घरमुंबईभिवंडी महापालिकेत भाजपचा काँग्रेसला खो; ४ नगरसेवक असलेल्या ‘कोणार्क’आघाडीचा महापौर

भिवंडी महापालिकेत भाजपचा काँग्रेसला खो; ४ नगरसेवक असलेल्या ‘कोणार्क’आघाडीचा महापौर

Subscribe

भिवंडीत काँग्रेसचे 18 नगरसेवक फुटले

ठाणे भिवंडी शहर महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे 18 नगरसेवक फुटल्याने भाजप कोणार्क विकास आघाडीच्या प्रतिभा पाटील या विजयी झाल्या. तर उपमहापौर पदावर कोणार्क पुरस्कृत काँग्रेसचे नगरसेवक इम्रान खान निवडून आले आहेत. त्यामुळे सत्ताधारी काँग्रेस-शिवसेना युती गटाला जबरदस्त धक्का बसला आहे. याअगोदर भिवंडी महानगर पालिकेत काँग्रेसचा महापौर होता.

भिवंडी पालिकेत महापौर व उपमहापौर पदासाठी मुंबई उपनगराचे जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी दुपारी 12:20 वाजता निवडणूक घेण्यात आली. महापौर पदासाठी काँग्रेसकडून रिषिका राका व भाजप-कोणार्क विकास आघाडीच्या माजी महापौर नगरसेविका प्रतिभा पाटील या रिंगणात होत्या. पीठासीन अधिकारी जोंधळे यांनी हात वर करून मतदान घेतले. या मतदान प्रक्रियेत कोणार्क विकास आघाडीसह आरपीआय, समाजवादी पक्ष व भाजप व फुटीरतावादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी प्रतिभा पाटील यांना मतदान केल्याने त्या 49 मतांनी विजयी झाल्या.

- Advertisement -

विशेष म्हणजे महापालिकेत काँग्रेसचे एकूण 47 नगरसेवक असून त्यापैकी 18 नगरसेवक भाजप कोणार्क विकास आघाडीकडे गेल्याने काँग्रेस उमेदवाराचा दारुण पराभव झाला. त्यामुळे काँग्रेस व शिवसेनेला सत्तेपासून पायउतार व्हावे लागले आहे. तर उपमहापौर पदाच्या निवडणुकीत सुद्धा भाजप व कोणार्क विकास आघाडीने पुरस्कृत केलेल्या काँग्रेसचे नगरसेवक इम्रान खान यांना 49 मते मिळाली. त्यांनी सेनेचे ज्येष्ठ नगरसेवक बाळाराम चौधरी यांचा पराभव केला. चौधरी यांना 41 मते मिळाली.

या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात अर्थकारण घोडेबाजार झाल्याने काँग्रेसच्या नगरसेवकांनी पक्षाला लाथाडून सरळ भाजप कोणार्क विकास आघाडीला उघडपणे साथ दिली. त्यामुळे गेल्या अडीच वर्षांपासून सत्तेवर असलेल्या काँग्रेस लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा महापालिकेच्या महापौर निवडणुकीत काँग्रेसला जोरदार झटका बसला आहे. भाजपचे खासदार कपिल पाटील, आमदार महेश चौगुले आणि माजी महापौर विलास आर. पाटील यांनी आघाडीची सत्ता उलथवून चमत्कार केल्याने कोणार्क आघाडीला विजय मिळविता आला.

- Advertisement -

2017 साली शिवसेनेच्या मदतीने काँग्रेसने महापौर पद मिळवले होते. भाजप व कोणार्क विकास आघाडीला सत्तेपासून दूर राहावे लागले होते. याची सल भाजप कोणार्क विकास आघाडीला होती. त्यामुळे गुरुवारी झालेल्या निवडणुकीत भाजप कोणार्क विकास आघाडीने काँग्रेसच्या 18 नगरसेवकांना फोडून महापालिकेत सत्ता स्थापन केली आहे. विधानसभेपाठोपाठ राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीची वल्गना करणार्‍या महाविकास आघाडीच्या नेत्यांना भिवंडीतून जोरदार धक्का बसला आहे. त्यामागे खासदार कपिल पाटील, महेश चौघुले आणि विलास पाटील यांची एकत्रित रणनिती कारणीभूत ठरली आहे.

खराब रस्ते व वाहतूक कोंडीचा जिल्हाधिकार्‍यांना फटका
भिवंडी महानगर पालिकेत महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक गुरुवारी दुपारी 12 वाजता मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. मात्र भिवंडीतील खराब रस्ते व वाहतूक कोंडीमुळे निवडणूक निर्णय अधिकारी या निवडणुकीसाठी उशिरा पोहचल्याने ही निवडणूक जवळपास 20 मिनिटे उशिराने सुरू झाली.

निवडणूक प्रक्रिया सुरू असताना काँग्रेस पक्षाचे व्हीप वाटप
या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचे गटनेते हलीम अंसारी यांनी सभागृहात निवडणूक प्रक्रिया सुरु असताना काँग्रेसच्या नगरसेवकांना जबरदस्तीने पक्षाचे व्हीप वाटप सुरु केले. त्यावर काँग्रेसचे नगरसेवक इम्रान खान यांनी आक्षेप घेत व्हीप वाटपाचे काम बंद पाडले. विशेष म्हणजे काँग्रेस गटनेते हलीम अन्सारी यांनी सुरुवातीला काँग्रेस उमेदवार रिषिक राका यांच्या नावाने दोन दिवसांपूर्वी पक्षाचा व्हीप जाहीर केला असताना गुरुवारी प्रत्यक्षात निवडणुकीच्या दिवशीच वर्तमानपत्रात कोणार्क विकास आघाडीच्या नगरसेविका प्रतिभा विलास पाटील यांना मतदान करा अशी जाहीरात खुद्द काँग्रेस गटनेत्यांनी दिल्याने तंटा निर्माण झाला होता. विशेष म्हणजे दोन-दोन व्हीप जाहीर केल्याने महापौर व उपमहापौर निवडणुकीत होणार आर्थिक घोडेबाजाराची गटबाजी उघड झाली होती.

भिवंडीतील पक्षीय बलाबल
भिवंडी महापालिकेच्या 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत 90 जागांपैकी काँग्रेसने 47 जागा मिळवून बहुमत संपादन केले. तर भाजपने 20 शिवसेनेने 12, कोणार्क आघाडी व रिपब्लिकन पक्षाने प्रत्येकी चार, समाजवादी पक्षाला दोन आणि एक अपक्ष नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे काँग्रेसने 2017 मध्ये शिवसेनेच्या मदतीने काँग्रेसने महापौरपद मिळविले होते. त्याबदल्यात काँग्रेसने सेनेला उपमहापौर पद दिले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -