घरमुंबईरस्ते दुभाजक रंगरंगोटीच्या निविदा रद्द; अश्विनी जोशींनी लूट रोखली!

रस्ते दुभाजक रंगरंगोटीच्या निविदा रद्द; अश्विनी जोशींनी लूट रोखली!

Subscribe

मुंबई महापालिकेच्या तिजोरीची लूट कंत्राटदारांकडून केली जात असल्याचे आरोप होत असतानाच रस्ते दुभाजक रंगवून ते पाण्याने दररोज धुण्याच्या नावाखाली होणारी तिजोरीतील लूट होण्यापासून अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी रोखली. तब्बल ८ ते ९ वेळा निविदा मागवून कंत्राटदाराचे भले करण्याचा प्रशासनाचा हा डाव जोशी यांनी उधळवून लावला. रस्ते दुभाजक रंगवण्यासाठी आणि धुण्याची आवश्यकताच नसून ही कामे करण्यासाठी कंत्राटदार नियुक्तच असल्याने या कामांसाठी कंत्राटदारांची गरज नसल्याने अतिरिक्त आयुक्तांनी ही निविदाच रद्द केली. महापालिका अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांच्याकडील घनकचरा व्यवस्थापन विभागाचा कार्यभार आठवड्यापूर्वीच अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्याकडे सोपवण्यात आला होता. परंतु या पदाचा भार स्वीकारताच विभागातील भ्रष्ट कारभाराची साफसफाईच त्यांनी केली.

कंत्राट कामांची गरजच नव्हती!

मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्यावतीने रस्ते दुभाजकांची रंगरंगोटी करून पाण्याने स्वच्छ राखण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. परंतु मागील अनेक महिन्यांपासून या निविदांना प्रतिसाद मिळत नसल्याने फेरनिविदा काढण्यात येत होत्या. त्यामुळे याबाबतची निविदा काढण्यात आल्यानंतर, घनकचरा व्यवस्थापन विभागाचा पदभार स्वीकारणार्‍या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी सहआयुक्त अशोक खैरे यांच्यासह घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख अभियंता आणि अधिकाऱ्यांकडून याची माहिती जाणून घेतली. जोशी यांनी घेतलेल्या उलट तपासणीमध्ये अधिकार्‍यांनी या कंत्राट कामांचीच गरजच नसल्याची माहिती दिली. त्यामुळे रस्ते दुभाजकांची रंगरंगोटी करून पाण्याने ते धुण्याच्या कंत्राटाची निविदाच जोशी यांनी रद्द करत महापालिकेच्या तिजोरीतून होणार्‍या कोट्यवधी रुपयांची लूट थांबवली आहे.

- Advertisement -

अश्विनी जोशींनी तीन निविदा केल्या रद्द!

या निविदेबरोबरच यांत्रिक सफाई आणि सुक्या कचर्‍यावरील प्रक्रिया यांच्याही निविदा रद्द केल्या आहेत. यांत्रिक सफाईच्या कामांबाबत नगरसेवकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. त्यामुळे ज्या अटींच्या आधारे या निविदा काढण्यात आल्या होत्या. त्यामध्ये कंत्राटदारांचेच हित पाहण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे याबाबत आलेल्या तक्रारी आणि चौकशीची माहिती घेऊन फेरनिविदा काढली जावी. यांत्रिक झाडूंच्या सफाईबाबतच्या काही तांत्रिक बाबी तपासून सुधारीत अटींसह नव्याने निविदा काढण्याचे आदेश देत या कंत्राट कामांच्या निविदा रद्द केल्या. याबरोबरच सुक्या कचर्‍यावरील प्रक्रियेसाठी एमआरटीएसअंतर्गत निविदाही रद्द केल्याची माहिती मिळत आहे. या निर्णयामुळे कंत्राटदारांशी असलेली सलगी आणि कोट्यवधी रुपयांची लूट रोखण्याचा प्रयत्न झाला आहे.

यासंदर्भात सहआयुक्त अशोक खैर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याला दुजोरा देत अतिरिक्त आयुक्तांनी तीन निविदा रद्द केल्याचे सांगितले. रस्ते दुभाजक रंगरंगोटी आणि पाण्याने धुण्याच्या कंत्राट कामांच्या निविदेसह एमआरटीएस तसेच यांत्रिक झाडूच्या निविदाही रद्द केल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -