Coronavirus: रुग्णालये व वैद्यकिय संस्थाशी व्हिडिओ काॅन्फरन्सींगव्दारे विशेष बैठक!

Navi Mumbai
Video Conferencing with Hospitals and Medical Institutions
रुग्णालये व वैद्यकिय संस्थाशी व्हिडिओ काॅन्फरन्सींगव्दारे विशेष बैठक!

कोव्हीड-१९ चा प्रसारावर नियंत्रण आणण्यासाठी विविध उपाययोजना करतानाच आगामी काळात याचा प्रादुर्भाव वाढून आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास विलगीकरण (आयसोलेशन) केंद्र उपलब्ध होण्याच्या दृष्टीने पूर्वनियोजन करण्याकरिता नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मोठी रुग्णालये तसेच वैद्यकिय क्षेत्राशी संबंधित विविध असोसिएशनचे पदाधिकारी यांच्यासोबत व्हिड़ीओ कॉन्फरन्सव्दारे अत्यंत महत्वाची बैठक घेण्यात आली. यामध्ये नवी मुंबई महापालिका मुख्यालयातून कोकण विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर तसेच महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली व मार्गदर्शन केले.

यावेळी महानगरपालिका क्षेत्रातील मोठ्या रुग्णालयांच्या प्रमुखांशी व्हिडीओ कॉन्फरंन्सींगव्दारे चर्चा करण्यात येऊन त्यांना जगभरातील इतर देशांतील परिस्थिती बघता कोव्हीड-१९ च्या प्रसाराचा धोका ओळखून तशाप्रकारची परिस्थिती उद्भवल्यास आवश्यक उपचारांकरिता विलगीकरण केंद्र (आयसोलेशन सेंटर) उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सूचना देण्यात आल्या. या अनुषंगाने रुग्णालयात उपलब्ध बेड्सची संख्या, डॉक्टर्स व पॅरामेडीकल स्टाफ, व्हेंटीलेटर्स व इतर वैद्यकिय सुविधा यांची माहिती त्वरीत नवी मुंबई महानगरपालिकेकडे संकलित करण्याचे सूचित करण्यात आले आहे. ही राष्ट्रीय आपत्ती असून यामधून बाहेर पडणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असल्याचे यावेळी प्रकर्षाने निदर्शनास आणून देण्यात आले.


हेही वाचा – बोर्डाचे आदेश पण, ‘या’मुळे दहावी-बारावीचे निकाल रखडणार

या व्हिड़ीओ कॉन्फरंन्सींगमध्ये सहभागी इंडियन मेडीकल असोसिएशन, इंडियन पिडियाट्रीक असोसिएशन, आयुर्वेदिक असोसिएशन, होमियोपॅथिक असोसिएशन, नवी मुंबई ऑबेस्ट्रीक ॲण्ड गायनेक असोसिएशन यांचे प्रमुख पदाधिकारी यांच्याशीही चर्चा करण्यात आली. तसेच त्यांच्याकडून अशा प्रसंगी आवश्यक सहकार्य उपलब्ध होण्याबाबत सूचना देण्यात आल्या. इंडियन केमिस्ट असोसिएशन यांच्याकडूनही आवश्यक औषध साठा व योग्य प्रकारे पुरवठा याबाबत कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या. आपत्कालीन प्रसंगात पॅरामेडीकल स्टाफची गरज भासल्यास नर्सींग कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्याही सेवा उपलब्ध करून घेणेबाबत नियोजन करण्यात आले. त्याचप्रमाणे सी.एस.आर. च्या माध्यमातून उद्योजकांकडून आवश्यक सुविधा उपलब्ध करून घेणेबाबत विचार विनिमय करण्यात आला.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी एका बाजूला ठोस उपाययोजना केल्या जात असताना दुसरीकडे प्रसाराचा वाढता धोका लक्षात घेऊन आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास पूर्वतयारी असावी यादृष्टीने तातडीने सदर बैठक व्हिड़ीओ कॉन्फरंन्सींगव्दारे आयोजित करण्यात आली होती. यामध्ये उद्भवू शकेल अशा संभाव्य परिस्थितीवर सविस्तर विचार विनीमय होऊन त्यादृष्टीने आवश्यक उपचारात्मक पावले उचलण्याबाबत पूर्वनियोजनाविषयी विस्तृत चर्चा करण्यात आली. सर्व रुग्णालय प्रशासन आणि वैद्यकीय संस्था यांनी आपल्याकडील माहिती महानगरपालिकेकडे त्वरीत देऊन कोव्हीड – 19 प्रतिबंधात्मक कार्यात संपूर्ण योगदान द्यावे असे आवाहन यावेळी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here