काँग्रेसने ठाण्यातील २२ पदाधिकारी हटवले

Mumbai
Congress maharashtra
प्रातिनिधिक फोटो

पाच राज्यात सत्ता संपादन केल्यावर त्याचा प्रचार आणि प्रसार करीत महाराष्ट्रातही पुन्हा काँग्रेस कशी आवश्यक आहे हे सांगत काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून येणार्‍या लोकसभेच्या निवडणुकीची प्रचाराची धुरा वाहिली. मात्र ठाण्यात या जनसंघर्ष यात्रेच्या सभेसाठी जमलेली तुरळक गर्दी पाहून चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली होती. या नाराजीचा फटका अखेर ठाण्यातील पदाधिकार्‍यांना बसला आहे. लोकसभा निवडणुका जवळ आल्या असताना सुमारे 22 पदाधिकार्‍यांवर अकार्यक्षमता आणि निक्रियतेचा ठपका पक्षाकडून ठेवण्यात आला आहे. सोबतच त्यांना पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे. तसे प्रसिद्धीपत्रक ठाणे अध्यक्ष मनोज शिंदे यांनी प्रसिद्ध केले आहे.

जबाबदारीतून मुक्त झालेल्या पदाधिकार्‍यांमध्ये ठाणे तालुका उपाध्यक्ष गुरूदयाल धनोत्रा, ठाणे तालुका सरचिटणीस श्रीधर डकरे आणि के. डी. वर्गीस यांच्यासह आठ चिटणीस आणि 11 सदस्यांचा यात समावेश आहे. कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर कमिटीने आयोजित केलेल्या कार्यक्रमांना पूर्वसूचना देण्यात येऊनही गैरहजर राहिल्याचा ठपका यांच्यावर ठेवण्यात आला आहे. तसेच पक्षबांधणी करण्यात अकार्यक्षम असल्याने आणि निक्रिय ठरल्यामुळे यापुढे हे पदाधिकारी सदस्य म्हणून कार्यरत राहतील, असेही प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले आहे.

युवक काँग्रेसच्या निवडणुकीत झालेला वाद आणि पडलेले गट यामुळे संघटना हतबल झाली आहे. मागे ठामपाच्या नगरसेवकपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कोणी तयार नव्हते. अशा वेळेस वर्तमानपत्राद्वारे आवाहन करण्याची वेळ पक्षातील वरिष्ठ नेते आणि पदाधिकार्‍यांवर आली होती. अशा परिस्थितीत विशेषतः ऐन लोकसभा निवडणुकीत पदाधिकार्‍यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई होणे हे धोकादायक आहे. यात दुसर्‍याच कुणाचा तरी राजकीय हात असल्याचा आरोप कारवाई झालेल्या पदाधिकार्‍यांपैकी अनेकांनी केला आहे.

पदाधिकारी अकार्यक्षम असतील तर त्यांना पदमुक्त करावे. परंतु कारवाई करण्यापूर्वी कारणे दाखवा नोटीस बजावणे गरजेचे आहे. किंबहुना ऐन निवडणुकीच्या तोंडावर कारवाई करणे म्हणजे स्वतःच निर्णय प्रक्रियेत सहभागी होणे आणि इतरांना त्यापासून दूर ठेवण्यासारखे आहे. यासाठीच अचानकपणे ही प्रक्रिया राबवण्यात आली असल्याचा आरोपही काही कार्यकर्त्यांनी केला आहे.

ठाण्यातील काँग्रेस संघटनेतला वाद सर्वश्रुत असून पक्ष असंख्य गटातटांमध्ये विभागलेला आहे. महापौरपदाच्या निवडणुकीपासून ते स्वीकृत सदस्यांच्या निवडीपर्यंत अनेकदा हे वाद चव्हाट्यावर आलेले आहेत. ठाण्यात स्थानिक भाजपा अध्यक्ष, स्थानिक मनसे अध्यक्ष आणि स्थानिक सेनेचा जिल्हाप्रमुख यांच्या तोडीचा स्थानिक अध्यक्ष अद्यापही ठाण्यातील काँग्रेसला लाभला नसल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे.

तेव्हा येणार्‍या निवडणुकीमध्ये आपली वैयक्तीक सेटींग करून कार्यकर्त्यांना अथवा पक्षाला वार्‍यावर सोडणारा अध्यक्ष न देता जो पक्षाला नवी झळाली देईल, असाच अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया या कार्यकर्त्यांनी केली होती. म्हणूनच त्यांची हकालपट्टी करण्यात आली असल्याचे या पदाधिकार्‍यांचे म्हणणे आहे. ठाण्यात काँग्रेस पक्ष पार लयास गेला असताना ही कारवाई म्हणजे काँग्रेसची अधिक पडझड करण्याच्या हेतूने विरोधकांनी केलेले षडयंत्र असल्याचा आरोप काही कार्यकर्त्यांनी केली आहे. यामुळे भविष्यात ही कारवाई संघटनेला त्रासदायक ठरू शकते, असे मत काही पदाधिकार्‍यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर व्यक्त केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here