पालखी सोहळ्यात स्वच्छ अन्न व पाणी देण्याच्या सूचना

Satara
wadala prati pandharpur
वारकरी भजन करण्यात मंत्रमुग्ध (फोटो - प्रविण काजरोळकर)

श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळा 2 जुलै रोजी लोणंद मुक्कामी येत आहे. मुक्कामाच्या वेळी लाखो वारकरी लोणंदमध्ये दाखल होत असतात. लोणंदमध्ये दर्शनासाठीही जिल्ह्यातून हजारो भाविक येत असतात याच पार्श्‍वभूमीवर पालखी सोहळ्यात स्वच्छ अन्न व पाणी देण्यासाठी आरोग्य विभागाने हॉटेल व्यवसायिकांना सूचना केल्या असून त्याचे काटेकोरपणे पालन व्हावे, असे आवाहन केले आहे.

लोणंद व परिसरातील सर्व खाद्यपेय विक्रेते, हॉटेल व्यावसायिक, खाणावळ चालक यांनी सर्व खाद्य पदार्थ झाकून ठेवावे, त्यावर माशा व धुळ बसणार नाही याची काळजी घ्यावी, हॉटेल मधील सर्व भांडी हिडांलीयमची तसेच स्वच्छ असावीत, वापरातील कपबशा, भांडी, ग्लास वेळोवेळी स्वच्छ करण्यात याव्यात, खाद्य पदार्थ उत्तम प्रतिच्या धान्यापासून तयार करावे, हॉटेल व खानावळ चालकांनी पिण्याच्या पाण्याचा साठा स्वच्छ टाकी किंवा भांड्यात करावा, पाण्याची ओ. टी. टेस्टही प्रमाणात ठेवावी, मेवा मिठाईवाले हॉटेल मालक यांनी मानवी जीवनास अपायकारक रंगाचा वापर खाद्य पदार्थामध्ये टाळावा, कामगारांना स्वच्छता पाळण्याबाबत सूचना द्याव्यात, कामगारांची वैद्यकिय तपासणी करून घेऊन या पालखी सोहळ्यात कोणत्याही आरोग्य विषयक बाबींचा धोका होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे.

नगरपंचायतीकडून नागरिकांना आवाहन येत्या 2 जुलै रोजी दुपारी 1 पासून ते 3 जुलै दुपारी 12 वाजेपर्यंत पालखीचा मुक्काम लोणंद शहरामध्ये आहे. यावेळी लाखो वारकरी व भाविक या वारीच्या निमित्ताने लोणंदमध्ये मुक्कामास असतात. भक्तांच्या सेवेसाठी पालखी मुक्कामाच्या दिवशी लोणंदच्या नागरिकांनी वारकऱ्यांना आपल्या घरातील टॉयलेटचा वापर स्वेच्छेने करू द्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.