तुम्ही जीवनावश्यक गोष्टी पुरवता ? मुंबई पोलिसांकडून हे ओळखपत्र घ्याच !

Mumbai
mumbai police ID
मुंबई पोलिसांचे ओळखपत्र

मुंबईत घरबसलेल्या लोकांना ई कॉमर्स सेवेच्या माध्यमातून सेवा पुरवण्यासाठी आता मुंबई पोलिस मदत करणार आहे. ज्या ई कॉमर्स कंपन्यांना जीवनावश्यक गोष्टी लोकांच्या घरापर्यंत पोहचवायच्या आहेत अशा ई कॉमर्स कंपन्यांनी आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन मुंबई पोलिसांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे. आपल्या नजीकच्या पोलिस स्टेशनमधून संपर्क साधून ई कॉमर्स कंपन्यांना जीवनावश्यक गोष्टींची सेवा पुरवता येईल असे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यासोबतच मुंबई पोलिसांनी आता जीवनावश्यक गोष्टींसाठी पास देणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार आता जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा करणाऱ्या दुकान चालकांना आता मुंबई पोलिस एक ओळखपत्र देणार आहे. जीवनावश्यक गोष्टींमधील कोणती सेवा त्या व्यक्तीकडून देण्यात येते याची माहितीही त्या ओळखपत्रावर देण्यात येणार आहे. ज्या दुकानचालकांना यासाठीचे ओळखपत्र हवय त्यांनी नजीकच्या पोलिस स्टेशनला संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. त्यामुळे कोणत्याही अडथळ्याशिवाय दुकानचालकांना आपल्या दुकानाच्या सेवेच्या ठिकाणी पोहचणे शक्य होईल.

किराणा मालासोबतच मेडिकलची सुविधा देणाऱ्या सेवांसाठीही हे ओळखपत्र देण्यात येणार आहे. नागरिकांना हे ओळखपत्र मिळवण्यासाठी ओळखपत्राचा पुरावा देण्याची गरज आहे. त्यानंतर हे ओळखपत्र सेवा पुरवठादारांना देण्यात येईल. या सेवा पुरवठादारांना देण्यात येणारे ओळखपत्र हे येत्या १५ एप्रिलपर्यंत वैध असणार आहे. पोलिसांकडून डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून हे ओळखपत्र देण्यात येत आहे. जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा करणाऱ्यांवर झालेल्या लाठीचार्जनंतर मुंबई पोलिसांवर टीका झाली होती. पण आता सेवा पुरवठादारांसाठी हेल्पलाईन क्रमांक देण्यासोबतच ओळखपत्र देण्यासाठी मुंबई पोलिसांनी पुढाकार घेतला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here