चाकरमान्यांच्या मार्गात रस्त्यावरील खड्ड्यांचे विघ्न

Mumbai

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या दुसर्‍या टप्प्याचे काम चालू असताना वाहनचालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यातच आता या मार्गावर जागोजागी खड्डे पडले असून, पाऊस नसला की पोलादपूर ते महाडपर्यंत धुळीचे साम्राज्य पहायला मिळत आहे. गणेशोत्सव तोंडावर असल्याने काही दिवसांतच तळ कोकणात जाणार्‍या प्रवाशांच्या वाहनांची गर्दी होईल. त्यांना खड्ड्यांच्या विघ्नाला सामोरे जावे लागेल, असेच दिसत आहे.

तळकोकणात जाणारा एकमेव मार्ग येथून जातो. त्यामुळे या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मात्र काही महिन्यांपासून महामार्गाची स्थिती खराब झाली आहे. जागोजागी उखडलेले रस्ते, खड्ड्यांचे साम्राज्य, चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. परिणामी चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी घर वेळेत गाठणे कठीण होणार आहे. अरुंद रस्ते व खड्डे यामुळे वाहतूक कोंडीचीही मोठी समस्या निर्माण होणार आहे. अशीच अवस्था या मार्गात वडखळ, पेण, कोलाड, नागोठणे याठिकाणी झाली आहे. त्यामुळे महामार्ग प्राधिकरण यावर कोणता उपाय योजणार, असा सवाल उपस्थित होत आहे.