मराठी भाषा शिकवणे आता सक्तीचे; अन्यथा शाळांवर होणार दंडात्मक कारवाई

राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मराठी न शिकवल्यास दंडात्मक कारवाई आणि शाळेची मान्यता रद्द करण्याची तरतूद मराठी शिक्षण कायद्याच्या मसुद्यात करण्यात आली आहे.

Pune
मराठी बाराखडी (सौजन्य - गुगल)

राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मराठी न शिकवल्यास दंडात्मक कारवाई आणि शाळेची मान्यता रद्द करण्याची तरतूद मराठी शिक्षण कायद्याच्या मसुद्यात करण्यात आली आहे. तसेच या कायद्याला कोणत्याही कोर्टात आव्हान देता येणार नसल्याचेही यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आता शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची होईल. ‘मराठीच्या भल्यासाठी’ या मुक्त व्यासपीठाच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील २४ संस्थांनी मुंबईत धरणे आंदोलन केले होते. त्यानंतर विविध तज्ज्ञांच्या मदतीने ‘महाराष्ट्र (शाळांमध्ये मराठीचे सक्तीचे अध्यापन व अध्ययन) अधिनियम २०१९’ या शीर्षकांतर्गत मसुदा तयार करण्यात आला आहे.

यापूर्वीही राज्यातील एसएससी, आयसीएससी आणि सीबीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे सक्तीचे असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये केली होती. तर राज्यात इंग्रजी आणि इतर माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा कायदा सक्तीचा करण्याबाबतचा तारांकित प्रश्न डॉ. नीलम गोऱ्हे यांनी औचित्याचा मुद्दा विधानपरिषदेमध्ये मांडला होता. काही साहित्यिक मराठी भाषा शिकवली जावी म्हणून येत्या २४ जूनला आझाद मैदान येथे आंदोलन करणार असल्याचे नीलम गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले होते.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या https://www.masapapune.org या संकेतस्थळावर हा मसुदा खुला करण्यात आला आहे. या मसुद्यावर सर्वसामान्य नागरिक, साहित्यिक, कलावंत, शिक्षक, प्राध्यापक, साहित्य संस्था, शिक्षण संस्थांना हरकती सूचना नोंदवता येतील. त्यासाठी १५ ऑगस्ट ही मुदतदेखील देण्यात आली आहे. इयत्ता पहिलीसाठी शैक्षणिक वर्ष २०२०-२१ आणि दुसरीसाठी २०२१-२२ या वर्षांपासून मराठी शिकवणे अनिवार्य करून टप्प्याटप्प्याने सर्व शाळांमध्ये पहिली ते बारावीपर्यंत मराठी शिकवण्यात येईल. ज्या विद्यार्थ्यांची मातृभाषा मराठी किंवा इंग्रजी नाही, अशा विद्यार्थ्यांना वैकल्पिक विषय म्हणून त्यांची मातृभाषा निवडता येईल. सीबीएसई, आयसीएसईसह सर्व शिक्षण मंडळांच्या शाळांना हा कायदा लागू असेल. मराठी शिक्षण कायद्याचे पालन न करणाऱ्या शाळेच्या मुख्याध्यापक आणि व्यवस्थापनाला दोन टप्प्यांत १५ हजारांपर्यंत दंड केला जाईल. त्यानंतरही शाळा व्यवस्थापनाने सुधारणा न केल्यास संस्थेची परवानगी आणि ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

या तरतुदींचा मसुद्यात समावेश

  • मराठी बोलण्यास किंवा त्यासह अन्य काही भाषा बोलण्यास निर्बंध घालणारे कोणतेही फलक, सूचना शाळेत लावता येणार नाहीत, तशी मोहीम चालवता येणार नाही
  • मराठीमध्ये उत्तीर्ण होणे अनिवार्य असेल
  • प्रत्येक शाळेला मराठीच्या अध्यापन-अध्ययनासाठी राज्य शासनाने नियुक्त केलेल्या पाठ्यपुस्काचा वापर करणे बंधनकारक असेल
  • जिल्हा शिक्षणाधिकाऱ्याच्या दर्जाच्या अधिकाऱ्याची सक्षम प्राधिकारी म्हणून नेमणूक करता येईल
  • शिक्षण उपसंचालक दर्जाचा अधिकारी अपील अधिकारी असेल