अपह्रत महिलेवर १८ दिवस सामुहिक बलात्कार; शहरात खळबळ!

allegedly gangrape on women
सामुहिक छायाचित्र

नाशिकच्या सटाणा तालुक्यात घडलेल्या सामुहिक बलात्काराच्या घटनेमुळे सटाण्यामध्ये खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरात केळी विकण्याचा व्यवसाय करणारी २० वर्षीय विवाहित महिला मॉर्निंग वॉकसाठी घरातून बाहेर पडली होती. त्यावेळी चार नराधमांनी तिचं अपहरण केलं. बुधवार दि. २१ ऑक्टोबर रोजी ही घटना घडली. या महिलेचं अपहरण करुन त्यांनी तिला मोटार सायकलवरुन दोधेश्वरच्या जंगलात पळवून नेलं. तिला जबरदस्तीने दारु पाजून हे नराधम तब्बल १८ दिवस तिच्यावर अत्याचार करत होते. ८ नोव्हेंबर रोजी त्या महिलेला कशीबशी आपली सुटका करुन घेण्यात यश आलं आणि तिने थेट पोलीस ठाणं गाठलं. या प्रकरणी सटाणा पोलिसांनी मुळाणे येथील चार आरोपींना अटक केली आहे. संदीप नाडेकर (वय ४०), सचिन तानाजी खोताडे (वय ३२), पप्पू बंडू नाडेकर (वय ३६) आणि भगवान गवळी (वय ३८) अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

२१ ऑक्टोबर रोजी अपहरण झाल्यानंतर तिच्या सासरच्यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती. त्यामुळे पोलीस तिचा आधीपासूनच शोध घेत होते. ८ नोव्हेंबरला मुलगी घरी आल्याची माहिती तिच्या माहेरच्या मंडळींनी दिली. त्यानंतर पीडितेनं तिच्यासोबत घडलेला सगळा प्रकार सांगितला आणि पोलिसांच्या तपासाला वेग आला. या महिलेला आरोपींचा मोबाईल नंबर मिळाला होता. त्या मोबाईलवरुन आरोपींचं लोकेशन ट्रेस करण्यात आलं. लोकेशननुसार पोलिसांनी त्यांच्या जंगलातील घरावर छापा मारला आणि चारही आरोपींना अटक केली. यावेळी त्यांच्या घरातून काही दारुच्या बाटल्या आणि आक्षेपार्ह वस्तूही जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला असून त्यांना १६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.