घरमुंबईकोका कोलाविरोधात आमरण उपोषण

कोका कोलाविरोधात आमरण उपोषण

Subscribe

तालुक्यातील कुडूस ग्रामपंचायतीच्या हद्दीत कोकाकोला ही शीतपेये बनवणारी कंपनी असून या कंपनीने येथील शेतकरी नागेश जाधव यांच्या गट नंबर 289 मध्ये 56 गुंठे पैकी एक एकर (40 गुंठे) जमिनीवर अतिक्रमण केले असून वारंवार तक्रार करूनही कंपनी व महसूल प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने व कंपनीने पूर्ण मोबदला न मिळाल्याने संतापलेल्या शेतकर्‍याने रविवारपासून कुटुंबासह अतिक्रमण केलेल्या जागेवर आमरण उपोषण सुरू केले आहे.

कुडूस गावातील नागेश जाधव या शेतकरी कुटुंबाची कोकाकोला कंपनीलगत गट नंबर 289 मध्ये जमीन आहे. या 56 गुंठे जमिनीतील एक एकर (40 गुंठे) जागेवर कंपनीने अतिक्रमण केले आहे. जाधव यांनी जागेची भुमीअभिलेख कार्यालयाकडून मोजणी करून हद्द सुध्दा कायम करून घेतली आहे. या मोजणीत कंपनीच्या आवारात जागा शेतकर्‍याची असल्याचे दाखवण्यात आले असल्याचे नागेश जाधव यांनी सांगितले. कंपनी व महसूल कार्यालयाकडे अनेक वेळा अर्ज विनंत्या करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याचा आरोप नागेश जाधव यांनी केला आहे.

- Advertisement -

अनेक वर्ष अर्ज विनंत्या करूनही पूर्ण मोबदला व न्याय मिळत नसल्याने संतापलेल्या शेतकर्‍याने सोमवारी दुपार पासून अतिक्रमण केलेल्या जागेवर कुंटूबासह आमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे. न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरूच राहील असे उपोषणकर्ते जाधव यांनी सांगितले.

नागेश जाधव यांच्या पाठीशी शिवसेना व युवासेना ठामपणे उभी असून त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे शिवसेनेचे पालघर उपजिल्हा प्रमुख सुनिल पाटील, युवासेनेचे उपजिल्हा युवाअधिकारी सचिन पाटील व तालुका युवाअधिकारी निलेश पाटील यांनी सांगितले. दरम्यान कंपनीचे जनसंपर्क अधिकारी रंजन खिराडे, व्यवस्थापक श्रीकांत गोरे यांच्याशी दुरध्वनी वरून संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -