तंत्र शिक्षण मंडळाच्या बॅकलॉगच्या परीक्षा २३ नोव्हेंबरपासून

महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या अंतिम वर्ष वगळून इतर वर्षाच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या बॅकलॉगच्या परीक्षांचे २३ नोव्हेंबरपासून घेण्याबाबतच्या सूचना मंडळाने दिल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या अंतिम वर्ष वगळून इतर वर्षाच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या बॅकलॉगच्या परीक्षांचे २३ नोव्हेंबरपासून घेण्याबाबतच्या सूचना मंडळाने दिल्या आहेत. परीक्षांचे नियोजन करताना संस्थांनी २३ नोव्हेंबर ते ५ डिसेंबरदरम्यान प्रात्यक्षिक परीक्षांचे लेखी परीक्षेपूर्वी नियोजन करावे असे स्पष्ट करण्यात आले आहे.

एआयसीटीईकडून मान्यताप्राप्त तसेच शासनमान्य अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमतील अंतिम वर्ष वगळून इतर सर्व विद्यार्थ्यांची बॅकलॉग प्रात्यक्षिक परीक्षा ऑनलाईनच्या माध्यमातून घ्यावी. यासाठी विविध मीटिंग अ‍ॅप्लिकेशन्सचा वापर करावा आणि हे शक्य नसल्यास टेलिफोनिक पद्धतीचा वापर करून परीक्षा घ्यावी असे एमएसबीटीईकडून सांगण्यात आले आहे. ऑनलाईन किंवा टेलिफोनिक पद्धतीने प्रात्यक्षिक शक्य न झाल्यास विद्यार्थ्यांचे सत्रकर्म, जर्नल, निरंतर मूल्यमापन या आधारावर गुण देण्याचा पर्याय संस्थांना देण्यात आला आहे.

एमसीक्यू पद्धतीने होणारी लेखी परीक्षा ऑनलाईनच घेण्यात येणार आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांना घरातूनच परीक्षा देणे शक्य होणार आहे. या परीक्षेत विद्यार्थ्यांना ४० पैकी ३० प्रश्न सोडवावे लागणार असून प्रत्येक प्रश्न १ गुणाचा असणार आहे. परीक्षेचा कालावधी १ तासाचा असणार आहे. बॅकलॉगची लेखी परीक्षा ही संपूर्ण अभ्यासक्रमावार आधारित असणार आहे. संस्थांनी बॅकलॉगच्या प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेचे वेळापत्रक तयार करून विद्यार्थ्यांना पोहचवावे आणि ज्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन सुविधा उपलब्ध नाहीत अशाना संस्थेमध्ये परीक्षेची सोय करून देण्याचा सूचना मंडळाने दिल्या आहेत.