बेहरामपाड्यात कोरोनाचा शिरकाव; मुंबई महापालिकेसमोरील आव्हान वाढणार!

बेहरामपाड्यात कोरोनाचा संसर्ग झाल्यास मोठ्याप्रमाणात रुग्ण बाधित होण्याची शक्यता असल्याने बेहरामपाड्यातील संसर्ग रोखण्याचे महापालिकेपुढील आव्हान मोठे असणार आहे

Mumbai
बेहरामपाड्यात कोरोनाचा शिरकाव; मुंबई महापालिकेसमोरील आव्हान वाढणार!

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीपाठोपाठ आता कोरोना विषाणूचा संसर्ग वांद्र्यातील बेहरामपाड्यात पसरण्यास सुरुवात झाली आहे. बेहराम पाड्यात एका व्यक्तीला कोरोनाची लक्षणे आढळून आली असून सुरक्षेच्या दृष्टीकोनातून त्यांच्या कुटुंबातील दोघांना क्वारंटाईनमध्ये हलवण्यात आले आहे. कोरोनाची लक्षणे आढळून आलेले रुग्ण दिल्लीतून आल्याचे सांगितले जात असून मरकज कनेक्शन असल्याचेही बोलले जात आहे.

बेहराम पाड्याचा परिसर सील

वांद्र्यातील बेहराम पाड्याचा परिसर हा अत्यंत दाटीवाटीचा असून याठिकाणी कोरोनाची लक्षणे असलेला रुग्ण आढळून आल्याने महापालिका प्रशासनाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे केवळ लक्षणे दिसून येताच एच-पूर्व विभागाने बेहराम पाड्याचा परिसर सील करत बाधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे. रुग्णाचा निजामुद्दीन मरकज कनेक्शन असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच महापालिकेने ही पावले उचलली असून त्यांच्या निकटच्या संबंधातील दोन व्यक्तींना क्वारंटाईनमध्ये हलवण्यात आले.

संसर्ग रोखण्याचे महापालिकेपुढील मोठे आव्हान

मिळालेल्या माहितीनुसार, या कुटुंबातील दोन व्यक्तींना महापालिका व पोलिसांनी क्वारंटाईनमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांनी याचा विरोध केल्याने येथील लोकांनीही महापालिकेला विरोध केला होता. यासंदर्भात स्थानिक शिवसेना नगरसेवक हालिम शेख यांनी यासंदर्भात बोलतांना, त्यांनी संबंधित रुग्णाचा चाचणी अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. केवळ कोरोनासारखी लक्षणे दिसून येत आहे. संबधित रुग्णाला अस्थमाचा त्रास आहे. त्यामुळे अद्यापही कोरोनाचा पॉझिटिव्ह अहवाल आलेला नाही. तरीही सुरक्षेच्या दृष्टीकोनातून महापालिकेने बेहरामपाड्याचा परिसर सील केला आहे. मात्र, बेहरामपाड्यात कोरोनाचा संसर्ग झाल्यास मोठ्याप्रमाणात रुग्ण बाधित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बेहरामपाड्यातील संसर्ग रोखण्याचे महापालिकेपुढील मोठे आव्हान आहे.