घरमुंबईआंबेडकर स्मारकाआधी आता चैत्यभूमीवर भीमज्योत

आंबेडकर स्मारकाआधी आता चैत्यभूमीवर भीमज्योत

Subscribe

निवडणुकीपूर्वी सरकारची आणखी एक टूम

२०१९च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी-आधी दादरच्या इंदू मिलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य स्मारक साकारणे केंद्र आणि राज्य सरकारला अवघड होऊ लागले आहे.त्यामुळेच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दादरच्या चैत्यभूमीवर कायम तेवणारी ‘भीमज्योत’ उभारण्याची टूम भाजप सरकारने पुढे आणली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांंच्या ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनापूर्वी भीमज्योत उभारण्याचा संकल्प राज्यातल्या देवेंद्र फडणवीस सरकारने केला आहे. आंबेडकरी जनतेला आपलेसे करण्यासाठी राज्य सरकारच्या अनेक प्रयत्नांपैकी हा एक भाग असल्याची चर्चा मंत्रालयात सुरू आहे. सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांचे हे प्रयोजन असून फडणवीस यांनी ग्रीन सिग्नल दिला आहे.

- Advertisement -

राज्यात भाजपची सत्ता येण्याआधी भाजपने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आंतरराष्ट्रीय भव्य स्मारक मुंबईत उभारण्याचा संकल्प केला होता. आधीच्या काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारने यासाठी दादरच्या इंदू मिलची जागा निश्चित केली होती. याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाकडेही पाठवला होता. पण अपेक्षित वेळेत त्याला संमती मिळण्याअगोदरच आघाडी सरकारला राज्यातून पायउतार व्हावे लागले. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार येताच केंद्र सरकारने इंदू मिलची जागा आंबेडकरांच्या स्मारकासाठी देण्याची तयारी केली आणि ती राज्य सरकारकडे सुपूर्दही केली. स्मारकाची इंदू मिलमधील जागा राज्य सरकारकडे येऊन आता चार वर्षांचा कालावधी उलटला आहे. पण स्मारकाचे काम एका विटेनेही पुढे हललेले नाही.

यामुळे आंबेडकरी जनतेतील नाराजी दूर करण्यासाठी राज्य सरकार अनेक पर्यायांचा शोध घेत होते.
यावर सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी मार्ग काढला आणि निवडणुकीआधी भीमज्योत उभारण्याची कल्पना पुढे आणली. इंदू मिलच्या शेजारीच असलेल्या चैत्यभूमीवर भीमज्योत उभारून आंबेडकरी जनतेला आपलेसे करता येईल, असे हेरत बडोले यांच्या सामाजिक न्याय मंत्रालयाने ज्योत उभारण्याचा प्रस्ताव तयार करून तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संमतीसाठी पाठवून दिला. मुख्यमंत्र्यांनी त्याला लागलीच संमती दिल्यावर आता ही ज्योत बनवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या आठवड्यातच ज्योत उभारण्याचे काम सुरू केले जाणार आहे. हुतात्मा स्मारक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर सध्या अखंड ज्योत तेवत आहे. तशाच प्रकारे भीमज्योतही तेवत राहणार आहे. 24 तास पेटणार्‍या या भीमज्योतीसाठी गॅस पुरवण्याची तयारी महानगर गॅस कंपनीने दर्शवली आहे.

- Advertisement -

हे काम येत्या 6 डिसेंबरपूर्वी म्हणजे डॉ. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनापूर्वी पूर्ण करून ज्योत कार्यान्वित करण्यात येणार आहे. मुंबईतील ज्येष्ठ आर्किटेक्ट शशी प्रभू यांच्याकडे ज्योत उभारण्याचे काम देण्यात आले आहे. यानिमित्त नुकत्याच आयोजित एका बैठकीला प्रभू यांना बोलवण्यात आले होते. याशिवाय राज्य मेरिटाईम बोर्ड तसेच महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांची बैठक घेत सामाजिक न्यायमंत्री बडोले यांनी भीमज्योत उभारण्यासाठी सहकार्य करण्याच्या सूचना केल्या. राज्यात आणि देशात भाजपचे सरकार आल्यापासून अनेक ठिकाणी दलितांवर तसेच मागासवर्गीयांवर हल्ले झाले. मात्र भीमज्योतीच्या माध्यमातून ६ डिसेंबरला लाखोंच्या संख्येने येणार्‍या आंबेडकरी जनतेसमोर हा संदेश पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे सांगितले जाते. निवडणुकीच्या तोंडावर ही योजना राबवून आंबेडकरी जनतेची मते मिळवण्याचा पध्दतशीर प्रयत्न सुरू असल्याची टीका विरोधक करीत आहेत.

स्मृतिस्थळासमोर कायम तेवती ज्योत

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतिस्थळ 2013 मध्ये मुंबई महापालिकेने दादरच्या शिवाजी पार्कलगत साकारले. यासाठी 1 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. खासदार राहुल शेवाळे यांच्या खासदार निधीतून स्मृतीस्थळावर 24 तास पेटती ज्योत लावण्यात आली आहे. या ज्योतीसाठी केंद सरकारने इंडियन ऑईलमार्फत मोफत गॅस पुरवठा केला आहे.

चैत्यभूमीवरील अशोक स्तंभासमोर चौथरा उभारून त्याला सुरक्षित असे काचेचे संरक्षित आच्छादन केले जाणार आहे. मान्यवर शिल्पकार दीपक पाटकर हे काम करणार आहेत. चेंबूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर गार्डनमधील स्तंभ दीपक पाटकर यांनी उभारला आहे, तेच चैत्यभूमीवरील ज्योत उभारणी करतील. महिन्याभरात भीमज्योतीचे काम पूर्ण होईल.
– शशी प्रभू, ज्येष्ठ आर्किटेक्ट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -