मुख्यमंत्र्यांसोबत पूजा? असं काहीही नाही! – उद्धव ठाकरे

काही दिवसांपासून उद्धव ठाकरे मुख्यंत्र्यांसोबत आषाढी एकादशीला विठ्ठल पूजेत सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, ही चर्चा खोटी असल्याचं खुद्द उद्धव ठाकरेंनीच स्पष्ट केलं आहे.

Mumbai
udhav thackeray pc
उद्धव ठाकरे पत्रकार परिषद

गेल्या चार वर्षांमध्ये पहिल्यांदाच उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांसोबत पंढरपूरला आषाढी एकादशीच्या दिवशी शासकीय विठ्ठल पूजेवेळी उपस्थित असतील, असं बोललं जात होतं. मात्र, आता खुद्द उद्धव ठाकरेंनीच यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘मुख्यंमत्र्यांसोबत मी विठ्ठलपूजेसाठी जाणार असल्याचं वृत्त चुकीचं आहे. मी पंढरपूरला जाणारच नाहीये. आणि यासंदर्भातलं वृत्त कुणी पसरवलं, हे देखील मला माहीत नाही’, असं उद्धव ठाकरे म्हणाले. ‘इथल्या यंत्रणांना हलवणं आणि जागं करणं हे आमचं काम असून ते आम्ही करणार’, असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले. शेतकरी कर्जमाफीसंदर्भात उद्धव ठाकरेंनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांनी त्यांना पंढरपूर दौऱ्याविषयी विचारल्यानंतर त्यांनी वरील उत्तर दिले.

शिवसेनेचा विमा कार्यालयावर मोर्चा

‘शेतकरी कर्जमाफी आणि प्रधानमंत्री फसल विमा योजना या दोन्ही योजना चांगल्या आहेत, पण यंत्रणेतल्या दोषांमुळे शेतकऱ्यांपर्यंत त्या पोहोचत नाहीत. ग्रामीण भागातल्या शिवसेनेच्या मदत केंद्रावर यासंदर्भातले अर्ज येत आहेत. त्यामुळे येत्या बुधवारी शिवसेना स्वत: वांद्र्यातल्या विमा कार्यालयावर मोर्चा काढणार आहे’, असे उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले. तसेच, ‘हा मोर्चा शेतकऱ्याचा नसून शेतकऱ्यासाठी असेल. तो इशारा मोर्चा आहे. पण जर तरी विमा कंपन्यांना कळणार नसेल, तर त्यांना शिवसेनेच्या भाषेद उत्तर देण्यात येईल’, अशा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.


हेही वाचा – अटलजींनी कधी राजीनामा दिला नाही-उद्धव ठाकरे

स्वतंत्र कृषी आयोगाची मागणी

दरम्यान, यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी ‘केंद्रीय कृषी आयोग स्वतंत्रच असावा’, अशी मागणी केली. ‘पी. साईनाथ यांनी यासंदर्भात काही सूचना केल्या आहेत. त्यासोबतच ज्यांना शेतीमधलं खरंच समजतं, त्यांना या आयोगात सहभागी करून घ्यायला हवं’, असं ते यावेळी म्हणाले.