घरमुंबईमुंबई पालिकेचा आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष होणार अधिक हायटेक!

मुंबई पालिकेचा आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष होणार अधिक हायटेक!

Subscribe

मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहरात भूकंप, आग लागणे, इमारत, घरे पडणे आदी प्रसंगी संबंधित यंत्रणेला मदतीसाठी पाठवणाऱ्या पालिका आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाला आता आणखीन ‘हायटेक’ बनविण्यात येणार आहे. मुंबईत जर आणीबाणीची परिस्थिती ओढवली तर त्यावेळी तात्काळ बचावकार्य व्हावे आणि जीवित, वित्तहानी टळावी यासाठी खास ‘डिजिटल मोबाईल रेडिओ प्रणाली(डीएमआर)’ चा वापर संपर्कासाठी करण्यात येणार आहे. आपत्कालीन व्यवस्थापन विभाग डीएमआर प्रणाली असलेले ६५ बिनतारी संच, वाहनांवर बसवण्यासाठी ६० संच, इतर महत्त्वाच्या विभागांना वापरण्यासाठी २०१ वॉकीटॉकी संच, टेलिस्कॉपिक अँटेना, ५ रिपिटर संच तसेच प्रोग्रामिंग आणि डीसपॅचर खरेदी करणार आहे. त्यासाठी ई निविदा मागवून कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे. यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे.

मुंबई शहर हे आता पूर्वीसारखे राहिलेले नसून ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर झाले आहे. येथील झोपडपट्टी दरवर्षी कात टाकत असून त्याजागी एसआरए अंतर्गत इमारती, टॉवर उभे राहत आहेत. शहरीकरणाबरोबरच लोकसंख्याही झपाट्याने वाढत आहे. मात्र आजही मुंबईत काही झोपडपट्ट्या, इमारती, सोसायटी, टॉवर, मॉल, कंपन्या कारखाने आदी ठिकाणी आगी लागण्याच्या, पडझडीच्या घटना दररोज घडत असतात. त्यामुळे कधीकधी लहानमोठ्या प्रमाणात जीवित, वित्तीय हानीसुद्धा होत असते. अशा आपत्कालीन घटनाप्रसंगी आपत्कालीन यंत्रणा,अग्निशमन दल, एनडीआरएफ आदी यंत्रणा आपली भूमिका, कामगिरी चोखपणे बजावतात.

- Advertisement -

मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षात फोन, हॉटलाईन आणि ऍनालॉग बिनतारी संदेशवहन प्रणाली (व्हीएचएफ) प्रणाली वापरली जाते. तसेच, आपत्कालीन व्यवस्थापन विभागातर्फे विभाग कार्यालये, रुग्णालये, पालिकेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वाहनांवरही बिनतारी संच बसवण्यात आले आहेत. तसेच कर्मचाऱ्यांना वॉकीटॉकी संच देण्यात आले आहेत. आपत्ती व्यवस्थापन विभागात ऍनालॉग बिनतारी प्रणाली २००९ पासून कार्यरत असून या प्रणालीचा १० वर्षांचा कालावधी पूर्ण झाला असून सदर प्रणाली बदलून त्याऐवजी अत्याधुनिक अशी डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित ‘डिजिटल मोबाईल रेडिओ उपकरणे’ खरेदी केली जाणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -