पूररेषेपेक्षा उंच विजेचे टॉवर उभारणार

 कोल्हापूर, सांगली पुरातून महावितरणला धडा

Mumbai

अनेक नद्यांच्या परिसरात महावितरणचे विजेचे पोल आणि वीज वाहिन्यांच्या माध्यमातून वीज यंत्रणा उभारण्यात आली आहे. नदीच्या एका किनार्‍यापासून दुसर्‍या किनार्‍यावर केवळ विजेच्या खांबाचा वापर करता येतो. पण यंदाच्या महापुरात पाण्याने धोक्याची पातळी ओलांडून अनेक ठिकाणी विजेची यंत्रणा कोलमडून पडली. अनेक नदी परिसरातील महावितरणची यंत्रणा पुराच्या पाण्यात वाहून गेली. पुराच्या पाण्यात झाडे वाहून आल्याने विजेच्या खांबासह विजेचे पोलही वाहून गेले. म्हणूनच महावितरणकडून यापुढच्या वर्षात नदी क्षेत्र परिसरात सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात येणार आहे. त्यामध्ये सध्याच्या पूररेषेच्या तुलनेत मोठ्या उंचीचे टॉवर महावितरणकडून उभारण्यात येतील, अशी माहिती महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी दिली.

सद्यस्थितीला किती ठिकाणी अशा प्रकारचे टॉवर उभारण्याची गरज आहे, ही माहिती महावितरणकडे नाही. पण आगामी दोन ते तीन वर्षात ही संपूर्ण टॉवरची यंत्रणा उभारण्यात येईल. याकरता पूररेषेपेक्षा उंच टॉवर महावितरणकडून उभारण्यात येतील. सध्या उंच टॉवर्स केवळ महापारेषणच्या यंत्रणेत आहेत. महापारेषणसारखेच टॉवर महावितरणकडून नदी परिसरात उभारण्यात येतील, असे संजीव कुमार यांनी स्पष्ट केले. अनेक ठिकाणी विजेचे खांब पुराच्या पाण्याखाली आहे. म्हणूनच पुराच्या आगामी कालावधीतील धोका लक्षात घेऊन त्याच अनुषंगाने महावितरण महापारेषणसारखी यंत्रणा उभारेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

पूररेषेबाबत अभ्यास करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी नुकताच एक अभ्यासगट नेमला आहे. आता महावितरणकडूनही नदी परिसरातील भागातील वीज यंत्रणेसाठी नवीन धोरण आखण्यात येणार आहे. लवकरच राज्यात यासाठीचे सर्वेक्षण सुरू होईल.
– संजीव कुमार, व्यवस्थापकीय संचालक, महावितरण