लॉकडाऊनपासून एकदाही वीजबिल न भरणारे राज्यात ९८ लाख वीजग्राहक

कोकणात सर्वाधिक थकबाकीदार वीज ग्राहक

electricity bill

राज्यातल्या वीज ग्राहकांनी कोरोनाच्या काळात फुगलेली वीजबिले भरलेली नाहीत. त्यामुळेच वीजबिलामुळे महावितरण कंपनीची आर्थिक शिस्त बिघडल्याचे चित्र आहे. राज्यात कोरोनाने घातलेल्या थैमानामुळे विजेच्या बिलाची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले आहे. एप्रिल महिन्यापासून एकदाही वीजबिल न भरणाऱ्यांची आकडेवारी मात्र चक्रावणारी अशीच आहे. राज्यातील ९८ लाख वीज ग्राहकांनी एप्रिल महिन्यापासून एकदाही वीजबिल भरलेले नाही. या वीज ग्राहकांकडून साचलेली विजेच्या बिलाची थकबाकीची रक्कम आता ४७ हजार कोटी रूपयांवर पोहचली आहे. या ग्राहकांमध्ये सर्वाधिक थकबाकीदारांचा आकडा हा घरगुती वीज ग्राहकांचा आहे. महावितरणचे राज्यात २ कोटी ७३ लाख ३१ हजार वीज ग्राहक आहेत.

घरगुती वीज ग्राहकांमध्ये सर्वाधिक पैसे थकीत ठेवणाऱ्या ग्राहकांमध्ये कोकण विभागाचा क्रमांक अव्वलस्थानी आहे. कोकणातील २९ लाख १७ हजार ८९३ लघुदाब वीज ग्राहकांनी एप्रिल महिन्यापासून एकदाही वीजबिल भरले नाही. या वीज ग्राहकांकडून १४ हजार ५८५ कोटी रूपये महावितरणला येणे आहे. त्यामध्ये सर्वाधिक ही घरगुती वीज ग्राहकांची संख्या आहे. सुमारे १६ लाख ६८ हजार ५३७ वीज ग्राहकांकडून एप्रिल महिन्यापासून एकदाही विजेचे बिल भरण्यात आलेले नाही. त्यामुळे या वीज ग्राहकांची थकबाकी ९७४ कोटींवर पोहचली आहे. त्यापाठोपाठ पथदीप आणि सार्वजनिक पाणी पुरवठा योजनांचा समावेश आहे. पथदीप सेवेसाठी वीज वापरणाऱ्या १८ हजार २०५ वीज ग्राहकांकडून १३११ कोटी रूपये महावितरणला येणे आहे. तर सार्वजनिक पाणी पुरवठा योजनांमध्ये १६ हजार ७४१ ग्राहकांनी एकदाही विजेचे बिल भरले नाही. या ग्राहकांकडून महावितरणला ४०५ कोटी रूपये येणे आहे. तर कृषी ग्राहकांच्या ९ लाख ४१ हजार ६४३ ग्राहकांकडून ११ हजार ४१४ कोटी रूपयांचे येणे महावितरणला आहे.

एकदाही वीजबिल न भरणाऱ्या महावितरणच्या प्रादेशिक विभागातील आकडेवारी

प्रादेशिक विभाग     ग्राहक संख्या            थकबाकी (कोटी रूपये)
औरंगाबाद           १९,१२,८९२              १३,५३५
कोकण              २९,१७,८९३              १४,५८५
नागपुर              १४,४१,६७९                 २४३६
पुणे                 २९,५३,६३७               ११,४९८