घरमहाराष्ट्रहा पक्ष माझ्‍या बापाचा, मी तो सोडणार नाही!

हा पक्ष माझ्‍या बापाचा, मी तो सोडणार नाही!

Subscribe

गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून राज्यभर दौरा करणार

हा पक्ष माझ्या बापाचा. मी पक्ष सोडणार नाही. हवं तर पक्षाने मला सोडावे, असे पक्ष नेतृत्त्वाला थेट आव्हान देत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्या बंडाचे निशाण अद्यापही कायम असल्याचे संकेत दिले. गोपीनाथ मुंडे यांनी अनेकांना पक्षात मोठे केले, मात्र त्यांनी कधीही पाठित खंजीर खुपसला नाही. गोपीनाथ मुंडे यांच्या रक्तात बेईमानी नाही. मला भाजप कोअर समितीच्या जबाबदारीतून मुक्त करा, अशी मागणीही पंकजा मुंडे यांनी केली. तसेच गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानची स्थापना करून राज्यव्यापी दौरा करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पंकजा मुंडे यांनी आपल्या मनातील खदखद प्रथमच जाहीररित्या व्यक्त केली. भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळी येथील गोपीनाथ गडावर आयोजित करण्यात आलेल्या स्वाभिमान मेळाव्यात पंकजा मुंडे बोलत होत्या. या मेळाव्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, प्रकाश मेहता, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर, खासदार डॉ. प्रीतम मुंडे, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आदी उपस्थित होते. या मेळाव्याला मुंडे समर्थकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

- Advertisement -

आपल्या भाषणात पंकजा मुंडे म्हणाल्या की, भाजपा माझ्या बापाचा पक्ष आहे. तो पुन्हा मूठभर लोकांचा करू नका. भाजपा हा माझा पक्ष आहे. काही जण म्हणतात बापाचं घर, बापाची जमीन, तसा हा माझ्या बापाचा पक्ष आहे. गोपीनाथ मुंडेंनी संघर्ष करून मूठभर लोकांचा पक्ष जनसामान्यांपर्यंत पोहोचवला. तो पक्ष आपण रिव्हर्स गिअरमध्ये नेऊ नये एवढीच विनंती. मला तो पक्ष परत पाहिजे, असे पंकजा म्हणाल्या.

पक्ष ही प्रक्रिया असते. त्यावर कुणाचीही मालकी नसते. पक्ष एका व्यक्तीचा नाही. अटल बिहारी वाजपेयी, राजनाथ सिंह, नितीन गडकरी आणि आता अमित शहा यांच्यासारख्यांनी भाजपचे अध्यक्षपद भूषवले आहे. मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही. गोपीनाथ मुंडेंच्या रक्तात बेईमानी नाही, असे म्हणत त्यांनी पक्षांतरांच्या चर्चांना पूर्णविराम दिला.

- Advertisement -

’राष्ट्र प्रथम, पक्ष द्वितीय आणि शेवटी व्यक्ती’ ही भाजपची घोषणा मी प्रत्यक्षात जगले. इतर कोणी या घोषणेनुसार काम केले की नाही हे माहीत नसल्याचे टोला त्यांनी लगावला. ज्यांनी राज्यात पक्ष वाढवण्यासाठी आणि रुजवण्यासाठी हाल सोसले, संघर्ष केला, अशा पक्ष नेते व कार्यकर्त्यांच्या वेदना ऐकणार नाही का, की त्यांनाही वार्‍यावर सोडून देणार असा खडा सवाल भाजप नेतृत्वाला केला. पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात भाजप नेतृत्व व पक्षातंर्गत विरोधकांवर अप्रत्यक्षपणे टीकास्त्र सोडले. ’राष्ट्र प्रथम, पक्ष द्वितीय आणि शेवटी व्यक्ती’ ही भाजपची घोषणा मी प्रत्यक्षात जगले. इतर कोणी या घोषणेनुसार काम केले की नाही हे माहीत नसल्याचे टोला त्यांनी लगावला. ज्यांनी राज्यात पक्ष वाढवण्यासाठी आणि रुजवणयासाठी हाल सोसले, संघर्ष केला, अशा पक्ष नेते व कार्यकर्त्यांच्या वेदना ऐकणार नाही का, की त्यांनाही वार्‍यावर सोडून देणार असा खडा सवाल भाजप नेतृत्वाला केला. आम्हाला आमचा जुना पक्ष हवाय, असं सांगत पंकजा यांनी भाजप नेतृत्वावर प्रश्न उभे केले.

माझ्या बंडाच्या बातम्या कोणी पेरल्या याचा शोध घेण्याचे आवाहन त्यांनी केले. आपल्याला कोणत्याही पदाची लालसा नाही असे म्हणत पंकजा यांनी भाजपच्या कोअर कमिटीच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली. विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर झाला होता. पक्षाच्या प्रत्येक उमेदवाराच्या विजयासाठी प्रयत्न केले असल्याचे पंकजा यांनी सांगितले. तरीदेखील माझ्याविरोधात बातम्या कोणी पेरल्या याचा शोध घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

गेले १२ दिवस टीव्ही लावला तर रोज संजय राऊत दिसायचे. ते जे बोलले ते करुन दाखवले. पण मी मी काही बोलले नाही तरी माझंच नाव दिसायचं असं सांगत यावेळी त्यांनी पंकजाविषयी चांगलं नाही बोललं पाहिजे यासाठी काही लोकांना नेमलं होतं असा आरोप केला. तसंच सुत्रांची खिल्ली उडवताना, इतके हुशार सूत्र असतील तर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी कळला कसा नाही. सुत्रांचीही मर्यादा असते, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

गोपीनाथ गडावरील भाषणातून पंकजा मुंडेंनी मला कोअर कमिटीतून मुक्त करा, असे आवाहन पंकजा यांनी केले. मन मोकळे केले नाही तर विष तयार होते, असे सांगत पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात भविष्यातील राजकीय वाटचालीची दिशा स्पष्ट केली. पुढील वर्षी २६ जानेवारी रोजी मुंबईत गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचे कार्यालय सुरू करणार असून या प्रतिष्ठानच्या माध्यमातून राज्यभर दौरा करणार असल्याची घोषणा पंकजा यांनी यावेळी केली. २७ जानेवारी रोजी औरंगाबाद येथे मराठवाड्याच्या विकासाच्या मागणीसाठी एक दिवसीय उपोषण करणार असल्याचीही घोषणा त्यांनी केली.

पंकजा मुंडे भाजपतच, माझा मात्र भरोसा नाही

एकनाथ खडसेंचा नेतृत्त्वाला इशारा

पंकजा मुंडे या भाजपतच असणार आहेत. माझा मात्र भरोसा नाही, असे सांगत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजप नेतृत्त्वाला इशारा दिला. शेटजी-भटजींचा पक्ष अशी ओळख असणार्‍या भाजपला गोपीनाथ मुंडे यांनी बहुजन समाजाचा पक्ष अशी ओळख मिळवून दिली.

मी मंत्री असताना गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी जागा मंजूर केली. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने कार्यकाळ पूर्ण झाला. त्यानंतर पुन्हा काही दिवसांचे मुख्यमंत्री झाले. तरी देखील स्मारक पूर्ण झाले नसल्याचे सांगत खडसे यांनी फडणवीसांवर शरसंधान साधले.

गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळी येथील गोपीनाथ गडावर आयोजित कार्यक्रमात एकनाथ खडसे बोलत होते. ते म्हणाले की, गोपीनाथ मुंडे यांनी कधीही पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले नाही.पंकजा मुंडे या निवडणुकीत पराभूत झाली याचे दु:ख आहे. मात्र, पंकजा मुंडेंचा पराभव झाला नसून त्यांचा पराभव घडवून आणला असल्याचा आरोप खडसे यांनी केला. माझ्यावर पक्षातल्या लोकांनी आरोप केले. माझी कारकीर्द संपवण्याचा प्रयत्न केला असल्याचेही खडसे यांनी म्हटले. संघर्षाच्या काळात पंकजा मुंडे यांनी स्वत: ला एकटे समजू नये. आम्ही सर्व त्यांच्यासोबत असल्याची ग्वाही यावेळी खडसे यांनी दिली.

आज ज्या पक्षात मी आहे त्या पक्षाचा मला आदेश आहे पक्षाच्या विरोधी बोलू नये. पण मी पक्षाच्या विरोधात कधीच बोललो नाही. पक्ष मलाही प्रिय आहे आणि पक्षातील नेतेही मला प्रिय आहेत. पण आज जी स्थिती आहे ते महाराष्ट्राच्या जनतेला मान्य नाही. पंकजाच्या मनातील दु:ख मला माहित आहे. तोंडावर गोड बोलायचं आणि मागे निवडणुकीत पाडायला प्रयत्न करायचं. हे घडलं नाही घडवलं गेलं आहे. तुम्हाला माझं म्हणंण पटतय की नाही पटतंय?

मला सांगा याठिकाणी तुम्ही पाहत आहात, काय प्रसंग आले माझ्या जीवनात? माझ्या आयुष्यात जसे आरोप झाले तसेच प्रसंग मुंडे साहेबांवरही झाले होते. तसेच प्रसंग आज माझ्यासोबतही घडत आहेत. मुंडे साहेबांच्या मतदारसंघात पंकजा ताईंना पाडण्याचं पाप तुम्ही का केलं? किती दिवस सहन करायचं? अजून आमचा पक्ष सोडायचा विचार नाही. पंकजाचं सोडून द्या, माझाच भरोसा नाही. ज्यांनी चाळीस-चाळीस वर्ष संघर्ष केला त्यांच्यावर अशी परिस्थिती का आली? पक्षाबाहेर काढण्यासाठी जी निती चालवली आहे ती बरोबर नाही. इतकं छळून मारायचं नाही. हे लोक वरुन बोलतात की, आज गोपीनाथ मुंडे असते तर खडसे मुख्यमंत्री झाले असते.

चुका माणसांकडून होतात पक्षावर कशाला राग काढता

चंद्रकांत पाटील यांचा सवाल

बीड8चुका माणसांकडून होतात, पक्षावर कशाला राग काढता, असा सवाल करत एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळी तालुक्यातील पांगरी येथील गोपीनाथ गडावर मुंडे समर्थकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

यावेळी भाजपाचे नेते एकनाथ खडसे यांनी भरसभेत भाजपाच्या नेतृत्वाबाबत नाराजी व्यक्त केली. त्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. नाथाभाऊंची वेदना समजू शकतो. त्यांनी दु:ख व्यक्त केले, त्यात चूक नाही. आपल्या तक्रारी आणि व्यथांची पक्ष दखल घेईल, त्यावर उत्तर काढू, पण भविष्यात सगळं नीट झाल्यावर अपराधी किंवा संकोच वाटेल असे संवेदनशील शब्द वापरु नका, अशी दोघांना विनंती, त्याचे ओरखडे राहतात.

नाथाभाऊ तुम्ही पक्षातून जाण्याची किंवा स्वतंत्र पक्ष काढण्याची भाषा करु नका. पक्षाच्या चुका झाल्या नाहीत. चुका माणसांच्या झाल्यात. पक्षावर कशाला राग काढताय. तुम्ही बोला की तू काल आला आहेस. आम्ही पक्षातच राहणार आहे. तू जायचे तर जा, असे तुम्ही आम्हाला म्हणा आणि पक्षात राहून संघर्ष करा, असे सांगत चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांना समजवण्याचा प्रयत्न केला. गोपीनाथ मुंडेंच्या प्रेरणेमुळेच आम्ही शरद पवारांना अंगावर घेऊ शकलो. पश्चिम महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा जिंकू शकलो. गेल्या पाच वर्षात गोपीनाथ यांच्या प्रेरणेमुळे पश्चिम महाराष्ट्रात जागा वाढल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. गोपीनाथ मुंडे भरल्या ताटावरुन उठून गेल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या, पण मुंडेंच्या निधनानंतर खचून न जाता त्यांनी कुटुंबाला समर्थपणे सावरले, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -