अशी दिवाळी ४९९ वर्षांनीच!

ज्योतिषाचार्य अनिल चांदवडकर यांनी ‘आपलं महानगर’ला दिली माहिती

दिलीप कोठावदे, नवीन नाशिक

दिवाळीचा सण हा पाच दिवसांचा असतो. मात्र, यंदा दिवाळी पाच दिवसांऐवजी चार दिवसांचीचअसेल. नेहमी दिवाळीच्या दोन दिवस आधी असणारी धनतेरसदेखील दिवाळीच्या एक दिवस आधी म्हणजे १३नोव्हेंबरला असणार आहे. दिवाळी पाडवा अन् भाऊबीज १६ नोव्हेंबरला साजरी केली जाईल.या दिवाळीत ग्रहांचा मोठा खेळ पाहायला मिळणार असून दिवाळीच्या दिवशी, गुरु ग्रह स्वस्थानात, धनु आणि शनि आपल्या स्व गृही, तर शुक्र ग्रह कन्या राशीत असेल. तीन ग्रहांचा असा दुर्मिळ योग ४९९ वर्षांपूर्वी सन १५२१ मध्ये आला असल्याची माहिती ज्योतिषाचार्य अनिल चांदवडकर यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना दिली.

दीपावलीचा सण हा पंच महोत्सव आहे, परंतु यावेळी पाच दिवस नव्हे तर चार दिवसांचा उत्सव होईल. १३ नोव्हेंबर रोजी दीपपर्व धनतेरसपासून सुरू होईल, जे १६ नोव्हेंबर रोजी भाऊबीजेच्या दिवशी संपन्न होईल. धार्मिक मान्यतेनुसार कार्तिक अमावस्येच्या दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वीवर संचार करते म्हणूनच हा सण अमावस्येच्या रात्री साजरा केला जातो.

दिवाळी, आमावस्या तिथी आणि लक्ष्मी पूजन

या वेळी अमावस्या तिथी १४ नोव्हेंबर रोजी दुपारी २.१७ वा. सुरू होऊन दुसर्‍या दिवशी १५ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३६ वा. संपेल. म्हणूनच शनिवारी, १४ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन केले जाईल.

धनतेरस

धनत्रयोदशी तिथी १२ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३१ ते १३ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत असून याच दिवशी म्हणजे १३ नोव्हेंबर रोजी प्रदोष व्रतदेखील आहे. धनतेरस आणि प्रदोष एकाच दिवशी असल्याचा हा दुर्मिळ योग आहे.

दिवाळी शनिवार योग

यावर्षी नवरात्राचे स्थापना शनिवारी होती आणि दिवाळीही शनिवारी आहे. तसेच शनि हा मकर राशीत असल्याने हा अत्यंत शुभ योग आहे. हा योग व्यवसायासाठी फायद्याचा आणि लोकांसाठी शुभ असेल. ४९९ वर्षांनंतर हा एक दुर्मिळ योगायोग आला आहे.