मुंडे म्हणतात उदयनराजे राष्ट्रवादीतच; उदयनराजेंच मात्र ठरलंय

Pune
Dhananjay Munde vs UdayanRaje Bhosale

विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या ते संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. मात्र, या चर्चांना फेटाळून लावत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुडेंनी उदयनराजे राष्ट्रवादीत असल्याचे म्हटले आहे. मात्र दुसऱ्या बाजुला उदयनराजे हे भाजपच्या संपर्कात असून ते १४ सप्टेंबर रोजी दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची बातमी एका वेबसाईटने दिली आहे.

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची उदयनराजे यांनी पुण्यात भेट घेतली. तब्बल दोन तास ही बैठक सुरू होती. बैठकीला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि आमदार शशिकांत शिंदे देखिल उपस्थित होते. या बैठकीनंतर उदयनराजे यांनी विचार केला आणि भाजपमध्ये प्रवेशाला होकार दिल्याची माहिती मिळत आहे. त्याआधी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे यांनी भाजपवर टीका केली होती. उदयनराजे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या भाजपकडून पेरण्यात येत असल्याचे ते म्हणाले. “उदयनराजेंची कोणतीही नाराजी नसून ते पक्षातच आहेत. ते कधीही भाजपच्या प्रवेशावर बोलले नाहीत. मात्र, भाजपच्या गोटातून ही चर्चा केली जात आहे. जनतेचे लक्ष्य मूळ समस्यांवरून दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपने हा खटाटोप चालवला आहे.”, अशी प्रतिक्रिया मुंडे यांनी दिली.

शिवस्वराज्य यात्रेच्या वेळी उदयनराजे यांच्या गैरहजेरीमुळेही तर्क-वितर्क लावले जात होते. यावर मुंडे म्हणाले की, उदयनराजे यांच्यामागे इतर कामांचा व्याप होता. त्यामुळे ते शिवस्वराज्य यात्रेला येऊ शकले नाहीत.  उदयनराजे यांनी पवार यांची भेट घेऊन भाजप प्रवेशाच्या चर्चेला ब्रेक लावल्याचे म्हटले जात आहे. उदयनराजे राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे निश्चित झाल्याचही म्हटले जात आहे.