घरमहाराष्ट्रयुती नाही तर निवडून कसे येणार? सेना-भाजप खासदारांना धास्ती!

युती नाही तर निवडून कसे येणार? सेना-भाजप खासदारांना धास्ती!

Subscribe

२०१४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मोदी लाट असल्यामुळे अनेक सेना-भाजप खासदारांना मोठी मदत झाली. आता मात्र मोदी लाट नसताना सेना-भाजप युती देखील होणार नसल्याची चिन्ह असल्यामुळे दोन्ही पक्षातले काही खासदार टेन्शनमध्ये आले आहेत!

आगामी लोकसभा निवडणुकीची तारीख येत्या काही दिवसांत घोषित होऊ शकते. यामुळे सध्या सर्वच पक्ष जोरदार कामाला लागले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची तर आघाडी आता जवळपास निश्चित झाली असून, युतीचं घोंगडं मात्र अजूनही तसंच भिजत पडल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे मोदी लाटेत निवडून आलेल्या अनेक खासदारांना युती होणार की नाही? आणि नाही झाली तर काय? याची चिंता वाटू लागली आहे. मोदी लाटेत निवडून आलेल्या शिवसेना-भाजपाच्या काही खासदारांचं तर युतीवरच भवितव्य अवलंबून असल्याचं काही खासदारांनी ‘माय महानगर’शी बोलताना सांगितलं. त्यामुळे जर लोकसभेसाठी शिवसेना-भाजपची युती झाली नाही, तर अनेक धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे.

…म्हणून हवी त्या खासदारांना युती!

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपाचे २३ तर शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले होते. यातील काही खासदारांना तर मोदी लाटेत अक्षरशः लॉटरी लागली होती. २०१४ मध्ये संपूर्ण देशात मोदी लाट होती. मात्र आता मोदींची ही लाट ओसरली असल्याने त्यावेळी लाटेत निवडून आलेल्या खासदारांनी आता धास्ती घेतली आहे. यातीलच काही खासदारांनी ‘माय महानर’शी खासगीत बोलताना सांगितले की, ‘युती होणे ही दोन्ही पक्षांसाठी आवश्यक आहे. कारण २०१४ चे वातावरण आता राहिलेले नाही. त्यामुळे युती झाली, तर त्याचा फायदा दोन्ही पक्षांना होईल आणि नाही झाली तर त्याचा तोटाही दोन्ही पक्षांना सहन करावा लागेल.’

- Advertisement -

अरे देवा..थेट प्रेयसीच! – शिवसेना भाजपमध्ये प्रियकर प्रेयसीचे नाते – प्रकाश आंबेडकर

संघाच्या यादीतही महाराष्ट्रातले खासदार धोक्यात!

मागील वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपाच्या जवळपास देशभरातील ४५ खासदारांची खासदारकी धोक्यात असल्याची यादी जाहीर केली होती. त्यामध्ये महाराष्ट्रातीलही काही खासदारांचा समावेश होता. त्यामध्ये सोलापूरचे खासदार शरद बनसोडे, भिवंडीचे कपिल पाटील, लातूरचे सुनील गायकवाड आणि सांगलीचे संजय काका पाटील यांचा समावेश होता.
दरम्यान, याबद्दल आम्ही शिवसेनेचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी ‘युती करायची की नाही हा सर्वस्वी निर्णय पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हेच घेणार’, असल्याचे सांगत अधिक बोलणे टाळले.

हे खासदार डेंजर झोनमध्ये?

  • अरविंद सावंत (शिवसेना-मुंबई)
  • पूनम महाजन (भाजपा-मुंबई)
  • हेमंत गोडसे (शिवसेना-नाशिक)
  • अनंत गीते (शिवसेना-रायगड)
  • शरद बनसोडे (भाजप-सोलापूर)
  • सुनील गायकवाड (भाजप-लातूर)
  • संजय काका पाटील (भाजप-सांगली)
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -