घरमुंबईएका क्लिकवर मिळणार कॉलेजची इत्थंभूत माहिती

एका क्लिकवर मिळणार कॉलेजची इत्थंभूत माहिती

Subscribe

इंजिनियरिंग, मेडिकल यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना कॉलेजबाबत अनेकदा माहिती नसते. त्यामुळे मान्यता नसलेल्या किंवा अपुर्‍या व्यवस्था असलेल्या कॉलेजमध्ये विद्यार्थी प्रवेश घेतात. परिणामी शिक्षण पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी येत असल्याने विद्यार्थ्यांना त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात येते. त्यामुळे त्यांचे संपूर्ण आयुष्य पणाला लागते. हीच बाब लक्षात घेऊन राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी) इंजिनियरिंग, मेडिकल, नर्सिंगच्या कॉलेजची माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेताना प्रत्येक विद्यार्थ्याला मोठ्या व नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश हवा असतो. अनेकदा हे प्रवेश मिळत नसल्याने विद्यार्थी अन्य कॉलेजला प्राधान्य देतात. परंतु, ही कॉलेजे निवडताना विद्यार्थ्यांना कॉलेजबाबत काहीच माहिती नसते. त्यामुळे मान्यताप्राप्त नसलेले कॉलेज, सोईसुविधा नसलेले कॉलेज, शिक्षक वर्गाची कमतरता, अद्ययावत प्रयोगशाळा, वाचनालय या सुविधा नसलेले कॉलेज विद्यार्थ्यांच्या पदरात पडते. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळण्यात अडचणी तर येतातच. पण, वाचनालय व प्रयोगशाळा नसल्याने त्यांच्यातील जिज्ञासा वाढीस लागण्यात अडथळे येतात. तसेच, मान्यता नसलेल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्याचे परीक्षा द्यायच्या वेळी लक्षात येत असल्याने विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. परिणामी विद्यार्थ्यांना परीक्षेचा अभ्यास करण्याऐवजी परीक्षा कशी द्यायची यासाठी कॉलेज, सीईटी सेल, डीएमईआर, उच्च व तंत्र शिक्षण मंडळाच्या कार्यालयांमध्ये फेर्‍या माराव्या लागतात. विद्यार्थ्यांची होणारी ही फसवणूक रोखण्यासाठी सीईटी सेलने पुढाकार घेतला आहे.

- Advertisement -

इंजिनियरिंग, मेडिकल व नर्सिंग यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया यापूर्वी उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचलनालयामार्फत राबवण्यात येत असे. यात काही अडचण आल्यास ते सीईटी सेलकडे पाठवण्यात येत असे. परंतु, आता सर्व प्रवेश परीक्षा एकाच सीईटीच्या छताखाली राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सीईटी सेलच्या वेबसाईटवर प्रवेश परीक्षेचा अर्ज भरताना विद्यार्थ्यांना प्रत्येक कॉलेजची माहिती देण्यात येणार आहे. यामध्येे कॉलेजला मान्यता मिळाली आहे का? कॉलेजमध्ये किती शिक्षक आहेत, शिक्षकांचे शिक्षण काय झाले आहे, लायब्ररी आहे का? अद्ययावत प्रयोगशाळा आहे का? अशी सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवेश परीक्षेचा अर्ज भरताना कॉलेजच्या नावावर क्लिक करताच विद्यार्थ्यांना कॉलेजची सर्व माहिती उपलब्ध होणार आहे, अशी माहिती सीईटी सेलचे आयुक्त आनंद रायते यांनी दिली.

अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना कॉलेजची मान्यता नसल्याचे कळते. तोपर्यंत उशीर झालेला असतो, म्हणून विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागते. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेचा अर्ज भरतानाच विद्यार्थ्यांना कॉलेजची सविस्तर माहिती मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
– आनंद रायते, आयुक्त, सीईटी सेल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -