घरमहाराष्ट्रबेशिस्त वाहनचालकांपुढे नेरळ ग्रामपंचायत हतबल!

बेशिस्त वाहनचालकांपुढे नेरळ ग्रामपंचायत हतबल!

Subscribe

तालुक्यातील नेरळ बाजारपेठेत वाहनचालक बेशिस्तपणे वाहने उभी करीत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. त्याबरोबर बाजारपेठेत खरेदीला येणार्‍या महिलांना आणि जेष्ठ नागरिकांना त्याचा त्रास होतो. यामुळे नवनिर्वाचित सरपंच जान्हवी साळुंके यांनी कारभार हाती घेताच बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्याची मोहीम उघडली होती. मात्र महिनाभर ही मोहीम राबविल्यावर परिस्थिती ‘जैसे थे’ च आहे. यामुळे नव्याची नवलाई संपली असल्याने ग्रामपंचायतीविरोधात नेरळकरांमध्ये नाराजी पसरली आहे. तसेच बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावणार्‍या नेरळ ग्रामपंचायतीचीच शिस्त बिघडली असल्याचे बोलले जात आहे.

आजूबाजूच्या अनेक गावांना एकमेव अशी ही बाजारपेठ आहे. कळंब, कशेळे, शेलू या गावांना जोडली गेलेली छोटी-मोठी गावे, वाडी-पाडे यांना बाजारपेठ जवळची असल्याने तेथे कायम गर्दी पाहायला मिळते. मात्र खरेदीला येणारे ग्राहक आपले वाहन रस्त्यात कुठेही उभे करून खरेदी करीत असल्याने वाहतूक कोंडी होते. पण प्रामुख्याने महिला, जेष्ठ नागरिक व लहान मुलांना रस्त्यातून चालणेदेखील मुश्किल होते. हीच परिस्थिती बुधवारचा आठवडा बाजार असताना आणखी बिकट होते. अनेक महिलांना आठवडा बाजारात खरेदी करताना गाडीचे धक्के लागल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे डिसेंबर 2018 मध्ये सरपंचपदाचा कारभार हाती घेतल्यानंतर साळुंके व ग्रामपंचायतीमधील सहकारी सदस्य यांनी अशा गाड्यांवर कारवाईची मोहीम राबवण्याचे ठरवले. त्यानुसार वाहनचालकांना शिस्तीचे डोस देण्यास सुरुवात करण्यात आली. वाहतूक पोलिसांच्या मदतीने रस्त्यात उभ्या असलेल्या गाड्या टो करून नेण्यास सुरुवात करण्यात आली.

- Advertisement -

या मोहिमेचे नेरळकरांकडून स्वागत करण्यात आले. सुमारे महिनाभर ही मोहीम राबविल्यावर मागील सत्ताधार्‍यांप्रमाणे ग्रामपंचायतीने पाठ थोपटून घेतल्यावर ‘ये रे माझ्या मागल्या’, असे झाले. त्यानंतर ग्रामपंचायतीचे कुणी बाजारपेठेत गाड्या उचलण्यासाठी फिरकले नाहीत. या कारवाईच्या वेळेस लवकरच टोइंग व्हॅनला कंत्राट देऊन हे काम योग्यरितीने केले जाईल, हे आश्वासनही हवेत विरून गेले आहे. त्यामुळे बाजारपेठेला पुन्हा बकाल रूप आले आहे. भाजी विक्रेते फुटपाथ सोडून रस्त्यावर येऊन धंदा करीत आहेत. रस्त्यावर कायम वेड्यावाकड्या गाड्या पार्किंग केलेल्या असतात, तर रेल्वे स्टेशन परिसराला अनधिकृत फेरीवाल्यांचा विळखा पडलेला पाहायला मिळतो. मुबलक कर्मचारी असलेल्या जिल्ह्यातील सगळ्यात मोठ्या नेरळ ग्रामपंचायतीचे प्रशासन यामध्ये कुचकामी ठरत असल्याच्या चर्चा सध्या रंगत आहेत.

नेरळ ग्रामपंचायतीच्या सरपंच जान्हवी साळुंके यांना याबाबत विचारणा केली असता केवळ तीन दिवस बाजारपेठेतील गाड्या उचलल्या गेल्या नाहीत, तर ग्रामसेवक व नागरिकांच्या म्हणण्याप्रमाणे सुमारे दीड महिने ही कारवाई बंद आहे. यावरून ग्रामपंचायतीमधील कारभाराबाबत सरपंच अनभिज्ञ असल्याचे सिद्ध होते. त्यामुळे यांचाही कारभार नवरोजीरावांच्या हातात आहे, असे बोलले जात आहे.

- Advertisement -

ग्रामपंचायतीकडून बेशिस्त पार्किंग केलेल्या गाड्या उचलण्याची कार्यवाही सुरूच आहे. फक्त 3 दिवस त्यात खंड पडला आणि याबाबत कंत्राट देण्याची आमची प्रक्रिया सुरू आहे.
-जान्हवी साळुंके, सरपंच

काही कारणास्तव गेल्या दीड महिन्यांपासून बाजारपेठेतील बेशिस्त पार्किंग केलेली वाहने उचलण्याची कार्यवाही बंद आहे. लवकरच पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने ती पूर्ववत सुरू करू.
-राजेंद्र गुदडे, ग्रामसेवक

सरपंच व त्यांच्या सहकारी सदस्यांनी सत्तेत आल्यानंतर महिनाभर उत्तम कामगिरी केली. मात्र त्यानंतर त्याचे लक्ष नेरळच्या विकासाकडे न राहता पाणी कनेक्शनवरच राहिले. त्यामुळे नेरळ बाजारपेठेतील बेशिस्त पार्किंग पुन्हा सुरू झाली.
-विजय मिरकुटे, कामगार नेते

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -