्यायालयात टिकू दे, असे साकडे श्री विठ्ठलाच्या चरणी घातले असल्याची माहिती महसूल कृषी मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दर्शनानंतर दिली. दरम्यान, श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा सुरू असतानाच पंढरपूर परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरपुरात जमलेल्या सुमारे सहा लाखाहून अधिक वारकरी हरिनामाचा जयघोष करीत असताना पावसाने हजेरी लावली. यावेळी श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, सौ. दिपाली भोसले, माजी मंत्री बबनराव पाचपुते, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, शकुंतला नडगिरे, रामचंद्र कदम ह-भ-प शिवाजीराव मोरे, संभाजी शिंदे ,अतुलशास्त्री भगरे, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर ,पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते ,मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here