मुख्याधापकाच्या मुलीला ब्लॅकमेल करणारा अटकेत

Mumbai
Police arrested
Police arrested

ओरिसामधील एका शासकीय शाळेत मुख्याधापकाच्या मुलीचे आक्षेपार्ह आणि अश्लील फोटो काढून तिला ब्लॅकमेल करणार्‍या एका 25 वर्षांच्या तरुणाला मुंबईतून ओरिसाच्या पोलिसांच्या एका विशेष पथकाने एन. एम. जोशी मार्ग पोलिसांच्या मदतीने अटक केली. अजयाकुमार सुभाषचंद्र दास असे या आरोपीचे नाव असून त्याला येथील स्थानिक न्यायालयाने पाच दिवसांची ट्रॉन्झिंट रिमांडवर पाठविले होते. त्याला पुढील चौकशीसाठी ओरिसा येथे नेण्यात आले आहे. आतापर्यंतच्या तपासात अजयाकुमारने या तरुणीने काही आक्षेपार्ह आणि अश्लील फोटो फेसबुकवर अपलोड केले आहे, त्यामुळे ही तरुणी प्रचंड मानसिक तणावात गेली असून तिच्यावर तिथे उपचार सुरु असल्याचे एका अधिकार्‍याने बोलताना सांगितले.

तक्रारदार 52 वर्षांचे असून ते ओरिसामधील एका शाळेत मुख्याधापक म्हणून काम करतात. त्यांची पिडीत मुलगी असून तिची फेसबुकच्या माध्यमातून आरोपी अजयाकुमारशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. गेल्या वर्षी अजयाकुमार हा ओरिसा येथे तिला भेटण्यासाठी गेला होता. यावेळी त्याने तिला लग्नाची मागणी घातली होती. तिनेही त्याला होकार दिला होता. तिच्याशी बोलताना त्याने तिच्या घरातील सर्व सदस्यांची माहिती जाणून घेतली होती. याच दरम्यान त्याने तिचे त्याच्या मोबाईल काही आक्षेपार्ह आणि अश्लील फोटो काढले होते. तिच्याकडे साडेअकरा हजार आणि एक सोन्याची चैन घेऊन त्याने ती रक्कम आणि चैन लवकर देऊ, असे सांगितले. त्यानंतर त्याने तिचे अश्लील फोटो तिला दाखवून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली होती. तिने त्यास नकार देताच त्याने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. तिने त्याची मागणी पूर्ण केली नाहीतर तिचे सर्व अश्लील आणि आक्षेपार्ह फोटो फेसबुकवर अपलोड करण्याची धमकी तो तिला देऊ लागला होता. त्याने तसे करु नये म्हणून तो तिच्याकडे पैशांची मागणी करीत होता.

त्यानंतर तिने हा प्रकार तिच्या पालकांना सांगितला. ही माहिती त्याला समजताच त्याने तिच्या नावाने फेसबुकवर एक बोगस अकाऊंट ओपन करुन तिचे सर्व फोटो फेसबुकवर अपलोड केले होते. या प्रकाराने ही तरुणी प्रचंड मानसिक तणावात गेली होती. तिची प्रकृती ढासळू लागल्याने तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिच्यावर तिथे उपचार सुरु झाले होते. यावेळी तिच्या वडिलांनी कोराकुट पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी अजयाकुमारविरुद्घ फसवणुकीसह अन्य भादवीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्यांची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह सायबर सेल पोलिसांना समांतर तपासाचे आदेश दिले होते.

फेसबुकवरील फोटोचा आयपी अ‍ॅड्रेस तपासल्यानंतर ते फोटो अजयाकुमारच्या मोबाईलवरुन अपलोड झाल्याचे तपासात उघडकीस आले, मात्र तो ओरिसा येथून मुंबईत आला होता. त्यानंतर ओरिसा पोलिसांचे एक विशेष पथक मुंबईत आले होते. या पथकाने एन.एम. जोशी मार्ग पोलिसांच्या मदतीने शुक्रवारी अजयाकुमार दास याला त्याच्या नातेवाईकांच्या घरातून अटक केली. चौकशीत त्याने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला शनिवारी स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते, यावेळी त्याला न्यायालयाने 17 जानेवारीपर्यंत ट्रॉन्झिंट रिमांडवर पाठविले आहे. त्यानंतर ताबा घेऊन संबंधित पोलीस ओरिसा येथे रवाना झाले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here